लहान मुलांना काही विशिष्ट पदार्थ आवडत नाहीत. ही एक अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मोठ्या माणसांनाही खाण्यात आवडीनिवडी असतात. पण रोज जेवायला त्रास देणे, न जेवणे, पौष्टिक पदार्थ न खाणे यामुळे लहान मुलांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होऊ शकतो. जसजशी मुलं मोठी होतात आणि त्यांची समज विकसित होते, तसतशी ते काही खाद्यपदार्थांबद्दल त्यांची अनास्था दाखवू लागतात. कधीकधी ते त्यांच्या मूड किंवा चवीनुसार काही गोष्टी खाणे टाळतात. अशा मुलांना पिकी इटर म्हणतात. ही समस्या मुलांमध्ये सामान्य आहे. परंतु जेव्हा मूल पौष्टीक आणि चांगल्या गोष्टी खाण्यास नकार देतात तेव्हा पालकांना प्रश्न पडतो की मुलाला पोषण कसे मिळणार.
मुलांच्या खाण्याच्या सवयी का बदलतात?
तज्ज्ञांच्या मते मुलांमध्ये वाढीचा दर कमी झाल्यामुळे मुलांच्या खाण्याच्या सवयीही बदलतात. काही बाळांना विशिष्ट अन्न आवडू शकते, परंतु काही बाळांना द्रवपदार्थ जास्त आवडतात जेणेकरून त्यांना अन्न चघळण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि त्यांचे पोट भरू शकेल. तुमचे मूल एखादा पदार्थ भरपूर खात असेल आणि एखाद्या पदार्थाला हातही लावत नसेल तर त्याच्यावर चिडचिड करू नका. फक्त त्याला निरोगी व पौष्टिक अन्नाचा पर्याय द्या आणि विश्वास ठेवा की तुमच्या मुलाची भूक आणि खाण्याच्या सवयी कालांतराने सुधारतील.आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांना स्मार्ट पद्धतीने खाऊ घालू शकाल, जेणेकरुन त्यांना पौष्टिक आहार मिळू शकेल.
एक स्थिर आणि मनोरंजक खाण्याची दिनचर्या पाळा
तुमचे मूल जेवत असताना त्यांच्यासोबत बसा. मुलांना जेवण आवडावे यासाठी तुम्हाला थोडा प्रयत्न करावा लागेल. वेगवेगळ्या आकाराची पोळी, पराठा, पुरी तसेच रंगेबेरंगी भाज्या असे आकर्षक दिसणारे पदार्थ तुम्हाला सुरुवातीला तुमच्या बाळासाठी बनवावे लागतील. तसेच तुमच्या मुलांना आवडत असतील त्या रंगांच्या प्लेट्स, वाट्या, त्यांच्या आवडीच्या कार्टून कॅरॅक्टरचे चित्र असलेल्या प्लेट्स वापरा जेणे करून तुमच्या बाळांना जेवणात रस निर्माण होईल.
तसेच जेवताना किंवा त्यांना खाऊ घालताना त्यांच्या आवडीची गाणी, गोष्टी सांगा. रात्रीच्या जेवणात तुमच्या मुलाची आवड निर्माण करण्यासाठी, त्यांना स्वयंपाक करताना मदत करू द्या. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना मदत करू द्या. त्यांनीच केलेला पदार्थ त्यांना नक्की खावासा वाटेल. त्यांना तुमच्यासोबत किराणा सामान किंवा भाजी खरेदी करायला न्या. तिथे त्यांना रंगेबेरंगी भाज्या, फळे दाखवा. मुलांना विविध रंग आवडतात. त्यांच्या आवडीच्या रंगाची एखादी भाजी घ्या आणि त्यांना आवडेल अशा चवीची भाजी बनवा. अशाने तुमच्या मुलांना जेवणात रस निर्माण होऊ शकेल. मुलांना विविधतेसह नवीन पदार्थ व नवीन चवी खाऊन बघण्यास प्रोत्साहित करा. पण हे करताना तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. चिडचिड व रागावून चालणार नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही ते काम करत नसेल तर निराश होऊ नका! नवीन पदार्थांसह जुने आवडते पदार्थ सर्व्ह करा. त्यामुळे मुलांची अन्नाविषयीची आवड वाढेल.
एकत्र जेवायला बसा
खरं तर हे कठीण आहे. पण सर्वांनी एकत्र जेवायला बसल्याने मुलांनाही सगळं व्यवस्थित खाण्याची सवय लागते हा अनेकांचा अनुभव आहे. जेवणाच्या वेळी टीव्ही किंवा मोबाईल फोन बघणे टाळा. यावेळी तुम्ही मुलांशी गप्पा मारू शकता. घरी जे सगळ्यांसाठी केले आहे तेच तुमच्या मुलालाही द्यायचा प्रयत्न करा आणि जर त्याने ते खाण्यास नकार दिला तर त्याला दुसरा पदार्थ करून देण्याचे टाळा. अशाने मुले हट्टी होतात. आठवड्यातून एक-दोनदा मुलांच्या आवडीचे पदार्थ करा, पण ते पदार्थ पौष्टीक असतील याची काळजी घ्या. साधे जेवण अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी विविध हर्ब्स आणि मसाल्यांचा वापर करा.
अशा प्रकारे तुम्ही मुलांना व्यवस्थित जेवायची सवय लावू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक