पावसाळा सुरु झाला की, वडापाव आणि भजीची एक तलपच आपल्याला येत असते. घरी तर आपण हे करून खातोच. पण मुंबईची शान असलेल्या वडापावची अप्रतिम चव काही ठिकाणी लाजवाब मिळते. या ठिकाणी जाऊन खास तिथला वडापाव खाणं ही एक मजा आहे आणि अशा पावसाळी दिवसात आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वडापाव खाण्याची मजा काही औरच. मुंबई आणि वडापाव हे समीकरणच वेगळं आहे. इथे कितीतरी लोक असे आहेत जे वडापाव खाऊन जगतात. वडापाव हा जिभेला चव देणारा एक वेगळाच पदार्थ जगभरात प्रसिद्ध झालाय. कधीही कोणत्याही वेळी वडापाव खाऊ शकतो. पण हे विशिष्ट आणि अप्रतिम चवीचे वडापाव तुम्हाला मुंबईत काही ठिकाणी जाऊन खायलाच हवेत. ही ठिकाणं तुम्हाला माहीत नसतील तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देतोय आणि नक्की या ठिकाणांना जाऊन तुम्ही भेट द्या.
मुंबई आणि वडापाव हे वेगळंच समीकरण आहे. मुंबईमध्ये आलात आणि वडापाव खाल्ला नाही तर काय केलं असा प्रश्नही पडतो. खरं तर वडापाव ही मुंबईची शान आहे. त्यामुळे इथे नक्की कुठे अप्रतिम वडापाव मिळतील याची खास माहिती तुमच्यासाठी.
आरामचा वडापाव माहीत नाही असा एकही माणूस कदाचित मुंबईत सापडणार नाही. सीएसटीला गेल्यावर आरामचा वडापाव खाल्ला नाही असं नक्कीच होत नाही. लाल चटणी आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह केला जाणारा हा वडापाव लोकांच्या जीभेला खूपच चांगली चव मिळवून देतो. तसंच इथे वेगवेगळ्या प्रकारचे वडा पाव तुम्हाला मिळतात, ज्यामध्ये अगदी शेजवान वडापावचाही समावेश आहे.
खरं तर अशोक वडापाव हा किर्ती कॉलेजजवळील वडापाव याच नावाने प्रसिद्ध आहे. याची स्पेशालिटी म्हणजे तुम्हाला वडापावबरोबरच भरभरून बेसनचा चुराही देण्यात येतो, जो चवीला अप्रतिम लागतो. वेगवेगळ्या चटणींबरोबर मिळणारा हा चविष्ट वडापाव कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्येच नाही तर अगदी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे.
श्रीकृष्ण वडापावचा वडा हा इतर ठिकाणी मिळणाऱ्या वड्यांच्या तुलनेत खूपच मोठा असतो. साधारण एक वडापाव खाल्ल्यानंतर तुमचं पोट नक्कीच भरतं. या वड्याच्या भाजीची चव वेगळी असल्यामुळेच हा वडापाव मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. शिवाय याठिकाणी वडापावला सतत मागणी असल्यामुळे तुम्हाला नेहमी फ्रेश आणि गरम वडापावच मिळतात.
विलेपार्लेमध्ये पार्लेश्वर मंदिराजवळ मिळणारा हा वडापाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला वडापाव खाण्यासाठी नेहमीच गर्दी दिसून येते. इथे वडापावची विविध व्हरायटी तुम्हाला मिळते. बटर, चीज इत्यादीसह या ठिकाणी वडापाव मिळतो. अगदी रेग्युलर वडापावपासून ते वेगवेगळ्या वडापावसाठी इथे लोक चव चाखायला येतात.
पार्ला स्टेशन पूर्वेला उतरल्यानंतर लगेचच डाव्या हाताला असणारं बाबू वडापावच्या दुकानातून वडापाव घेतल्याशिवाय जाणं शक्यत नाही. लाल तिखट आणि हिरव्या मिरचीबरोबर मिळणाऱ्या या वडापावची चव काहीशी न्यारीच. या वड्याचा आकारही थोडा मोठा असतो. एक वडापाव खाल्ल्यावर पोट भरून जातं. पण याची चव इतकी चांगली आहे की, तुमचं मन काही भरत नाही.
भांडुपला मिळणारा भाऊचा वडापाव हा इतर वडापावच्या तुलनेत खूपच मोठा असतो. याचा केवळ वडाच नाही तर त्याचा पावही मोठा असतो. या वडापावचं वैशिष्ट्य म्हणजे त्याबरोबर मिळणारी ओल्या खोबऱ्याची चटणी. बऱ्याचदा हिरव्या मिरचीची चटणी आणि लाल चटणीबरोबर वडापाव मिळतो. पण याठिकाणी ही ओल्या खोबऱ्याची चटणी आणि वडापावची चव काही औरच आहे.
भायखळा स्टेशनबाहेर मिळणाऱ्या या वडापावची किर्ती सर्वदूर पसरली आहे. हा वडापावचा गाडीवाला ग्रॅज्युएट असूनही वडापाव विकतो त्यामुळे त्याने आपल्या वडापावच्या गाडीचं नाव ग्रॅज्युएट असं ठेवलं आहे. या वडापावची चव इतरांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. जास्त तिखट नसलेला हा वडापाव लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तसंच वडापावबरोबर मिळणाऱ्या विविध चटणी हे येथील वैशिष्ट्य आहे.
गेल्या 20 वर्षांपासून बोरीवलीकरांना वडापावची चव चाखवणारा मंगेश वडापाव म्हणजे बोरीवलीची शान आहे. खजूर आणि चिंचेपासून बनवण्यात आलेली गोड चटणी आणि हिरव्या मिरच्यांची चटणी हेच या वडापावचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला इथे गर्दी दिसून येते.
गोरेगाव पश्चिमेला स्टेशनच्या जवळ असणारा हे दुकान म्हणजे गोरेगावकरांसाठी पर्वणी असली तरी हा वडापाव प्रसिद्ध आहे. कायम गरम वडापाव इथे मिळतो. शिवाय इथे केवळ चारच तास हे दुकान चालू असतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे इतर चटण्यांसह या वडापावमध्ये कांदा आणि मिरचीची चटणी घातली जाते. या आंबट चटणीमुळे एक वेगळीच चव या वडापावला मिळते.
एल्फिन्स्टन स्टेशनवरील स्टॉलवर मिळणारा वडापावही प्रसिद्ध आहे. आता या स्टेशनचं नाव प्रभादेवी झालं आहे. या स्टेशनवर मिडल लेडिज डब्याजवळ याचा स्टॉल आहे. इथे नेहमीच गर्दी असते. महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला कधीही थंड वडापाव खायला मिळत नाही आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे. शिवाय याची चव अप्रतिम असल्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते.