बधाई होनंतर आता येणार ‘बधाई दो’ राजकुमार आणि भूमी असणार मुख्य भूमिकेत

बधाई होनंतर आता येणार ‘बधाई दो’ राजकुमार आणि भूमी असणार मुख्य भूमिकेत

बधाई हो हा चित्रपट 2018 ला प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने जवळजवळ धुमाकूळच घातला. वेडिंग थीम, नेहमीपेक्षा हटके विषय, कलाकारांचा अभिनय अशा प्रत्येक बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरला.बधाई होने बॉक्सऑफिसवर  शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटात आयुषमा खुराना, सान्या, नीना गुप्ता, गजराज राव यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली होती. विषयाचे वेगळेपण यामुळे या चित्रपटाला नॅशनल अवॉर्डही मिळालं होतं. नुकतंच हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे  पूर्ण होत आहेत. हा आनंद साजरा करण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. बधाई हो नंतर आता ‘बधाई दो’ हा त्याचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यावेळी चित्रपटाचं स्टारकास्ट बदलण्यात आलं आहे. बधाई दोमध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. जंगली पिक्चर्स निर्मित बधाई दोचं शूटिंग पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार असून या चित्रपटाच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली आहे.

काय असणार बधाई दो मध्ये

बधाई होमध्ये नीना गुप्ता वयाच्या पन्नाशीमध्ये गरोदर राहतात आणि त्यामुळे त्यांच्या तरूण मुलांवर काय काय परिणाम होतो हे दाखवण्यात आलं होतं. आता बधाई होला दोन वर्ष झाल्यानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वल 'बधाई दो'ची घोषणा केली आहे. मागच्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही कथानकावर फोकस केले जाणार अशी चर्चा आहे. शिवाय यात काहीतरी हटके दाखवलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बधाई दो मध्ये राजकुमार राव पोलीस इनस्पेक्टर तर भूमी पेडणेकर शिक्षिकेच्या भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये राजकुमार एकटाच पुरूष पोलीस कर्मचारी असेल असा मनोरंजक ट्विस्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. 

राजकुमार आणि भूमीची केमिस्ट्री

राजकुमार राव या  चित्रपटात काम करण्यासाठी फार उत्सुक आहे. लॉकडाऊननंतर सर्व काही पुन्हा  सुरळीत होत आहे ही एक आनंदाची बाब आहे. बधाई दो हा बधाई होपेक्षा खूप वेगळा चित्रपट असेल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आणि कथानकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे बधाई हो प्रमाणेच या चित्रपटालाही प्रेक्षक डोक्यावर घेतील अशी आम्हाला आशा आहे असं त्याने शेअर केलं. राज आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या दोघांच्या केमिस्ट्रीबाबत खूप चर्चा होत आहेत. भूमीदेखील या चित्रपटाबाबत तितकीच उत्सुक आहे तिला तर चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू होणार याची घाईच झाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करत आहेत. कोरोनाच्या काळात कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पुढच्या वर्षी एक धमाल मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत याचा त्यांन आनंद आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकेल असा हा चित्रपट असेल. जंगली पिक्चर्सचे चित्रपट नेहमी हिट होतात असा आतापर्यंतचा  रेकॉर्ड आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून सर्वांनाचा चांगली अपेक्षा निर्माण झाली आहे.