लॉकडाऊनमुळे सध्या सर्व मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग बंद आहे. त्यामुळे लोकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन पासून ते अनेक मनोरंजन वाहिन्यांनी जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण सुरू केलं आहे. सहाजिकच यामुळे नव्वदच्या दशकातील ‘हम पांच’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 13 एप्रिलपासून या मालिकेला पुन्हा टिव्हीवर दाखवण्यात येत आहे. या मालिकेचे आजही अनेक चाहते आहेत. मात्र त्यांना कदाचित हे माहित नसेल की बालाजी टेलिफिल्मच्या एकता कपूरला या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली होती. होय…या मालिकेच्या माध्यमातूनच एकता कपूर तिच्या वयाच्या सतराव्या वर्षीच डेलीसोप क्वीन झाली होती. यासाठीच जाणून घेऊया मालिकेच्या शूटिंग दरम्यान आणखी काय काय घडलं.
‘हमपांच’ मालिका एकतासाठी ठरली लकी
हम पांच मालिकेची निर्मिती बालाजी टेलिफिल्मच्या माध्यमातून एकता कपूरने केली होती. या मालिकेचं शूटिंग एकता कपूरच्या एका बंगल्यावर करण्यात आलं होतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण या मालिकेचं संपूर्ण शूटिंग या बंगल्याच्या फक्त दोन खोल्या आणि गॅरेजमध्ये झालेलं आहे. तेव्हा या मालिकेच्या लोकेशन आणि कॅमेरा तंत्रज्ञानावरदेखील फारच कमी पैसे खर्च करण्यात आले होत. एवढंच नाही तर फक्त दोन कॅमेऱ्यावरच या संपूर्ण मालिकेचं शूटिंग झालं होतं. एक कॅमेरा मास्टर कॅमेरा होता तर दुसऱ्या कॅमेऱ्यामधून क्लोज अप शॉट्स शूट केले जायचे. कलाकारांकडे या मालिकेदरम्यान लेपल माईकदेखील नसायचे. इतकंच नाही तर या मालिकेच्या शूटिंग दरम्यान बालाजी टेलिफिल्मकडे कोणतं अधिकृत ऑफिसदेखील नव्हतं. या मालिकेतील काजल भाई म्हणजेच अभिनेत्री भैरवीने शेअर केलं आहे की, शूटिंग सुरू असताना एकता कपूर स्वतः लोकेशनवर येऊन कलाकारांना त्यांचे सीन सांगत असे. शिवाय या बंगल्याच्या गॅरेजमध्येच एकताने आपलं छोटेखानी ऑफिस थाटलं होतं. ज्यामुळे मालिकेतील ऑफिसशी निगडीत सीनदेखील त्या गॅरेजमध्येच शूट केले जायचे. मात्र त्या काळात एकता कपूरचं नशीब चांगलच जोरात होतं ज्यामुळे ‘हम पांच’ मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. नव्वदच्या दशकात ही मालिका मनोरंजनाचा धमाका ठरली. हम पांच सुपरहिट झाल्यामुळे एकता कपूरला स्वतःची ओळख मिळाली. पुढे ती भविष्यात टेलिव्हिजन माध्यमाची डेलीसोप क्वीन या नावाने ओळखली जाऊ लागली. मात्र हे सर्व घडू शकलं हम पांच मालिकेमुळे… म्हणूनच ही मालिका एकता कपूरसाठी लकी ठरली. या मालिकेमुळेच एकताला लहान वयातच म्हणजे अगदी वयाच्या सतराव्या वर्षी निर्मितीची धुरा सांभाळता आली. आज ती ज्या यशाच्या शिखरावर आहे त्याची पाळंमुळं या मालिकेच्या यशात दडलेली आहेत.
जुन्या आठवणींना उजाळा देणारी मालिका
1995 ते 2006 या काळात ‘हमपांच’ मालिकेने टेलीव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अभिनेता अशोक सराफ, प्रिया तेंडूलकर, शोभा आनंद, भैरवी रैचुरा, वंदना पाठक अशा अनेक मोठ्या कलाकारांनी त्यामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन, मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेत्री राखी विजन यांनी या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात प्रथमच पदार्पण केलं होतं. हम पांच मधील अभिनेता अशोक सराफ यांनी साकारलेलं ‘आनंद माथुर’ हे पात्र खरंतर कधीच विसरता येणार नाही. बॅंकेत काम करणाऱ्या एका सामान्य व्यक्तिमत्वाची ही भूमिका होती. आनंद यांचं त्यांच्या पाच मुलींवर असलेलं प्रेम, त्यांचे स्वर्गीय पत्नीसोबत गप्पा मारणं अशा अनेक गोष्टींमुळे या मालिकेला एक मनोरंजक वळण मिळालं होतं. माथुर कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये निरनिराळी असल्यामुळे घरात सतत विनोदी वातावरण घडत असे. शिवाय एखाद्या घरात जेव्हा पाच मुली असतात तेव्हा नेमकं काय काय घडू शकतं हे या मालिकेमधून प्रेक्षकांना पाहता आलं होतं. अनेकदा काही सामाजिक विषयांनादेखील या मालिकेतून वाचा फोडण्यात आली होती. आता ही मालिका टेलिव्हिजनवर पुन्हा प्रसारित होत आहे. ज्यामुळे या जुन्या आठवणी पुन्हा नव्याने प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
नव्वदच्या दशकातील मालिकाच नाही जाहिरातदेखील होत्या सुपरहिट