जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या स्वयंपाकघराच्या स्वच्छतेवर आपल्या घरातील सदस्याचं आरोग्यही अवलंबून असतं. प्रत्येक गृहिणी किचन स्वच्छ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. पण काही वेळा कामाच्या गडबडीत किचनमधील काही जागांची स्वच्छता करणं राहून जातं. त्यामुळे किचनमधील कोणत्या गोष्टी वेळीच स्वच्छ झाल्या पाहिजे हे प्रत्येकीला माहीत असलेच पाहिजे. चला जाणून घेऊया किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी काही टिप्स

किचनमधील ओटा

किचनमध्ये सर्वात जास्त काम होत ते ओट्यावर. दिवसभरात आपण स्वयंपाक करताना याच ओट्यावर कणीक मळतो. भाजी कापतो. तयार झालेले पदार्थ ठेवतो. याचा ओट्यावर आपण इतरही गोष्टी म्हणजे पाण्याच्या बाटल्या आणि इतर बरण्या ठेवलेल्या असतात. त्यामुळे ओट्याची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. बरेचदा आपण काम झाल्यावर ओल्या फडक्याने ओटा पुसतो. पण तेवढंच पुरेस नाही. ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी काही खास टिप्स -

 • स्वच्छ कापड व्हिनेगरमध्ये बुडवून त्याने ओटा पुसा. असं केल्याने ओट्यावर जमा झालेली घाण आणि किटाणुंचा नाश होईल.
 • गुलाबपाणी आणि लिंबाचे काही थेंब मिक्स करा आणि या मिश्रणाने ओट्याची साफसफाई करा. पाहा ओटा आणि किचन कसं सुंगधित होईल.
 • किचनची स्वच्छता आणि गृहिणींचे शत्रू म्हणजे मुंग्या आणि झुरळं. या दोन्हींना किचनपासून दूर ठेवण्यासाठी किचनमध्ये काही चिरून किंवा बनवून झाल्यानंतर ओटा लगेच स्वच्छ करणं गरजेचं आहे.

किचनमधील टाईल्सची स्वच्छता

बरेचदा आपण किचन सुंदर दिसण्याकरता खास टाईल्स लावून घेतो. जर या टाईल्स गॅसजवळ असतील तर त्यावर प्रत्येक वेळी पदार्थ केल्यावर फोडणीचं तेल उडतंच. त्यामुळे त्यांची साफसफाईसुद्धा गरजेची आहे. 

 • टाईल्सवरील डाग व्हिनेगरने पुसून लगेचच गरम पाण्यात साबण घालून धुवून घ्या. पॅराफिन आणि मीठात कापड भिजवून त्याने टाईल्स पुसा. पाहा तुमच्या किचनमधील टाईल्स चमकू लागतील.
 • टाईल्सवर लिंबाने चोळून 15 मिनिटांनी मऊ कपड्याने पुसून घ्या. त्यांची चमक कायम राहील.
 • टाईल्सवर जर पिवळे डाग पडले असतील तर मीठ आणि टर्पेंटाईन तेलाने स्वच्छ करा.
 • लिक्वीड अमोनिया आणि साबणाच्या मिश्रणाने टाईल्सवरील डाग लगेच स्वच्छ होतात.
 • टाईल्सला चमकदार बनवण्यासाठी त्यावर रात्रभर ब्लीचिंग पावडर लावून सकाळी स्वच्छ करा.

किचनमधील कपाटं

किचनमधील कपाटात बऱ्याच बरण्या आणि इतर किचनसंबंधी सामान ठेवतो. पण कधी कधी या बरण्यातील पदार्थ खराब होतात. तसंच कधी ओलसर हात लागल्यास कपाटात कुबट वास येतो. खासकरून पावसाळ्यात कपाटाला ओल लागून नये म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते.   

 • किचनमधील कपाटांची स्वच्छता करण्यासाठी गरम पाण्यात साबन घालून स्पंज किंवा स्क्रबिंग पॅडने स्वच्छ करा. कपाटाचे दरवाजे, हँडल्स आणि खोलण्याची जागा नीट स्वच्छ करा. कारण का याच जागा जास्त घाण आणि चिकट होतात.
 • कपाटांना आतल्या बाजून वॉर्निश पेंट लावून घ्या. ज्यामुळे किडे किंवा झुरळं होणार नाहीत.
 • ग्रीस आणि तेलाचे डाग साफ करण्यासाठी व्हिनेगरने साफ करा. त्याशिवाय लिंबू आणि क्लब सोडा मिक्स करूनही तेलाचे आणि ग्रीसचे डाग निघून जातात.

गॅस शेगडीची स्वच्छता

गॅसवर आपण दिवसभर काही ना काही पदार्थ बनवत असतो. अगदी चहापासून ते पाणी गरम करण्यापर्यंत गॅसचा वापर होतो. बरेचदा पदार्थ करताना ते गॅसवर सांडतात किंवा फोडणी उडते. त्यामुळे किचनमधील गॅस शेगडी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. 

 • आठवड्यातून किमान 2 वेळा गॅसची स्वच्छता नक्की करा. 
 • गॅस पुसताना किंवा धुताना गॅस कनेक्शन सर्वात आधी बंद करा.
 • मग ओल्या स्पंजने गॅसचा वरील भाग, बटन आणि गॅस स्टँड स्वच्छ करा.

सिंकची स्वच्छता

किचनमध्ये ओट्यानंतर सर्वात जास्त वापर होतो तो सिंकचा. त्यामुळे सिंकची सफाई खूपच महत्त्वाची आहे. 

 • सिंक साफ करण्यासाठी 1/2 कप पाण्यात 3-4 टीस्पून व्हिनेगर मिक्स करून सिंकमध्ये लावून थोडा वेळ तसंच ठेवा. नंतर पेपरने पुसा. सिंक एकदम नवीन वाटेल. 

हे सर्व उपाय करताना गृहिणींनी हाताची काळजी घ्या. शक्यतो हातात ग्लोव्हज् घालून किचनची साफसफाई करा. म्हणजे हाताला इजा होणार नाही.

हेही वाचा -

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

कांदा कापताना 'हे' केल्यास डोळ्यातून येणार नाही पाणी

VastuTips: तुमच्या किचनमधील हे वास्तूदोष आजच दूर करा

वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टिप्स