नऊ महिने आईच्या उदरात राहून बाळ या जगात जन्माला येते. या नऊ महिन्यांत बाळाच्या शरीरातील सर्व भाग विकसित होऊन तो बाहेर येण्यास तयार होतो. पण अशी काही बाळं असतात जी काही कॉम्प्लिकेशन्स झाल्याने नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्माला येतात. नऊ महिने पूर्ण न होता जन्मलेल्या बाळांना प्रीमॅच्युअर बेबी असे म्हणतात. या बाळांचा योग्य विकास होण्याआधीच जन्म होतो. यामुळे, त्यांची प्रतिकारशक्ती नऊ महिन्यांनंतर जन्मलेल्या पूर्ण-मुदतीच्या बाळांपेक्षा कमकुवत असते, त्यामुळे त्यांची डोळ्यांत तेल घालून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. प्रीमॅच्युअर बाळाचा जन्म झाल्यावर त्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्याला NICU मध्ये ठेवले जाते. बहुतांश केसेस मध्ये बाळाला इन्क्युबेटर मध्ये ठेवावे लागते. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखीखाली बाळाची संपूर्ण काळजी घेतली जाते. परंतु जेव्हा पालकांना त्यांच्या प्रिमॅच्युअर बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन जायची वेळ येते तेव्हा त्यांना टेन्शन येते कारण या अत्यंत नाजूक बाळाची काळजी घेणे सोपे नसते.
अनेक वेळा पालकांना त्यांच्या प्रिमॅच्युअर बाळाची घरी काळजी कशी घ्यावी हे लक्षात येत नाही आणि ते गोंधळून जातात. यासाठी तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुमच्या प्रिमॅच्युअर बाळाला NICU मधून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी नेताना बाळाचे डॉक्टर त्याची काळजी कशी घ्यायची, काय करावे, काय करू नये याची तपशीलवार माहिती देतीलच. त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करा जेणे करून तुमचे बाळ निरोगी आणि सुरक्षित राहील. प्रीमॅच्युअर बाळाची घरीच काळजी घेण्यासाठी काही टिप्स पुढे दिल्या आहेत त्या वाचा.
बाळाला बाहेर नेणे टाळा
प्रिमॅच्युअर बाळाची रोगप्रतिकारशक्ती नवजात बालकांपेक्षा कमकुवत असते, त्यामुळे त्यांना संसर्ग सहज होतो.म्हणूनच या मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊच नये. शक्यतोवर बाळाला घरातच सुरक्षित वातावरणात ठेवावे. बाहेरून कोणी बाळाला भेटायला आले तर त्या व्यक्तीला आधी स्वच्छ हात पाय धुवून मगच बाळाच्या खोलीत जाण्याची परवानगी द्यावी.
बाळाला आंघोळ कशी घालावी
बाळाच्या आंघोळीचे पाणी कोमट असावे. तुमच्या बाळाचे केस साध्या पाण्याने धुवा. त्याला बेबी शॅम्पू वगैरे सुद्धा लावू नका कारण बाळाची त्वचा अगदी कागदासारखी नाजूक असते. बाळाचे वजन 2.5 किलो होईपर्यंत त्याला फक्त स्पंज बाथ द्या. बाळ एक महिन्याचे होईपर्यंत त्याला कोणतेही लोशन किंवा तेल लावू नका.
कांगारू केअर घ्या
घरात असताना बाळाची खोली उबदार ठेवा. बाळाला फक्त डायपरमध्ये ठेवा आणि त्याला आपल्या छातीजवळ घ्या. बाळाच्या त्वचेचा आईच्या त्वचेशी थेट संपर्क झाला पाहिजे. हा स्पर्श खूप महत्वाचा आहे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि बाळाचा विकास देखील चांगला होण्यास मदत होते. कांगारूची केअर ही प्रिमॅच्युअर बाळाचे त्याच्या आईवडिलांशी बॉण्डिंग घट्ट करण्यात मदत करते. यामुळे स्तनपान सुधारते, बाळाचे हृदय आणि श्वासोच्छवासाचे दर संतुलित होतात आणि शरीराचे तापमान नियंत्रित होते.आईबरोबरच बाळाच्या बाबांनी देखील बाळाला असे थेट छातीशी जवळ घेऊन बसणे खूप फायदेशीर आहे.
बाळाच्या शरीराचे तापमान तपासा
बाळाच्या शरीराचे तापमान सामान्य असल्याची खात्री करा. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे गरज असेल तेव्हा म्हणजेच थंड वातावरणात बाळाच्या अंगावर पांघरूण घालणे व बाळाला दुपट्यात व्यवस्थित गुंडाळणे. जेव्हा बाहेरचे वातावरण गरम असेल तेव्हा बाळाला इतकं गुंडाळून ठेवण्याची गरज नसते. लक्षात घ्या की बाळाला जाड ब्लँकेटने गुंडाळून बेडवर ठेवू नका. डिजिटल थर्मामीटर खरेदी करा आणि बाळाच्या शरीराचे तापमान वेळोवेळी चेक करत राहा. सामान्य तापमान हे 36.5 ते 37.3 सेल्सिअसच्या दरम्यान असावे.तसेच खोलीचे तापमान 20 ते 23 सेल्सिअस असावे.
बाळाची खोली अशी ठेवा
उन्हाळ्यात बाळाची खोली थोडीशी थंड ठेवा आणि दिवे मंद ठेवा. बाळाच्या खोलीत शांतता असावी. प्रिमॅच्युअर बाळांना रात्री जास्त वेळा दूध पिण्याची गरज असते. त्यामुळे रात्री बाळाला पाळण्यात न ठेवता स्वतःजवळच घेऊन झोपावे.
अशा प्रकारे प्रिमॅच्युअर बाळाची काळजी घ्यावी.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक