आयुष्यातली काही नाती आपल्याला देवाकडून न मागताच मिळालेली असतात. जसं आई-वडील, भाऊ-बहीण आणि जवळचे नातेवाईक. पण या सगळ्यात एक नातं असं असतं जे आपण स्वतः निवडतो किंवा जोडतो. समाजात आजही या नात्याला मान्यता मिळालेली नाही. पण तरीही हे नातं खूपच अनमोल आहे. राधा-कृष्णाचं प्रेमही असंच होतं. कृष्णाचं लग्न जरी रूक्मिणीशी झालेलं असलं तरी आजही कृष्णाचं नाव राधेसोबत घेतलं जातं. त्यांची पूजाही एकत्र केली जाते. पहायला गेलं तर त्यांचं प्रेम अपूर्ण असूनही ते पूर्ण होतं. यालाच म्हणतात खरं प्रेम. आजची #MyStory ही अशीच काहीशी आहे. जी पाठवली आहे जयपूरच्या फरहानने. ज्याचं प्रेम कधी पूर्णत्वाला तर नाही गेलं पण तरीही त्या मुलीची आजही त्याच्या मनात जागा कायम आहे. जिने त्याला एकत्र आयुष्य काढण्याचं वचन दिलं होतं. चला जाणून घेऊया फरहानच्या अपूर्ण प्रेमाची गोष्ट.
“मला आजही लक्षात आहे तो दिवस जेव्हा मी पहिल्यांदा तिला कॉलेजमध्ये पाहिलं होतं. एकदा पाहताच थेट ती नजर हृदयाला भिडली. तिला पाहताच काळ थांबला असं वाटलं. मी कॉलेजमधल्या नेतागिरी करण्याऱ्या मुलांमध्ये होतो आणि ती हसतखेळत अभ्यास करणारी मुलगी होती. अनेक दिवस वाट पाहून अखेर एक दिवस मी तिला गाठलंच. ती घाबरली आणि तिच्या मैत्रिणींसोबत तिथेच थांबली. मी तिला नाव विचारलं. तिने हळू आवाजात तिचं नाव सांगितलं. तिचं नाव स्वाती होतं. मी माझं नाव तिला सांगितलं आणि विचारलं माझ्याशी मैत्री करशील? ती घाबरून ओके म्हणाली आणि तिथून निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि बोलू लागलो. मी माझ्याबद्दल तिला सांगितलं. हळूहळू तिच्या मनातली माझ्याबद्दलची भीती कमी झाली. ज्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला.
काही महिन्यातच आम्ही चांगले मित्र झालो. आता तिच्या मनातली प्रत्येक गोष्ट ती माझ्याकडे शेअर करू लागली. माझं तर तिच्यावर आधीपासूनच प्रेम होतं. एक दिवस हिम्मत करून मी माझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. पण तिला वाटलं की, मी गंम्मत करतोय. पण तिने जेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू बघितले तेव्हा ती शांत झाली आणि तीसुद्धा रडू लागली. त्यावेळी मला वाटलं की माझं काही चुकलं की काय? कारण ती रडत रडत कॉलेजच्या बाहेर निघून गेली आणि तिच्या घरी गेली.
एक आठवड्यांपर्यंत तिचा काहीच मेसेज किंवा कॉल आला नाही. मला वाटलं जसं मी माझं प्रेम आणि मैत्री दोन्ही गमावली. मग एक दिवस तिचा फोन आला. ती सॉरी म्हणाली. मी म्हटलं मलाच तुला सॉरी म्हणायला हवं. मी वचन देतो की, आता पुन्हा कधीच तुझ्याशी प्रेमाबद्दल काही बोलणार नाही. नेहमी एक चांगला मित्र म्हणून राहीन. मग दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल झालं. पुन्हा पहिल्यासारखी मैत्री आणि मजा-मस्करी सुरू झाली. याच दरम्यान मला तिच्या छोट्या बहिणीने सांगितलं की, स्वातीचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे पण ती कधी तुला सांगणार नाही. कारण आमच्या घरी हिंदू-मुस्लीम नात्याला कोणीही मान्यता देणार नाही. ती काही बोलत नाही पण खूप रडते. त्या दिवशी मला असं वाटलं की, जसं माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट मिळाली आहे. दुसऱ्याच दिवशी मी तिला विचारलं की, खरंखरं सांग की, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. ती खोटं बोलू शकली नाही आणि हो म्हणाली.
