अरुंधती भट्टाचार्य यांना उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार

अरुंधती भट्टाचार्य यांना उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार

उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यातून प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याची दखल घेतली जाते. यंदाचा उंच माझा झोका या पुरस्कार 2019 सोहळा देखील अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदा या पुरस्काराचे सातवं वर्ष होतं. या सोहळ्यातून समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अरुंधती भट्टाचार्य या भारतीय बँकर आणि भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. 2016 मध्ये, फोर्ब्सने त्यांची जगातील 25 वी शक्तिशाली महिला म्हणून नोंद केली होती. 

‘ती’चा सन्मान करणारा सोहळा

सृष्टीची निर्मिती स्त्रीमधून होते. मात्र आजही स्त्रीला तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो ही खरी शोकांतिका आहे. मात्र जेव्हा समाजातून स्त्रीयांचा अशा प्रकारे सन्मान केला जातो. तेव्हा  त्यांच्या कार्यांची योग्य दखल घेतली जाते. यातून स्त्रीशक्तीला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं. समाजाकडून त्यांच्या कार्याला मिळालेल्या या मानसन्मानातून जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक महिलांनी त्याच्या जीवनात वाखाणण्याजोगी कामगिरी केलेली आहे. मात्र यातील अनेक जणींचं कार्य प्रकाश झोतात आलंय तर अजूनही काही जणींचे कार्य जगासमोर आलेलं नाही. असं  असलं तरी आपल्या या भगिनीमात्र प्रसिद्धीचा सोस न बाळगता अनेक वर्षांपासून आपलं समाजकार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्यातून करण्यात येतो.

उंच माझा झोकामधून या स्त्रीशक्तीला सलाम

या वर्षी अग्निशामक दलाची देशातली पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या हर्षिणी कण्हेकर, देशातील पहिल्या महिला कमांडो ट्रेनर सीमा राव, सीडमदर - राहीबाई पोपरे, महाराष्ट्राबाहेर मराठीखाद्यसंस्कृतीचा प्रसार करत मराठी खाद्यपदार्थांचं उपहारगृह उभारणाऱ्या जयंती कठाळे, मुंबई मेट्रो रेल कॅार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या, लेखक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुणराजे पाटील, गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनावणे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. यासोबतच सोहळ्याचा सर्वोत्कृष्ट क्षण ठरला तो म्हणजे सीमा राव आणि राहीबाई यांना पुरस्कार प्रदान करण्याचा क्षण. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे आणि डॉ. सीमा राव या भारतातील पहिल्या महिला कंमोडो ट्रेनर यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.या सोहळ्यात अधिक रंगत आणली ती या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या विविध कलाकारांच्या नृत्य सादरीकरणाने. ज्यामुळे या कार्यक्रमातील उपस्थितांचे निखळ मनोरंजन झाले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने केलं. सध्या तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर, कला क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. अशा प्रकारचे सोहळे मोठ्या प्रमाणावर झाल्यास खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीच्या कार्याची दखल घेतली जाईल.

अधिक वाचा

नेटफ्लिक्सवर 'नया है यह'...आवर्जून पाहावे असे चित्रपट

म्हणून लोकांना आवडतेय 'अग्गंबाई सासूबाई' मालिका

संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम