एक मे पासून अठरा वर्षांवरील लोकांना लसीकरण केलं जाणार असं जाहीर झालं आणि दुसरीकडे सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होऊ लागला. हा मेसेज पाहून अनेकींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण या मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं की, मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस महिलांनी कोरोनाची लस घेऊ नये. बघता बघता हा मेसेस तुफान व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर मासिक पाळी दरम्यान लस घेण्याबाबत भीतीच पसरली. यासाठीच जाणून घ्या काय आहे या व्हायरल मेसेज मागचं सत्य आणि काय सांगतात याबाबत आरोग्य तज्ञ्ज
काय आहे हा व्हायरल मेसेज
या मेजेसमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अशी अफवा पसरवण्यात आलेली आहे की, मासिक पाळीचे पाच दिवस आधी आणि नंतर महिलांनी कोरोनाची लस घेऊ नये.
महिलांसाठी एक खास सूचना – “एक मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र मुलींनी सावध राहून मासिक पाळीची तारीख पाहूनच कोरोनाची लस घ्यावी. मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि मासिक पाळीच्या नंतरचे पाच दिवस लस घेऊ नये कारण या काळात महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोना लस घेतल्यामुळे आधी तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि नंतर ती वाढते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात आधीच महिलांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्यामुळे या काळात कोरोना लस घेणे आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे”
या मेसेजची सत्यता तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तज्ञ्जांचा सल्ला घेतला…
जाणून घ्या कोरोना लस आणि मासिक पाळीबाबत आरोग्य तज्ञ्जांचा सल्ला
रेडिओलॉजिस्ट डॉ. शिल्पा लाड यांच्या मते मासिक पाळीच्या आधी, नंतर आणि मासिक पाळीतही कोरोनाची लस घेणं पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण कोरोनाची लस कोणत्या काळात घ्यावी याबाबत कोणतीही गाईड लाईन देण्यात आलेली नाही. त्यामुळे मासिक पाळीत लस न घेण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा अशा अफवांकडे लक्ष न देता लवकरात लवकर कोरोनाचे लसीकरण पूर्ण करा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे.
अफवांकडे दुर्लक्ष करा आणि लसीकरण पूर्ण करा
मासिक पाळीच्या काळात लस घेणं धोक्याचं आहे अशी अफवा पसरवणारा एक खोटा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात हे जरी खरं असलं तरी या काळात रोग प्रतिकारशक्ती कमी होते ही गोष्ट सत्य नाही. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना अशा प्रकारचे चुकीचे मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महिला आणि तरूण मुलींना या मेसेजला बळी न पडता बिनधास्तपणे मासिक पाळी सुरू असतानाही कोरोनाची लस घ्यावी. जगावर आलेल्या या जीवघेण्या संकटापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्याचा हा सोपा मार्ग आहे. जर एखाद्या महिलेला मासिक पाळीबाबत काही गंभीर समस्या असतील तर तिने तिच्या डॉक्टरांसोबत याविषयी योग्य चर्चा करून सल्ला घ्यावा. मात्र लस घेण्याची टाळाटाळ करू नये.
हा मेजेस व्हायरल झाल्यावर सरकारने Press Information Bureau (PIB) द्वारे ट्वीट करून या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता मासिक पाळीच्या काळातही महिलांनी कोरोनाची लस घेणं पूर्णपणे सुरक्षित आहे हे नक्कीच स्पष्ट झालं आहे.
#Fake post circulating on social media claims that women should not take #COVID19Vaccine 5 days before and after their menstrual cycle.
Don't fall for rumours!
All people above 18 should get vaccinated after May 1. Registration starts on April 28 on https://t.co/61Oox5pH7x pic.twitter.com/JMxoxnEFsy
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 24, 2021
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
कोरोना व्हायरस सारखा संसर्ग टाळण्यासाठी कर्करोगींनी घ्यावी विशेष काळजी
कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स
गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल