आपल्याकडे मंगळसूत्राला (Mangalsutra) अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध लग्नामध्ये विविध डिझाईन्सची मंगळसूत्रं आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता हळूहळू मंगळसूत्राचा ट्रेंड आणि डिझाईन्स दोन्ही बदलत आहेत. आता बॉलीवूडमधील हिरॉईन्सदेखील आपल्या लग्नातील मंगळसूत्राचे डिझाईन्स अगदी सहज आणि सुंदर पद्धतीने दाखवतात. प्रियांका चोप्रापासून ते अगदी कतरिना कैफच्या मंगळसूत्राचीदेखील चर्चा रंगली. अत्यंत नाजूक आणि उत्तम डिझाईन असणारे मंगळसूत्र त्यांनी घातले. ज्यांचे लग्न होणार आहे, त्यांना नेहमी कोणत्या डिझाईन्सचे मंगळसूत्र घ्यायचे अथवा मंगळसूत्राची निवड कशी करायची असा प्रश्न पडतो. त्यांच्यासाठी काही सोप्या आणि खास टिप्स. तुम्ही स्वतःसाठी मंगळसूत्राची निवड करत असाल तर ते परफेक्ट असायलाच हवे. तुम्ही नेहमीच्या वापरासाठी कसे मंगळसूत्र घालणार आहात अथवा तुम्हाला कशा पद्धतीचे आणि डिझाईन्सचे मंगळसूत्र हवे आहे, हे तुम्हीच ठरवू शकता. त्यासाठी काही सोप्या टिप्स.
1. आपले बजेट ठरवा
मंगळसूत्राचे अनेक डिझाईन्स आता उपलब्ध आहेत. त्यामुळे इव्हल आय (Evil Eye Mangalsutra) पासून ते अगदी सॉलिटेअर मंगळसूत्रापर्यंत (Solitaire Mangalsutra) वेगवेगळी डिझाईन्स तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता. पण कोणतेही डिझाईन तुम्ही निवडण्यापूर्वी तुम्हाला नक्की किती किमतीपर्यंत मंगळसूत्र विकत घ्यायचे आहे, याबाबत बजेट तुम्ही ठरवा. तुम्ही रोज मंगळसूत्र वापरणार आहात किंवा नाही अथवा तुम्हाला हिऱ्याचे, सोन्याचे कोणत्या पद्धतीचे मंगळसूत्र आहे आणि तुम्ही त्यासाठी किती किंमत मोजणार आहात, याचा विचार सर्वात आधी व्हायला हवा. बजेट ठरवल्यास, तुम्हाला पुढे दुकानात जाऊन अथवा सोनाराकडे जाऊन डिझाईन्स ठरवणे अधिक सोपे होते.
2. आपले मेटल निवडा
आता केवळ सोन्याचे मंगळसूत्रच तयार करायचे अशी पद्धत राहिलेली नाही. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने मेटलची निवड करू शकता. एका पद्धतीने पाहिले तर सोन्यासह आता प्लॅटिनम, हिऱ्याचे मंगळसूत्र, व्हाईट गोल्ड इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यातील मेटलची निवड करून मंगळसूत्र तयार करून घेता येते. आजकाल 14 कॅरेट सोन्यामध्येही हिऱ्याचे मंगळसूत्र मिळते. त्यामुळे तुमचे बजेट कमी असेल तरीही तुम्हाला उत्तम डिझाईन्सचे मंगळसूत्र विकत घेता येते.
3. लांबी घ्या लक्षात
अनेकदा लग्नाच्या घाईगडबडीत अनेक जणी अधिक लांबी असणारे मंगळसूत्र निवडतात. त्यावेळी ते चांगले वाटते मग मात्र त्याची लांबी नकोशी वाटते. टीव्ही मालिकांमध्ये अनेक जणी मोठी मंगळसूत्रे घालून स्वयंपाकघरात काम करताना दिसतात, पण खऱ्या आयुष्यात मात्र हे शक्य नाही. काम करताना मंगळसूत्र लांब असेल तर नक्कीच त्रास होतो, अनेकदा साडी अथवा कपड्यांमध्ये मंगळसूत्र अडकून राहाते आणि कधी कधी ते वाढण्याची अर्थात तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित वापरासाठी तुम्ही तयार करून घेणारे मंगळसूत्र हे मध्यम स्वरूपाच्या लांबीचे अथवा अगदी गळ्याबरोबरील लांबीचे ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. रोज मंगळसूत्र घालायचे असेल तर त्याची लांबी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
4. पेंडंट डिझाईनची चलती
तुम्ही जड मंगळसूत्रापासून ते अगदी हलक्या मंगळसूत्रापर्यंत निवड करू शकता. पण निवड नेहमी सर्व डिझाईन्स बघून झाल्यानंतरच करा. तुम्ही जे डिझाईन निवडणार असाल ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पेंडंट स्टाईल सध्या चलतीमध्ये आहे. तुम्हाला अशा पद्धतीचे पेंडंट हवे असेल तर तुम्ही हलक्या वजनाचे पेंडंट निवडा. तुम्ही जर पार्टीसाठी एखादे मंगळसूत्र निडवणार असाल तर त्याचे पेंडंट थोड जड वजनाचे असू द्या.
5. मॅचिंगवर लक्ष द्या
तुम्ही जेव्हा मंगळसूत्राचे डिझाईन निवडाल तेव्हा लक्षात ठेवा की, त्यासह मॅचिंग कानातले अथवा अन्य तुमच्याकडे असणाऱ्या दागिन्यांच्या डिझाईन्ससह याचे डिझाईन्स मॅच होत आहे की नाही. एखादा मॅचिंग सेट असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला नंतर वेगळी खरेदी करावी लागणार नाही. त्यामुळे सहसा असेच डिझाईन निवडा जेणेकरून तुमच्याकडे त्याचे मॅचिंग दागिनेही असतील.
6. हॉलमार्कचेचे दागिने खरेदी करा
मंगळसूत्र असो अथवा कोणताही दागिना असो नेहमी लक्षात ठेवा की, हॉलमार्कचेच दागिने खरेदी करा. याचा अधिक फायदा होतो. हॉलमार्कचे मंगळसूत्र हे खरे असून अधिक काळ टिकते आणि त्यामुळे मंगळसूत्राची खरेदी करताना हॉलमार्कचे आहे की नाही हे पाहून मगच खरेदी करा.
या सगळ्या टिप्स तुम्हाला योग्य आणि परफेक्ट मंगळसूत्राची निवड करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील आणि तुमची स्टाईलदेखील टिकून राहील. आजकाल अनेक हिरॉईन्समुळे सब्सासाचीचे फर्स्ट कॉपी मंगळसूत्रदेखील ट्रेंडमध्ये आले आहे. तर अनेक सोनाच्या दुकानात मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स दिसून येतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा मंगळसूत्राची निवड आणि दिसा अधिक सुंदर!