बॉलीवूडमधील अभिनेत्रींचे चाहते जगात सर्वदूर आहेत. सध्या पाकिस्तानी रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी कप्तानाला अक्कल नाही असंही या क्रिकेटरनं रागात म्हटलं आहे. शोएब अख्तर आपल्या फास्ट बॉलिंग आणि राग या दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण या क्रिकेटरचं मन आलं होतं एका बॉलीवूड अभिनेत्री आणि ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून होती मराठमोळी सोनाली बेंद्रे. सोनाली बेंद्रेने जास्त चित्रपट केले नसले तरी तिच्या सौंदर्य आणि अभ्यासू वृत्तीमुळे तिचे अनेक चाहते आहेत.
मुलाखतीदरम्यान सोनालीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं
शोएब अख्तरने मुलाखतीदम्यान स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. सोनाली बेंद्रे शोएब अख्तरला खूपच आवडत होती. इतकी की, तिचं अपहरण करण्यासाठीदेखील शोएब तयार झाला होता. भारतामध्ये मॅच खेळायला आला असता त्याची सोनाली बेंद्रेशी ओळख झाली आणि तिला पाहता क्षणीच त्याला ती खूपच आवडली. त्यानंतर त्याने सोनालीचा ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. इतकंच नाही तर शोएबचं सोनालीवर इतकं प्रेम होतं की, सोनालीचा फोटो कायम त्याच्या पाकिटात असायचा. त्याच्या मते ही त्याने सर्वात मोठी गोष्ट सोनालीसाठी केली होती.
मस्करीत बोलला शोएब
शोएबने विचार केला होता की, सोनालीला प्रपोज करावं आणि तिने जर ते नाकारलं तर तिचं अपहरण करून तिला घेऊन जावं. पण हे त्याने मस्करीत एका मुलाखतीत सांगितलं होतं. दरम्यान सोनालीला याबद्दल विचारण्यात आल्यानंतर तिने आपण क्रिकेटचे चाहते नसल्यामुळे आपल्याला जास्त काही माहीत नाही पण शोएब आपला चाहता आहे हे ऐकून तिने त्याचे मनापासून आभार मानले आहेत. सोनालीचं बऱ्याच वर्षांपूर्वी दिग्दर्शक गोल्डी बेहलबरोबर लग्न झालं असून नुकतीच ती कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देऊन पुन्हा एकदा कामाला लागली आहे. वर्षभर सोनाली कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती आणि प्रत्येक वेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशीही कनेक्ट होती. आपल्याला नक्की काय होत आहे हे तिने धीराने आणि प्रत्येकवेळी चाहत्यांबरोबर शेअर केले. तिने सध्या नव्या प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली असून तिचं चित्रीकरणही या प्रोजेक्टसाठी चालू झालं आहे.
शोएब पुन्हा बरसला पाकिस्तानी संघावर
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला नमवलं. त्याबद्दल शोएबने राग व्यक्त केला आहे. पाकिस्तानी संघाच्या कप्तानाला अक्कल नसून पाकिस्तानी टीम एका घाबरट टीमप्रमाणे खेळली असल्याचंही त्याने म्हटलं आहे. मानसिकरित्या टीम मैदानात नव्हती असंही शोएबने म्हटलं आहे. शिवाय यावेळी पाकिस्तान हरल्यानंतर शोएबने आपला राग व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण पाकिस्तानी जनताही यावेळी पाकिस्तानवर भडकल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधून दिसून येत आहे. त्यामुळे शोएबसारखा अनुभवी बॉलर जर टीमला बोलला नसता तर नवलच. शोएब अख्तर आतापर्यंत बऱ्याच वेळा भारतात येऊन गेला असून त्याने शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान या सगळ्यांशी आतापर्यंत संवाद साधलेला आहे. त्यामुळे बॉलीवूड त्याला अजिबातच नवं नाही.
हेदेखील वाचा –
#KasautiiZindagiiKay2 : मोलोय बासूंना पुन्हा एकदा मिळालं जीवनदान
आशुतोष गोवारीकरच्या पानिपतमधून अभिनेत्री ‘झीनत अमान’ यांचा कमबॅक