आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. मासिक पाळी अनियमित असण्यापासून ते अर्ली मॅनोपॉजपर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून पीसीओडी (pcod meaning in marathi) ही समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढू लागली आहे. बऱ्याचदा मुलींची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याचे कारण पीसीओडी असे सांगण्यात येते. यासाठीच पीसीओडीबाबत सर्व गोष्टी प्रत्येक स्रीला माहित असणं गरजेचं आहे.
पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease) पीसीओडी (pcod full form in marathi) या आरोग्य समस्येमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात. पीसीओडी हा महिलांमधील एक इन्डोक्राईन विकार आहे. अंडाशयातील सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो. एका शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शारीरिक कार्यावर होऊ लागतो. पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते आणि त्यांना हॉर्मोनल असंतुलनाला सामोरे जावे लागते. साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नासीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरे जावे लागू शकते. सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत. ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरे जावे लागेल. आजकालच्या आधूनिक काळात पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे हे वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. मात्र अनेक जणींना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. उपचार करण्यासाठी उशीर झाल्यास त्याचे भयकंर परिणाम भोगावे लागू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला पीसीओडीची लक्षणे, कारणे आणि उपचार पद्धती सांगत आहोत ज्यांचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
पीसीओडीची समस्या समजून घेण्यासाठी त्याआधी तुम्हाला त्याची काही लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला या समस्येवर पटकन उपचार करता येतात.
पीसीओडीची समस्या असल्यास महिलांच्या वजनामध्ये अचानक वाढ होऊ लागते. अशा महिलांच्या पोटाचा घेर नेहमीपेक्षा जास्त दिसू लागतो. आजकाल अनेक महिलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. त्यामुळे तुमचे वजन अचानक वाढू लागले असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका.
दर महिन्याला स्रीयांच्या गर्भाशयातून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच मासिक पाळी अथवा ऋतूस्त्राव असे म्हणतो. मात्र पीसीओडीमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. सहाजिकच त्यामुळे मासिक पाळीची समस्या निर्माण होते. मासिक पाळी उशीरा येणे, मासिक पाळीतील स्वच्छता अथवा मासिक पाळीत अपुरा रक्तस्त्राव होत असेल तर याबाबत वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.
हॉर्मोन्सचे असंतुलन म्हणजे काय आणि उपाय (Hormonal Imbalance In Marathi)
पीसीओडीमुळे स्त्रीयांच्या अंडाशयात गाठी निर्माण होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्यांना असह्य वेदना जाणवू लागतात. मासिक पाळीच्या काळात नेहमीपेक्षा तीव्र वेदना जाणवत असतील तर त्याबाबत तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. पीसीओडीच्या समस्येमुळे अनेकींना मासिक पाळी सुरू नसतानादेखील कोणत्याही कारणाशिवाय पोटात वेदना जाणवतात. काहीजणींना पीसीओडीच्या समस्येमुळे योनीमार्गामध्ये मासिक पाळी सुरू नसतानाही असह्य वेदना जाणवतात.
शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरदेखील होतो. पीसीओडीची समस्या असल्यास काहीजणींना अचानक तीव्र डोकेदुखीला सामोरं जावं लागतं.
पीसीओडी हे महिलांमधील वंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. गर्भधारणा राहण्यासाठी ओव्हूलेशन होण्याची गरज असते. मात्र ओव्हूलेशनच्या कार्यात अंडाशयातील गाठींमुळे अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे महिलांचे आई होण्याचे स्वप्न भंगू शकते.
पीसीओडीचा स्त्रीयांच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा आल्यामुळे महिलांना हॉर्मोनल असंतूलनाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना सतत कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटू लागतं.
हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. केसांचे योग्य पोषण न झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. शिवाय या काळात केस मोठ्या प्रमाणावर गळतात. हॉर्मोन्स असंतुलनामुळे तुमचे केस गळत असल्यामुळे यावर बाह्य उपचार करण्यापेक्षा पीसीओडीवरील उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी केस मोठ्या प्रमाणावर गळत असतीत तर तुमची संपूर्ण वैद्यकीय चाचणी अवश्य करून घ्या.
जर तुमचे आरोग्य निरोगी असेल तर तुमचा चेहरा प्रसन्न आणि चमकदार दिसतो. मात्र पीसीओडीमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळे डाग दिसू लागतात. अनेक महिला पिंपल्स आणि काळे डाग घालविण्यासाठी पार्लरमध्ये उपचार घेतात. मात्र या समस्येचं मुळे तुमच्या शारीरिक समस्येमध्ये दडलेले असते. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास वेळीच वैद्यकीय उपचार घ्या.
पीसीओडीमुळे हॉर्मोन्सचे कार्य बिघडते. हॉर्मोन्सच्या बदलाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. अशा महिलांच्या चेहऱ्यावर राट केस दिसू लागतात. ज्यांना मॅनेज करणं अक्षरशः कठीण जातं. हे काढून टाकले तरी पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर उगवत राहतात. ज्यामुळे तुमचा चेहरा विद्रूप दिसू लागतो. या समस्येवर कोणतेही सौंदर्य उपचार करून फायदा होत नाही. जीवनशैलीत बदल करून तुम्ही ही समस्या नक्कीच नियंत्रणात आणू शकता.
