‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. संवेदनशील लेखक, दर्जेदार अभिनेते, उत्तम निर्मितीमूल्य जपणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले प्रवीण तरडे एकेकाळी कबड्डी आणि सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडूसुद्धा होते. ही ओळख प्रेक्षकांसाठी काहीशी नवीन असली तरी त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहता येणार आहे ते ‘सूर सपाटा’ या आगामी मराठी चित्रपटात.‘सूर सपाटा’ मध्ये कबड्डी सामन्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ‘पंच’ची भूमिका प्रवीण तरडे साकारताना दिसणारेत.
प्रवीण तरडेंचा चढता आलेख
‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक प्रवीण तरडेंचा करिअरग्राफ सातत्याने पण संयतपणे चढतच राहिला. ‘पिंजरा’, ‘कन्यादान’, ‘तुझं माझं जमेना’ यांसारख्या मालिकांचे लेखन असेल अथवा ‘कुटुंब’, ‘पितृऋण’, ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या संवेदनशील चित्रपटांचे काथा-पटकथाकार-संवादलेखकशिवाय ‘देऊळ बंद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनक्षेत्रातही उडी घेणारे प्रवीण तरडे मनोरंजनक्षेत्राच्या मैदानात एकामागोमाग-एक यशस्वी सूर मारताना दिसतात. ‘सूर सपाटा’निमित्ताने त्यांना आपल्या कॉलेजविश्वातले उमेदीचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. चित्रपटाचा विषयच ‘कबड्डी’ असल्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास असल्याचं त्यांनी सांगितलं. कबड्डीचे रंगतदार सामने, स्पर्धकांची जिंकण्यासाठी चाललेली चढाओढ, दोन्ही बाजूच्या स्पर्धक कंपूतील हाराकिरी पाहताना प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहचणार हे नक्की.
‘सूर सपाटा’ची दमदार टीम
‘सूर सपाटा’ची कथा मंगेश कंठाळे यांनी लिहीली असून पटकथा मंगेश कंठाळे आणि अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबावडे आदींसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे आणि नेहा शितोळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. ली. प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ हा होळीच्या दिवशी म्हणजे २१ मार्चला रसिक-प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा –
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कॉलेज डायरी चित्रपटात पाच वेगवेगळ्या भाषेतील गाणी