उन्हाळा वाढू लागला आहे त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी अनेकजण वॉटरपार्क ला जाण्याचा बेत आखतात. गर्मीच्या दिवसात स्विमिंगपुलमध्ये पार्टी करणं देखील परफेक्ट कल्पना आहे. मात्र तासनतास पाण्यात डुंबताना कानात शिरलेलं पाणी काढणं एक फार मोठी समस्या असते. बऱ्याचदा अंघोळ करतानादेखील कानात पाणी शिरतं. कानात शिरलेल्या पाण्यामुळे अस्वस्थ वाटू लागतं. यामुळे काही वेळा कानदुखीदेखील सुरू होते. कारण कानात पाणी शिरल्यामुळे तुम्हाला स्पष्ट ऐकू येत नाही. कानांनी नीट ऐकता न आल्यास तुमची चीडचीड होते. मात्र तुम्हाला असा त्रास होत असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण काही सोप्या युक्त्या करून तुम्ही कानात शिरलेलं पाणी बाहेर काढू शकता.
कानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी उपाय
कान आणि डोकं हळूहळू शेक करा
कान आणि डोकं हळूहळू हलवून तुम्ही कानातील पाणी बाहेर काढू शकता. कानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. मात्र असं करत असताना कानात चुकनही हाताची बोटं घालू नका.
पाणी शिरलेल्या कानाच्या दिशेने डोकं झुकवून जबड्यांची हालचाल करा
कानात शिरलेली कोणतीही गोष्ट वास्तविक नैसर्गिक पद्धतीने आपोआप स्वच्छ होत असते. त्यामुळे कानात शिरलेलं पाणी आपोआप बाहेर पडतं. मात्र काही कारणांमुळे कानात शिरलेलं पाणी बाहेर पडत नसेल तर ज्या कानातील पाणी बाहेर काढायचं आहे त्या दिशेने डोकं खासी झुकवा. जबडा उघडा आणि बंद करा अशा पद्धतीने हालचाल केल्यामुळे तुमच्या कानातील पाणी बाहेर पडेल.
कुशीवर झोपा
ज्या बाजूच्या कानात पाणी शिरलं आहे त्या बाजूच्या कुशीवर झोपा. गुरूत्वाकर्षणामुळे कानातील पाणी बाहेर पडेल.
इअरबड्सने कान स्वच्छ करा
खरंतर कानातील वॅक्स काढण्यासाठी इअरबड्स वापरू नये असं म्हणतात. मात्र कानातील पाणी बाहेर काढण्यासाठी तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. कानात वरच्यावर इअरबड घाला ज्यामुळे कानातील पाणी बड्सच्या कापसामुळे शोषून घेतले जाईल.
कानावर तळहात ठेवा आणि पंप करा
नैसर्गिक वॅक्यूम पंप टेकनिकने तुम्ही कानात शिरलेलं पाणी बाहेर काढू शकता. यासाठी कानावर तुमचा तळहात ठेवा आणि कानावर हात हलक्या हाताने दाबा आणि कानावरून तो पटकन काढा. ज्यामुळे कानात हवा शिरेल आणि पुन्हा ती बाहेर येईल. या हवेसोबत तुमच्या कानात शिरलेलं पाणी सुद्धा नैसर्गिक पद्धतीने बाहेर येण्यास मदत होईल.
ब्लो ड्रायर वापरा
ब्लो ड्रायर कमी तापमानावर सेट करा. कानापासून एक फुटाच्या अंतरावर ठेऊन तुम्ही कानात ब्लो ड्रायरने गरम हवा सोडू शकता. कानात शिरलेलं पाणी यामुळे सुकून जाईल आणि तुम्हाला लवकर बरं वाटू शकेल.
डॉक्टरकडे जा
जर वरील सर्व उपाय करून कानात शिरलेलं पाणी बाहेर पडलं नाही तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण कानात पाणी राहिल्यामुळे कानात इनफेक्शन होऊ शकते. शिवाय यासाठी चुकूनही कानात बोटे अथवा इतर टोकदार वस्तू घालू नका कारण त्यामुळे तुमच्या कानाचे नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच योग्य ठरेल.
कानात पाणी शिरू नये यासाठी काय करावं?
स्विमिंग करताना अथवा पाण्यात डुंबताना कानात पाणी शिरू नये यासाठी इअर ब्लग अथवा स्विमिंग कॅपचा वापर करा.
पाण्यातून बाहेर आल्यावर त्वरीत टॉवेलने कान कोरडा करा.
निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’
मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक