लहानपण देगा देवा… असं सगळ्यांनाच वाटत असतं. कारण लहानपणीच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. या लहानपणीच्या आठवणी आठवण्याचा दिवस म्हणजे बालदिन. या दिवशी मोठी माणसंही नकळत लहान होतात. जागतिक बालदिन जरी 20 नोव्हेंबरला साजरा केला जात असला तरी भारतात मात्र 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जंयती असते. पंडित नेहरूंना मुलांविषयी अतिशय प्रेम आणि जिव्हाळा होता. मुलं त्यांना चाचा नेहरू या नावाने ओळखत असत. म्हणून भारतात हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. आजही भारतात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचं मन नेहमीच लहान मुलाप्रमाणेच असतं. शिवाय प्रत्येकासाठी त्याच्या लहानपणीच्या काही खास आठवणी असतात. बालदिनानिमित्त काही सेलिब्रेटीजनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या.
अजिंक्य ननावरे
माझं बालपण पश्चिम महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावात गेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण सुद्धा तिथेच झालेलं आहे. आमच्या गावी एका वाड्यात आम्ही चार कुटुंबं एकत्र राहायचो. तिथे सूरपारंब्या, क्रिकेटसारखे खेळ लहानपणी खूप खेळले आहेत. नेहमी माणसांची वर्दळ असलेलं माझं ते घर मी आजही खूपच मिस करतो. लहानपणीचा एक किस्सा कायम स्मरणात राहील असा आहे. माझे काही मित्र नदीवर खेकडे पकडायला जात असत. मीही एकदा, घरी काहीही न सांगता त्यांच्याबरोबर गेलो होतो. नंतर मला आईने नदीवर पाहिलं. त्यावेळी खूप ओरडा तर बसलाच, पण मला मार सुद्धा खावा लागला होता.
करण बेंद्रे
लहानपणीची एक आठवण मला लक्षात आहे. मला खेळण्यातील एक गाडी घ्यायची होती. ती मला हवी म्हणून मी बाबांकडे खूप हट्ट धरला होता. त्यावेळी मला बाबांनी एक अट घातली. आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे; उन्हाळी सुट्टीत मी या व्यवसायात बाबांना मदत करायची अशी ती अट होती. त्याबदल्यात दोन महिन्यांनंतर मला पैसे देण्याचं बाबांनी काबुल केलं. त्या पैशांनी गाडी घेता येणार असल्याने मी दोन महिने व्यवसायात बाबांना हवी ती सगळी मदत केली. पण, हे कष्ट करून मिळवलेले पैसे माझ्यासाठी एवढे स्पेशल ठरले, की ते मी कुठेही खर्च केलेले नाहीत. आजही मी ते जपून ठेवले आहेत. लहानपणीच्या अशा अनेक आठवणी असतात. पोकेमॉन, बेब्लेड, शक्तिमानसारखे शोज मी मिस करतो. मित्रांसोबत घालवलेला वेळ, तेव्हाचे खेळ यांची सुद्धा आता आठवण येते. मित्रांसोबतचे किस्से तर कधीच विसरले जाऊ शकत नाहीत. असाच एक शाळेत घडलेला किस्सा सुद्धा मला आठवतोय. पहिल्यांदाच शाळेच्या पिकनिकला जायला मिळणार होतं म्हणून मी खूप उत्साही होतो. आदल्या दिवशी शाळेत न जाता, पिकनिकसाठी सगळी खरेदी केली होती. शाळेला दांडी मारलेली असल्याने सहल रद्द झालेलं माळ माहितीच नव्हतं. सहलीच्या दिवशी संपूर्ण वर्गासमोर माझी फजिती झाली. मला ‘मिस्टर ऍबसेन्ट’ हे नाव देण्यात आलं.
अभिजित श्वेतचंद्र
हल्लीच्या मुलांच्या हातात खेळाचं साहित्य म्हणून फक्त मोबाईल पाहायला मिळतो. पोकेमॉन, कँडी क्रश, पबजीसारखे खेळ ही मुलं मोबाईलवर खेळात असतात. आमचं लहानपण असं गेलेलं नाही. विटीदांडू, भोवरा, पतंग उडवणे, लपाछपी असे खूप खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. हे मैदानी खेळ खेळताना आम्ही खूप मजा केली आहे. आताची मुलं ही मजा कधीच अनुभवत नाहीत. या खेळांच्या सुद्धा गमतीशीर आठवणी असतात. माझी पतंगांची तशी आठवण आहे. इतर घरांमध्ये चांगले गुण मिळवले तर एखादी वस्तू देण्याचं मुलांना कबूल केलेलं असतं. माझ्या घरातील स्थिती उलट असायची. परिक्षेच्या आधीच घरात २०-२५ पतंग आणून ठेवलेले असायचे. त्या पतंगांच्या ओढीने माझा अभ्यास सुद्धा छान व्हायचा. ही आठवण मी कधीच विसरू शकणार नाही.