पीसीओडीची लक्षणे समजून घेतल्यावर पीसीओडी या समस्येमागची कारणे जाणून घ्यावीत ज्यामुळे भविष्यात ही समस्या टाळता येऊ शकते.
आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण – तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला पीसीओडी या समस्येला सामोरं जावं लागू शकतं
कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहारकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा देखील शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो आणि पीसीओडी सारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
जर तुमच्या आई अथवा बहिणीला पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हालाही पीसीओडीची समस्या निर्माण होऊ शकते. पीसीओडी ही एक अनुवंशिक समस्या आहे.
आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे नियमित व्यायामाची शरीराला फार आवशक्ता असते. मात्र जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला पीसीओडीचा सामना करावा लागू शकतो.
सोनोग्राफी – पीसीओडी तपासणीसाठी सोनोग्राफी केली जाते. पोटाच्या कोणत्याही समस्येसाठी करण्यात येणारी प्राथमिक वैद्यकीय चाचणी आहे. सोनोग्राफीमधून डॉक्टरांना तुमच्या स्त्रीबीजाची वाढ समजू शकते. जर पीसीओडीची समस्या असेल तर त्याचा परिणाम तुमच्या स्त्रीबीजाच्या वाढीवरदेखील होते. त्यामुळे पीसीओडीची तपासणी करताना डॉक्टर सर्वात आधी रुग्णाची सोनोग्राफी करतात.
हॉर्मोन्स टेस्ट – हॉर्मोन्स टेस्ट करून तुम्हाला पीसीओडीची समस्या (pcod problem in marathi) आहे का हे समजू शकते. यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स (Follicle Stimulating Hormone), ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स (Luteinizing hormone), टेस्टॉस्टेरॉन (Testosterone) अशा काही हॉर्मोन्स टेस्ट डॉक्टर करण्याचा सल्ला देतात.
वाचा – आई व्हायचयं? मग तुम्हाला माहीत हवा गर्भधारणेचा योग्य काळ
जीवनशैलीत आवश्यक बदल करून आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम करून तुम्ही या समस्येपासून सुटका नक्कीच मिळवू शकता.
नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही फिट राहता. तुमचे मासिक चक्र नियमित होते. हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे पीसीओडी आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यासाठी दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम अवश्य करा.
योग्य आणि संतुलित आहार घ्या. घरातील सात्विक आणि ताजे अन्न खाणे नेहमीच चांगले. शिवाय आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. जेवणात वरून मीठ टाकल्यामुळे अथवा चिप्स अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ अतीप्रमाणात खाल्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो. आहारात व्हिटॅमिन Ca, B12, D3 या सप्लीमेंटचे प्रमाण वाढवा.
मद्यपान आणि धूम्रपानाचा शरीरावर विपरित परिणाम होतो हे माहित असूनही अनेक लोक या व्यसनांच्या आहारी जातात. शिवाय फॅशन म्हणून अथवा थ्रील म्हणून अनेकजणी धूम्रपान आणि मद्यपान करतात. मात्र जर तुम्हाला संपूर्ण निरोगी आयुष्य हवे असेल तर मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर रहा. व्यसन सोडण्यासाठी थोडासा प्रयत्न केल्यास तुमचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. संपूर्ण निरोगी आयुष्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे हे नेहमीच चांगले. जेव्हा तुम्ही व्यसनांच्या आहारी जाता तेव्हा पीसीओडीप्रमाणे अनेक आरोग्य समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं.
पीसीओडी समस्या असलेल्या महिलेला गर्भधारणा होणे कठीण असू शकते. कारण पीसीओडी या समस्येमुळे स्त्रीच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो. जे हॉर्मोन्स स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी स्त्रीबीज निर्माण करणे व गर्भाशयाला तयार करण्याचे काम करीत असतात. शिवाय हॉर्मोनच्या अति वाढीमुळे व इन्सूलीनच्या पातळीत देखील झालेल्या अती वाढीमुळे स्त्रीच्या मासिक पाळीवर परिणाम होतो ज्यामुळे ओव्हूलेशन (अंडाशयामधून स्त्रीबीज सोडले जाणे) व्यवस्थित होत नाही.
पीसीओडीची समस्या असल्यास वाढलेले वजन आणि अनियमित मासिक पाळीमुळे तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होतात. यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वीच पीसीओडीवर उपचार करणे गरजेचे आहे. वजन कमी करून आणि ओव्हूलेशनला चालना देणारे उपचार करून तुम्ही गरोदर राहू शकता. अशा उपचारांमध्ये डॉक्टर तुम्हाला काही औषधे आणि अल्ट्रा साऊंड परिक्षणाद्वारे ओव्हूलेशन कधी होणार याचा अंदाज देतात. या काळात सेक्स केल्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होणे शक्य असते. फर्टिलिटी प्रोग्रेसवर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या वंधत्वावर मात करू शकता. शिवाय जर तुम्ही पस्तिशीच्या पुढील वयाच्या असाल तर आयु. आय आणि आय. व्हि. एफ उपचार घेऊन तुम्ही नक्कीच आई होऊ शकता.
पीसीओडी समस्या ही आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करून आणि पोषक आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही तुमच्या या समस्येवर उपचार करू शकता.
अधिक वाचा
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा ‘हे’ थोडेसे बदल
आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा
पायाच्या दुखण्यावरील सोपे घरगुती उपाय
पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक