अभिनेता राकेश बापट दरवर्षी गणेशोत्सवासाठी स्वतःच्या हाताने बाप्पाची मुर्ती तयार करतो. त्याने त्याच्या घरासाठी एक सुबक गणेशमुर्ती तयार केली आहे. मात्र त्याने यंदा हा उपक्रम स्वतःपुरता मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुला केला आहे. म्हणजेच तो बाप्पाची मुर्ती कशी तयार करतो तिला कसे रंगवतो याचे प्रशिक्षण तो त्याच्या चाहत्यांनाही देणार आहे. कोविड 19 चा प्रभाव यंदा गणेशोत्सवावरही असणार आहे. म्हणूनच त्याने त्याच्या चाहत्यांना घरच्या घरी स्वतःची गणेशमुर्ती तयार करण्याचे आवाहन केले आहे.
कसा असणार गणेशमुर्तीचा ऑनलाईन क्लास –
राकेश बापटच्या मते त्याच्या अनेक चाहत्यांना त्याच्या कडून गणेशमुर्तीचे प्रशिक्षण घ्यायचे होते. तो जर मुंबईत असता तर त्याने मुंबईत यासाठी एखादं वर्कशॉप आयोजित केलं असतं. पण राकेश सध्या पुण्यात आहे. राकेश त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत आहे. कारण सध्या सगळीकडे कोविड 19 मुळे जे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे त्याला त्याच्या घरी राहणे क्रमप्राप्त आहे. शिवाय सध्या चाहत्यांसोबत सोशल डिस्टेसिंगही पाळावे लागणार आहे. म्हणूनच त्याने ऑनलाईन ट्युटोरिअलच्या माध्यमातून चाहत्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम तो एका सामाजिक संस्थेसाठी करत आहे. या वर्कशॉपच्या माध्यमातून जो काही निधी जमा होईल तो श्यामची आई फाऊंडेशनला देणगी स्वरूपात दिला जाणार आहे. यासाठीच हा क्लास पेड असून जूम वर वेबिनारच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रशिक्षणासाठी बूकींग केले आहे त्यांना या कोर्सची लिंक शेअर केली जाईल.
राकेशच्या घरी यंदा कसा असेल गणेशोत्सव
राकेशच्या मते यंदाचा गणेशोत्सव हा प्रत्येकासाठीच खाजगी स्वरूपातच असेल. यापूर्वी गणपती बाप्पा घरी आल्यावर मित्रमंडळी अथवा नातेवाईक दर्शनासाठी घरी येत असत. पण यंदा असे होऊ शकत नाही कारण तुम्हाला फक्त तुमच्या घरापुरता हा सण मर्यादित ठेवावा लागेल. एका दृष्टीने हे चांगलंच आहे कारण यामुळे तुम्ही तुमच्या घरासोबत हा उत्सव निवांतपणे साजरा करू शकता. बाप्पाच्या पूजेसाठी खूप वेळ देऊ शकता. मात्र यात तुमच्या अगदी जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक सहाभागी होऊ शकत नाहीत याची खंत राहणारच आहे. मात्र जे आहे त्याला सामोरं जात आपल्याला यंदा बाप्पाचं स्वागत करायचं आहे. कारण बाप्पाच आता आपल्याला या संकटातून लवकरात लवकर आणि सुखरूप बाहेर काढू शकेल.
बाप्पा करणार या संकटाचा नाश
कोरोनामुळे आपले पूर्ण जीवनच विस्कळीत झाले आहे. मात्र आता हळूहळू या समस्येला तोंड देत आपल्या सर्वांना यातून बाहेर पडायचे आहे. कोणत्याही गोष्टीला सुरूवात करण्यापूर्वी आपण गणेशाची आराधना करतो. त्यामुळे आता आपल्या नव्या आणि सुरक्षित जीवनाची पुन्हा सुरूवात होणार आहे. यासाठी प्रत्येकाने मनोभावे बाप्पाची पूजा करायला हवी. कदाचित आता या व्हायरसचा अंत होणार आहे आणि म्हणुनच याच काळात गणेशाचे आगमन होत आहे. तेव्हा सर्वांनी बाप्पाकडे प्रार्थना करू या की पुन्हा सगळं काही पूर्ववत होऊ दे… गणपती बाप्पा मोरया.
फोटोसौजन्य – इन्टाग्राम
अधिक वाचा –
नच बलिए 10 ची परिक्षक असणार बिपाशा बासू, या दोन सेलिब्रेटीजच्या नावाचीही चर्चा
हिरोंपेक्षाही हँडसम आहेत हे ऑनस्क्रिन व्हिलन