पूजा बिरारी
लहानपणीच्या आपल्या अनेक आठवणी असतात, ज्या आपण मनात जपून ठेवतो. मी आजोळी जायचे तेव्हा अशा अनेक आठवणी जमवलेल्या आहेत. डान्स क्लास, भातुकलीचा खेळ, सायकलिंग आणि भरपूर चॉकलेट्स खाणं ही धमाल आजोळी गेल्यावर नेहमी होत असे. मी शाळेला खूप मिस करते. शाळेतले मित्रमैत्रिणी आणि शाळेतील धमाल या गोष्टींना काही तोडच नसते. लहानपणी आम्ही मित्रमंडळींनी असाच एक किस्सा केला होता. संध्याकाळी लाईट गेलेले असताना आम्ही ‘प्लँचेट’ करायचं ठरवलं. खोली बंद करून सगळी तयारी झाल्यावर मात्र आमची सगळ्यांची बोबडी वळली होती. भीतीने आम्ही जवळपास रडकुंडीला आलो. काही जण तर आमच्यावर नुसतेच हसत होते. आमचे हे सगळे उद्योग घरच्यांना कळल्यावर आम्ही सगळ्यांनी खूप मार खाल्लाय.
निखिल दामले
माझ्या लहानपणीची एक गमतीशीर आठवण आहे. मी सायकल शिकावी म्हणून बाबा खूप आग्रही होते. मला मात्र खूप प्रयत्न करूनही सायकल चालवणं जमत नव्हतं. मला बाबांचा खूप राग यायचा. माझी रडारड आणि धडपडणं बघून बाबा कंटाळले व त्यांनी मला सायकल शिकवण्याचा नाद सोडला. पण, एका दिवशी अचानक माझ्याच मनात आलं आणि सायकलचे ‘साईड व्हील्स’ काढून मी सायकल शिकायला निघालो. दोन-चारवेळा प्रयत्न करूनही मला सायकल चालवायला जमत नव्हती. त्यावेळी वॉचमन काका मदतीला धावून आले. सायकल नुसतीच पायाने ढकलून मग पाय वर घेऊन, मग ती बॅलन्स करण्याचा प्रयत्न मी करावा असं त्यांनी मला सांगितलं. ही युक्ती वापरून जवळपास अर्ध्या तासातच मी सायकल चालवायला शिकलो. त्यानंतर मी खूप सायकलिंग केलं आहे. बाबांना जे दोन वर्षांत जमलं नाही, ते वॉचमनच्या मदतीने अर्ध्या तासात जमलं, ही एक फार मोठी आठवण आहे.
बालदिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!!!
गौरी कुलकर्णी
मी साधारण दोन वर्षांची असताना मी मंचावर पहिल्यांदा परफॉर्मन्स दिला. ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ या गाण्यावर मी तेव्हा नाच केला होता. मला त्या सादरीकरणापेक्षा त्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसाची उत्सुकता अधिक होती. मात्र मला त्यावेळी गिफ्ट मिळालं नाही. मला हिरमुसलेलं पाहून, ‘माझ्यासाठी एक खास गिफ्ट आहे, आणि ते उद्या घरी मिळणार आहे’ असं मला माझ्या आई-बाबांनी सांगितलं. गिफ्ट मिळणार म्हणून मी खूप खुश झाले. खरोखरच आई-बाबांनी मला दुसऱ्या दिवशी मोठं गिफ्ट आणून दिलं. माझ्या नृत्यकलेची सुरुवात तिथून झाली असं म्हणता येईल. आईबाबांच्या या प्रेरणेमुळे, लहानपानापासूनच माझा कलेचा हा प्रवास सुरु झाला.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा-
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटस आणि कोट्स
पानिपत चित्रटात सकिना बेगमच्या भूमिकेत झीनत अमान,पोस्टर रिलीज
अभिताभ बच्चन नंतर आता आयुषमान ठरतोय बॉलीवूडचा नंबर वन