आयुषमान खुराणा एक असा अभिनेता आहे ज्याने नेहमीच वेगवेगळे चित्रपट केले आहेत. आता पुन्हा एकदा आयुषमान एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘आर्टिकल 15’ चं ट्रेलर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यामध्ये आयुषमान एका वेगळ्याच अवतारात पाहायला मिळत आहे. ‘धर्म , नस्ल ,जाति, लिंग ,जन्मस्थान एक ऐसा मुल्क जहाँ कोई भेदभाव नहीं होगा, फर्क बहोत कर लिया अब फ़र्क़ लाएँगे’ अशा दमदार संवादासह आज टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आयुषमानने आपल्या पदार्पणापासूनच अतिशय वेगळे चित्रपट केले आहेत. त्यापैकीच हा एक चित्रपट आहे.
आयुषमानचा वेगळा अवतार
भारतीय संविधानाबद्दल हल्ली सगळ्यांना विसर पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आयुषमान आता चित्रपटातून संविधानाचे धडे प्रेक्षकांना देणार असल्याचं दिसत आहे. ‘आर्टिकल 15’ चं धमाकेदार टीझर प्रदर्शित झालं आहे. यातून आपल्याला आयुषमान तर दिसतोच आहे. पण त्याचबरोबर हल्ली सगळीकडील धर्म, जात आणि इतर गोष्टींवरून होणारी भांडणं, दंगल ही दृष्यं दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपट या सर्वांवर भाष्य करणारा असून आयुषमान आपल्या सर्वांनाच हे धडे मिळणार आहेत.
पहिल्यांदाच बनणार पोलीस अधिकारी
आयुषमान पहिल्यांदाच चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर आयुषमानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता होती. उत्तरप्रदेशच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमधील बदायूमध्ये झालेल्या बलात्कारावर आधारित आहे. 27 मे 2014 रोजी झालेल्या बलात्काराने पूर्ण देश हादरला होता. आता ठीक 5 वर्षांंनी 27 मे रोजीच हा चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरपूर्वी आयुषमानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून पोस्टर प्रदर्शित केलं होतं.
संविधानाचे दिले धडे
प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी धडे आयुषमान देत असतो. ‘आर्टिकल 15’ मधून आयुषमान संविधानाचा धडा देणार आहे. आपण शाळेत शिकलेल्या गोष्टींची आठवण करून देताना आयुषमान दिसत आहे. भारत हा असा देश आहे ज्यामध्ये कोणताही धर्म, जात, लिंग, जातीस्थान यापैकी कोणत्याही आधारावर आपल्या कोणत्याही नागरिकामध्ये भेदभाव करणार नाही. टीझरमध्ये या बलात्कारासंबंधी काही झलक आणि कारवाई हे सर्व दिसून येत आहे. शिवाय याआधी आयुषमानने एक पोस्टरही प्रदर्शित केलं. डोळ्यांवर चष्मा लावलेला आयुष्यमान आणि त्यामध्ये गळफास लाऊन घेतलेल्या दोन मुली आणि दुसऱ्या बाजूला रागात असलेले लोक असं दृष्य दिसत आहे. हा चित्रपट याच वर्षी 28 जूनला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांची नक्की काय प्रतिक्रिया असेल या अजूनही अंदाज येत नाही. पण या टीझरमध्ये आयुषमान नेहमीप्रमाणेच आश्वासक भूमिकेत दिसून येत आहे. आपल्या समाजाप्रती एक जाणीव असणारा अभिनेता हीच आयुषमानची ओळख आहे आणि ती त्याने या चित्रपटातही जपली आहे. कायम वेगवेगळे विषय निवडून आयुषमानने फारच कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची एक छाप सोडली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा असतील हे वेगळं सांगायला नको.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
कुणाल खेमूचा वाढदिवस अविस्मरणीय, इनायाने गायलेलं बर्थ डे सॉंग झालं व्हायरल
#BBM2 ग्रँड प्रीमिअरनंतर आजपासून सुरू होणार ‘बिग बॉस मराठी सिझन 2’ ची धमाल
अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन