2020 वर्ष संपून लवकरच 2021 ची सुरूवात होणार आहे. हे वर्ष कसं गेलं हे प्रत्येकाला माहीत आहेच, त्यामुळे नवीन वर्षाची सुरूवात आनंददायी आणि सुरक्षित कशी करता येईल असाच विचार सर्व करत आहेत. या वर्षी काही महिने लॉकडाऊनमध्ये घालवल्यामुळे घरात राहून सेलिब्रेशन करणं आपण नक्कीच शिकलो आहोत. शिवाय कोरोनाचं संकट अजूनही संपलं नसल्यामुळे या वर्षी थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडणं, गर्दी करणं सुरक्षित नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षी थर्टी फर्स्टची संध्याकाळ मस्त मौजमजा करत कुठेतरी बाहेर घालवणं जरी शक्य नसलं तरी यावर सुरक्षित मार्ग उपाय म्हणजे घरातच नववर्षाचं जल्लोषात स्वागत करणं हा आहे. कारण आरोग्य चांगलं असेल तर पुढची अनेक वर्ष हा आनंद असा मजेत साजरा करता येईल. यासाठीच घरात राहून नववर्षाचं स्वागत करण्याच्या या काही भन्नाट आयडियाज नक्की ट्राय करा.
यंदा थर्टी फर्स्टची पार्टी गोवा अथवा एखाद्या डेस्टिनेशनवर जाऊन न करता घरीच आयोजित करा. पार्टीसाठी मस्त थीम ठरवा. ठराविक जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना घरी आमंत्रित करा आणि नववर्षाचं स्वागत करा. पार्टीसाठी तुम्ही घर फुगे, डेकोरेशनचं साहित्य आणि लाईट्सने सजवू शकता. यासाठी दिवाळीचं डेकोरेशन वापरा. खाण्यापिण्याचा मस्त मेन्यू ठरवा. ज्यामुळे तुमच्या घरातच आनंद लुटत तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत कधी नववर्षात दाखल व्हाल हे तुम्हालाही समजणार नाही.
जर तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत पार्टी करणं शक्य नसेल. तर या वर्षी मस्त तुमच्या पार्टनरसोबत घरातच मुव्ही डेट प्लॅन करा. सोफ्यावर आरामात बसून, अंगावर उबदार ब्लॅकेट घेत, कॉफीचा मग आणि पॉपकॉन सोबत जोडीदाराचा हात हातात घेत अशी रोमॅंटिक रात्र घालवण्यात खरंच तुम्हाला मजा येईल. थर्टी फर्स्टची रात्र ही साजरी करण्यासाठी असते. त्यामुळे ती तुम्ही कुठे साजरी करता यापेक्षा कशी आणि कोणाबरोबर साजरी करता हे जास्त महत्त्वाचं आहे.
न्यु इअरचं स्वागत करण्यासाठी तुम्ही घरात मस्त डिनर डेट प्लॅन करू शकता. स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार करा. ज्यामध्ये तुमच्या आणि त्याच्या आवडीचे पदार्थ असतील. ज्यामुळे या डिनरचा आनंद घेत तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांदण्या रात्रीचा आनंद बाल्कनीत बसून घेऊ शकता. स्पेशल सेलिब्रेशन करण्यासाठी एखादा अगदी सोपा केक तयार करा. बिस्किटे आणि इतर अनेक गोष्टींचा वापर करून तुम्ही सोपा केक घरच्या घरी तयार करू शकता. थर्टी फर्स्टच्या रात्री असं डिनर नंतर त्याच्यासोबत गरमागरम ब्राऊनी आणि स्टॉंग कॉफी पिणं एक भन्नाट कल्पना ठरेल. जर तुमचं कुटुंब मोठं असेल तर सर्वांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा.
जर तुम्ही थर्टी फर्स्टच्या रात्री कामानिमित्त एकटेच असाल तर घरात हा क्षण साजरा करण्यासाठी तुमच्या नातेवाईक अथवा प्रिय व्यक्तीला व्हिडिओ कॉल करा. ज्यामुळे तुम्हाला तुम्ही या लोकांच्या सोबत नववर्षाचं स्वागत करत आहात असं वाटू लागेल. एकटेपणा दूर करण्याचा आणि घरातच नववर्षाचं स्वागत करण्याचा हा एक सोपा आणि छान मार्ग आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एखादं छान पुस्तक वाचू शकता, स्वतःसाठी छान जेवण ऑर्डर करू शकता, व्हिडिओ गेम खेळू शकता, टिव्ही वरील मनोरंजनाचे कार्यक्रम पाहू शकता.ज्यामुळे नवीन वर्षाची सुरूवात आनंदात आणि उत्साहात होईल.