बॉलीवूड

शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, ‘निकम्मा’ चित्रपटातून करणार कमबॅक

Dipali NaphadeDipali Naphade  |  Aug 1, 2019
शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, ‘निकम्मा’ चित्रपटातून करणार कमबॅक

शिल्पा शेट्टी कुंद्रा सोशल मीडियावरून नेहमीच आपल्या चाहत्यांना भेटत असते. पण गेले कितीतरी वर्ष शिल्पा चित्रपटापासून दूर होती. इतर अनेक गोष्टीमध्ये व्यग्र असणारी शिल्पा पुन्हा एकदा चित्रपटामध्ये कमबॅक करत असल्याचं खुद्द तिने सोशल मीडियावरून सांगितलं आहे. 13 वर्षांनी शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असून या चित्रपटाचं नाव ‘निकम्मा’ असल्याचंही शिल्पाने सांगितलं आहे. शिल्पा या चित्रपटातून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी तयार झाली आहे. इतकंच नाही तर तिने तिचा आनंद आपल्या चाहत्यांसह व्यक्त केला आहे. 

सब्बीर खान करणार दिग्दर्शन

शिल्पा शेट्टी लग्नानंतर चित्रपटात केवळ कॉमिओ रोल करताना दिसली. 2007 मध्ये आलेल्या ‘अपने’ या चित्रपटात शिल्पाने काम केलं होतं. त्यानंतर तिने कोणत्याही चित्रपटात भूमिका केली नाही. केवळ गाण्यापुरता कॉमिओ तिने केला होता. पण आता तब्बल 13 वर्षानंतर शिल्पा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिसणार असून एका मुख्य भूमिकेत ती असेल. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दस्सानी आणि गायिका शर्ली सेटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. या चित्रपटाचं दिग्दर्शन सब्बीर खान करणार असून शिल्पा या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचं तिने आपल्या शेअर केलेल्या पोस्टमधून सांगितलं आहे. तसंच आपण याआधी अशी भूमिका कधीही साकारली नव्हती. त्यामुळे ही भूमिका करण्यासाठी उत्सुक असल्याचंही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. शिवाय प्रेक्षकांना आपण या नव्या अवतारामध्ये नक्कीच आवडू असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. तसंच बऱ्याच वर्षांनी एक चांगला आणि वेगळा विषय आपल्याला काम करण्यासाठी मिळाला असल्याचंही तिने म्हटलं आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स आणि सब्बीर खान फिल्म्स करत आहेत. तसंच याबाबत सब्बीरनेही आपलं मत व्यक्त केलं आहे. सब्बीरने सांगितलं की, शिल्पा इतक्या वर्षांनी चित्रपटात येणार तर तिला भूमिका चांगली असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे तिच्या मनासारखी भूमिका असल्याने ती हा चित्रपट करायला तयार झाली. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

शिल्पा अनेक कामात व्यग्र

शिल्पा शेट्टी जरी सिल्व्हर स्क्रिनवर बरीच वर्ष दिसली नसली तरीही लहान पडद्यावर ती रियालिटी शो ची परीक्षक म्हणून नेहमीच प्रेक्षकांना दिसत असते. इतकंच नाही तर तिचे अनेक फूड शो देखील युट्यूबवर आणि चॅनेल्सवर दिसतात. याशिवाय शिल्पाचं स्पा असून ती एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही नाव कमावत आहे. तसंच सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असते. याशिवाय ती योगादेखील प्रमोट करते. योगाच्या सीडीदेखील तिने शूट केल्या असून या सीडी अनेक चाहत्यांनी विकत घेतलेल्या आहेत. तसंच शिल्पा आपला पती राज कुंद्रा याच्या बिझनेसमध्येही त्याला मदत करते. याशिवाय आपल्या मुलाचा सांभाळ करण्यातही ती व्यग्र आहे. सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित बॅलेन्स करत असल्यामुळे शिल्पाचं नेहमीच कौतुक होत असतं. आता पुन्हा एकदा शिल्पा चित्रपटात दिसणार असल्याने राज कुंद्रानेदेखील आनंद व्यक्त केला आहे. त्याने तिला आतापर्यंत नेहमीच पाठिंबा दिला आहे. 

हेदेखील वाचा

Bad News: दिया मिर्झा आणि साहिल सांघाने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय

एकता कपूरने लाँच केलेले ‘हे’ कलाकार गाजवत आहेत बॉलीवूड