आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर बऱ्याचदा खान अभिनेत्यांचं राज्य असलेलं दिसून आलं होतं. पण आता परिस्थिती हळूहळू बदलत असून इतर अभिनेतेदेखील बॉक्स ऑफिसवर आपलं राज्य जमवू लागले आहेत. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चा रिमेक असणारा शाहीदचा ‘कबीर सिंह’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये या चित्रपटाने 163.73 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहीदचा हा पहिलाच चित्रपट आहे ज्याने इतका व्यवसाय केला आहे. सलमान खान आणि अक्षय कुमार या दोन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाला नेहमीच बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवता येते. पण यावेळी ही कामगिरी शाहीदच्या चित्रपटाने केली आहे.
‘अर्जुन रेड्डी’पेक्षाही केली तीन दिवसात अधिक कमाई
तेलुगूचा रिमेक असूनही पहिल्या तीन दिवसातच ‘अर्जुन रेड्डी’पेक्षाही अधिक कमाई ‘कबीर सिंह’ने केली. इतकंच नाही तर आता नऊ दिवस झाल्यानंतरही या ‘कबीर सिंह’ चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. शाहीद आणि कियाराने या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला असून या चित्रपटाने अजून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला असून याबाबतीत शाहीदने सलमान खान आणि अक्षयकुमार या दोन्ही बॉक्स ऑफिसच्या किंग्जना मागे टाकलं आहे. ट्रेड अनालिस्ट तरण आदर्शने सांगितल्याप्रमाणे शाहीदच्या ‘कबीर सिंह’ने दुसऱ्या शुक्रवारी 12.21 कोटींचा गल्ला जमवला. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर विकी कौशलचा ‘उरी’ हा चित्रपट असून तिसऱ्या क्रमांकावर टोटल धमाल आणि अक्षयकुमारच्या ‘केसरी’चा चौथा क्रमांक तर सलमानच्या ‘भारत’चा पाचवा क्रमांक लागत आहे. अजूनही शाहीद आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच राज्य केलं आहे असं म्हणावं लागेल. दरम्यान हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात तर ‘पद्मावत’ या चित्रपटापेक्षाही अधिक ट्रेंड करत असल्याचं तरण आदर्शने म्हटलं आहे.
#KabirSingh has the best *second Friday* of 2019… Scores higher numbers than *all* films released this year… Second Friday biz…#KabirSingh ₹ 12.21 cr#Uri ₹ 7.66 cr#TotalDhamaal ₹ 4.75 cr#Kesari ₹ 4.45 cr#Bharat ₹ 4.30 cr#Badla ₹ 4.05 cr#GullyBoy ₹ 3.90 cr
— taran adarsh (@taran_adarsh) June 29, 2019
प्रेक्षकांना भावला तरीही शाहीदवर झाली टीका
या चित्रपटात शाहीद आणि कियाराने अप्रतिम अभिनय केला असला तरीही अनेक स्तरातून या चित्रपटावर आणि शाहीदवर टीका करण्यात आली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कबीर या व्यक्तीरेखेचं समर्थन करता येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. पण एक चित्रपट म्हणून या पाहायला गेलं तर यातील सर्व कलाकारांचा अभिनय हा नक्कीच वाखाखण्याजोगा आहे असं प्रेक्षकांचं आणि अगदी समीक्षकांचंही मत आहे. तसंच शाहीदच्या कारकिर्दीतील हा त्याचा सर्वात चांगला आणि अप्रतिम चित्रपट असल्याचंही म्हटलं जात आहे. शाहीदने या चित्रपटात जीव ओतून काम केलं असल्याचं दिसून येत आहे. शाहीदच्या अभिनयाचं आणि त्याच्या भूमिकेचं सगळीकडेच सध्या कौतुक करण्यात येत आहे.
शाहीद आणि कियाराची अफलातून केमिस्ट्री
हा चित्रपट जरी अडल्ट असला तरीही यामध्ये कोणताही अश्लीलपणा दाखवण्यात आलेला नाही. तर शाहीद आणि कियाराने पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरीही त्यांच्यातील केमिस्ट्री अफलातून असल्याचं म्हटलं जात आहे. अगदी प्रेक्षकांनाही ही केमिस्ट्री भावली आहे. शाहीदने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपल्याकडे आता कोणताही चित्रपट नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा शाहीदचा फोन निर्मात्यांच्या कॉलने खणखणू लागत असल्याच्या बातम्यांनाही सुरुवात झाली आहे. शाहीदने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या असून आता शाहीद नक्की कोणती भूमिका करणार याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आता लागून राहिली आहे.
हेदेखील वाचा –
हिंदीमध्ये शाहीदने साकारलेला अर्जुन रेड्डी AKA कबीर सिंह पाहिलात का
शाहीद कपूरबरोबर ‘या’ अभिनेत्रीने करावं एकत्र काम, चाहत्यांची मागणी
10 कारणांमुळे साऊथचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ वाटतोय *Intresting