एक गाव.. सात वर्ष.. सात आत्महत्या.. अशी सुरूवात होते ‘सावट’ या चित्रपटाच्या पहिल्यावहिल्या टीझरला. ‘सावट’ या चित्रपटाचं चित्तथरारक टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. या टीझरवरून स्पष्ट होतंय की, हा एक थरारक सिनेमा असणार आहे आणि तो पाहताना एक प्रकारची रक्त गोठवणारी भीती तुम्हाला नक्कीच जाणवल्याशिवाय राहणार नाही.
एक गाव..सात वर्ष..सात आत्महत्त्यांचं ‘सावट’
एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात आणि त्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे आणि प्रत्येक साक्षीदाराने कोणाला तरी पाहिलंय. पण कोणाला? याबाबत मात्र गूढ कायम आहे. पहिलं टीझर पाहून कोणाच्याही मनात भरपूर प्रश्न निर्माण होतील. टीझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो. या चित्रपटाची निर्मिती हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक यांची असून दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांचं आहे.
हे ‘सावट’ जसं दिसतंय तसं नाही
टीझरवरून हा चित्रपट भयपट असल्याचं वाटतंय. पण या टीझरविषयी सांगताना ‘सावट’च्या निर्मात्या हितेशा देशपांडे यांनी सांगितलं की, “मराठीत एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच काहीसं ‘सावट’ सिनेमाबाबतही आहे. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं सावटचं ब-याचदा माणसाच्या मनावर असतं आणि मग तो उगीच घाबरून श्रध्दा-अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडतो.“
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं ‘सावट’
दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणतात, “हा चित्रपट थरारनाट्य आहे. एका गावात काही समजुती आणि गैरसमजुतींचं सावट लोकांच्या मनावर असताना, चित्रपटात आत्महत्यांचं सत्र सुरू होतं. हा चित्रपट गूढकथेवर आधारित आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र तुम्हांला खिळवून ठेवेल, असा मला विश्वास आहे.”
स्मिता तांबेचा लग्नानंतरचा येणारा पहिला चित्रपट
अभिनेत्री स्मिता तांबेचं नुकतंच लग्न झालं असून लग्नानंतर येणारा तिचा हा पहिला चित्रपट असेल.
‘सावट’ या चित्रपटात स्मिता तांबेसोबत मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 22 मार्च 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
हेही वाचा –
– वीणा जामकर करतेय ‘या’ भूमिकेची तयारी