वेगवेगळी आईस्क्रिम्स आपण नेहमीच ऐकली आहेत आणि त्याची चवही घेतली आहे. मात्र आपल्या घरात असणाऱ्या गव्हाच्या पिठापासून आईस्क्रिम बनवता येतं हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? किंवा करून पाहिलं आहे का? तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हो गव्हाच्या पिठापासून फक्त पोळ्याच होत नाहीत तर त्यापासून आपल्याला आईस्क्रिमदेखील बनवता येते. मुलांना बाहेरचे आईस्क्रिम देण्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरात आम्ही दिलेली गव्हाच्या पिठापासून आईस्क्रिम तयार करण्याची ही रेसिपी बनवून नक्की पाहा आणि आम्हाला कळवा. सर्वात पहिले तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आईस्क्रिम नक्की कसं बनवायचं आणि हे आईस्क्रिम बनवताना किती त्रास होईल? पण हे बनवणं सोपं आहे. तुम्हाला काहीही जास्त त्रास घ्यावा लागणार नाही. तसंच याची चवही चांगली लागते. गव्हाच्या पिठापासून हे आईस्क्रिम तयार केलं आहे हे सांगितल्याशिवाय समोरच्या माणसाला कळणारही नाही. शिवाय यामध्ये शरीराला पोषण देणारे गव्हाचे पीठ असल्याने शरीरालाही कोणतीही हानी नाही.
फक्त केळी आणि चॉकलेटपासून बनवा हेल्दी आईस्क्रिम
साहित्य
गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या आईस्क्रिमसाठी नक्की काय साहित्य लागते ते पाहूया
- 1 लीटर दूध
- अर्धी वाटी गव्हाचे पीठ
- साखर
- व्हॅनिला इसेन्स
- दूध पावडर
- वेलची पावडर
कृती
एक लीटर दूध आहे त्यातील तुम्ही साधारण एक मोठी वाटी दूध बाजूला काढून ठेवा. बाकीचं दूध मंद आचेवर तुम्ही उकळवायला ठेवा. हे दूध अर्धे होईपर्यंत आटवा. दूध आटवतानाच तुम्ही साखर घाला. दूध खाली भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्या. दूध आटवताना तुम्ही मध्ये मध्ये दूध ढवळत राहा. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलेले दूध घ्या. त्यात तुम्ही गव्हाचे पीठ मिक्स करून त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी करून नीट पेस्ट करा. त्यातच तुम्ही दुधाची पावडरही मिक्स करा. वेलची पावडर मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. यामध्ये एकही गुठळी राहू देऊ नका. त्यानंतर गरम केलेल्या दुधात हे मिश्रण हळूहळू मिक्स करा. हे सर्व थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून व्यवस्थित फेटून घ्या. म्हणजे चुकूनमाकून जर एखादी गुठळी राहिली असेल तर ती निघून जाईल. ज्यावेळी मिक्सरमधून तुम्ही फेटणार आहात तेव्हाच तुम्ही त्यात 3-4 थेंब व्हॅनिला इसेन्स मिक्स करा. मिक्सरमधून फेटून घेताना इसेन्स व्यवस्थित मिक्स होईल.
डाएटवर असाल तर तुमच्यासाठी चीज आणि आईस्क्रिम आहे वरदान
मिक्सरमध्ये फेटल्यावर हे मिश्रण व्यवस्थित फुलेल आणि दिसायलाही छान दिसेल. त्यानंतर तुम्हाला हवं तर आईस्क्रिमच्या भांड्यात अथवा कुल्फी मगमध्ये हे मिश्रण भरून फ्रिजरमध्ये ठेवा. हे आईस्क्रिम सेट होण्यासाठी साधारण 8-9 तास लागतात. त्यामुळे तुम्हाला रात्री आईस्क्रिम खायला हवं असेल तर तुम्ही सकाळी आईस्क्रिम तयार करून घ्या आणि सेट करायला ठेवा. याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. गव्हाचं पिठ मिक्स केल्याने याची एक वेगळीच चव तुम्हाला चाखायला मिळेल. त्याशिवाय आईस्क्रिम खूप घट्ट होईल आणि खाण्यासाठीही तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही जर कुल्फी मगमध्ये हे मिश्रण ठेवले असेल तर गव्हाच्या पिठाची ही कुल्फीही तुम्हाला अतिशय चविष्ट लागेल. तुम्हाला वेलचीचा स्वाद आवडत नसेल तर तुम्ही जायफळ पावडरही वापरू शकता. तसंच तुम्हाला सुका मेवा अर्थात बेदाणे, बदाम, पिस्ते हवे असतील तर तुम्ही तुकडे करून दूध आटवून होत असताना तुम्ही त्यात मिक्स करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा असणारा सुका मेवा तुम्ही यात मिक्स करू शकता.
उन्हाळ्यात घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे ’10’ प्रकार