त्या दिवशी तर मला अगदी हवेत असल्यासारखचं वाटू लागलं. मला जगातला सगळा आनंद मिळाल्यासारखं वाटलं. आमच्या प्रेमाची गाडी सुरू झाली. पाहता पाहता तीन वर्ष पूर्ण झाली आणि कॉलेजचा शेवटचा दिवस आला. परीक्षा संपली तरी वर्गाच्या बाहेर आलीच नाही. मी आत जाऊन पाहिलं तर ती रडत बसली होती. तिला रडताना बघून मलाही रडू आलं. कारण आम्हाला माहीत होतं की, आता रोज रोज भेटणं शक्य होणार नाही. थोड्यावेळाने ती घरी निघून गेली आणि मी फक्त पाहत राहिलो. पण देवाने माझं ऐकलं आणि तिचं अॅडमिशन दिल्लीतल्या एका एमबीए कॉलेजमध्ये करण्यात आलं. मलाही दिल्लीमध्येच नोकरी लागली. आम्ही पुन्हा भेटू लागलो. वेळ जाऊ लागला. आता आम्ही ठरवलं की, काहीही होवो आपल्या या नात्यांबद्दल घरच्यांना सांगायचंच.
तिने तिच्या घरच्यांना सगळं सांगितलं. मग तिच्या घरच्यांनी काहीही वेळ न दवडता तिला घरात कैद केलं. पैसे आणि मोबाईलही काढून घेतला. बरेच दिवस झाले तिचा काहीच कॉल किंवा मेसेज आला नाही. मग अचानक एक दिवस तिच्या बाबांच्या फोनवरून तिने कॉल करून सांगितलं की, जर आपलं लग्न झालं तर माझे बाबा माझ्या आईला मारून टाकतील. त्यावेळी माझ्या तोंडातून काहीच शब्द आले नाहीत आणि ती फक्त माझी माफी मागत राहिली. ती ज्या वेदनेतून जात होती ती वेदना फक्त मीच समजू शकत होतो.
काही दिवसानंतर तिचं लग्न लखनौमध्ये झालं. तिच्या लग्नाला 3 चं महिने झाले आणि तिच्या नवऱ्याचा भयानक अॅक्सीडंट झाला. तिच्या नवऱ्याचा पूर्ण चेहरा डॅमेज झाला आणि एक डोळाही गेला. मी त्याला पाहायला लखनौला गेलो. जसं मी आतमध्ये गेलो तसं ती समोरच उभा होती, मला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मी तिला मिठी मारली आणि तिचे अश्रू पुसले. पण आता तिच्यावर माझा काहीच हक्क राहिला नव्हता.
हळूहळू तिच्या नवऱ्याची तब्येत सुधारू लागली. आजही जेव्हा ती एखाद्या प्रोब्लेममध्ये असते तेव्हा ती मलाच फोन करते. काहीही न बोलता फक्त रडते आणि मन हलकं करते. नंतर बोलेन असं सांगून फोन ठेवून देते. आमच्या प्रेमात कोणतीही अट नाही किंवा स्वार्थही नाही. आम्ही जेव्हा एकमेंकाची गरज पडते तेव्हा मदत करतो आणि असाच विचार करतो की, आमचं प्रेम पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही. पण तरीही प्रत्येक पावलावर आम्ही एकमेंकाना साथ देत आहोत आणि देत राहू.
तुमच्या आयुष्यातही एखादी अशी व्यक्ती आहे का किंवा एखाद्या मैत्रिणीच्याबाबतीत असा किस्सा घडला आहे का, आम्हाला सांगा. आम्हीही #POPxoMarathi वर सांगू तुमची #MyStory.
फोटो सौजन्य – Instagram
हेही वाचा –
#MyStory: आजही साखरपुड्याचा तो क्षण आठवला की…
#MyStory: माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम अशाप्रकारे मिळेल असं वाटलं नव्हतं
#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….