आशुतोष गोवारीकरच्या पानिपतमधून अभिनेत्री ‘झीनत अमान’ यांचा कमबॅक

आशुतोष गोवारीकरच्या पानिपतमधून अभिनेत्री ‘झीनत अमान’ यांचा कमबॅक

एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमान पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहेत. आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी चित्रपट पानिपतमधून त्या कमबॅक करत आहेत. पानिपतमधील 'सकीना बेगम'ची भूमिका झीनत साकारणार आहेत. झीनत अमान यांचे आजही अनेक चाहते आहेत. अनेक वर्षांपासून झीनत अमान चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. सहाजिकच झीनत अमान यांच्या या दमदार कमबॅकमुळे त्यांचे चाहते नक्कीच खुष झाले आहेत.

instagram

आशुतोषचा आगामी चित्रपट पानिपत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आशुतोष गोवारीकर त्यांच्या आगामी चित्रपट पानिपतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सध्या या चित्रपटाचं शूटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे. या चित्रपटाचं कथानक अफगाणी आणि मराठ्यांच्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित असणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जून कपूर आणि संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. अर्जून कपूरने नुकताच त्याच्या पानिपतमधील फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला होता. या लुकसाठी अर्जूनने विशेष मेहनत घेतली आहे. तो या चित्रपटात मराठा योद्धा 'सदाशिव रावां'ची भूमिका साकारणार आहे. तर संजय दत्त 'अहमद शाह अब्दाली'ची भूमिका साकारणार आहे.चित्रपटात अहमद शाह अब्दाली आणि सदाशिव यांची लढाई दाखविली जाणार आहे. अभिनेत्री क्रिती सनॉन या चित्रपटात सदाशिव रावांची दुसरी पत्नी 'सावित्रीबाई' यांची भूमिका साकारत आहे. या कलाकारांसोबतच पानिपतमध्ये मोहनिश बहल, कुणाल कपूर, पद्मिनी कोल्हापूरे यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. 6 डिसेंबर 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

झीनत अमान साकारणार सकीना बेगम

पानिपतच्या युद्धातील 'सकीना बेगम' हे एक महत्त्वाचं पात्र आहे. सकीना बेगम या होशियारगंजच्या शूर लढवय्या होत्या. त्यांनी पानिपतच्या लढाईत सदाशिव रावांना मदत केल्याची नोंद इतिहासात आहे. झीनत अमान पानिपतच्या शूटिंगला पुढील आठवड्यापासून सुरूवात करणार आहेत. या चित्रपटात सकीना बेगमचा लुक कसा असेल आणि त्यांची भूमिका नेमकी कशी असेल याबाबत चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली आहे. यापूर्वी झीनत अमान यांनी आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत 'गवाही' या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. सहाजिकच आता तब्बल तीस वर्षांनी हे दोघं पुन्हा एकत्र येऊन काम करत आहेत.

instagram

झीनत अमान यांचं चित्रपट करिअर

झीनत अमान यांनी त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयाने सत्तर आणि ऐंंशीचा काळ गाजवला होता. 1970 मध्ये झीनत अमान यांनी 'फेमिना मिस इंडीया' आणि 'मिस एशिया पॅसिफिक' या स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'हरे कृष्णा हरे राम' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सत्यम शिवम सुंदरम, यादों की बारात, प्रेमपुजारी, हिरापन्ना अशा अनेक चित्रपट त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे हिट ठरले. ऐंशीच्या काळातील एक 'हॉट अॅंड सेक्सी' हिरॉईन अशी त्यांची इमेज होती. 2003 ते 2012 पर्यंत झीनत यांनी बूम, अग्ली और पग्ली, स्ट्रिंग्ज ऑफ पॅशन अशा काही चित्रपटातून काम केलं होतं. मात्र आता बरेच दिवस त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. मात्र आता झीनत अमान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एक दमदार कमबॅक करत आहेत. त्यामुळे बॉलीवूडच्या झिनी बेबीला अनेक चाहते त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत.

आणखी वाचा-

IndvsPak: सलमान खानपासून तैमूरपर्यंत पूर्ण बॉलीवूडने साजरा केला भारताचा विजय

शाहरुख आणि त्याचा Handsome मुलगा आर्यन दिसणार एकाच चित्रपटात

जान्हवी कपूरचा बेली डान्स सोशल मीडियावर व्हायरल

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम