मासिक पाळीच्या आधी आठवडाभर या कारणांमुळे तुम्हाला जाणवतो थकवा

मासिक पाळीच्या आधी आठवडाभर या कारणांमुळे तुम्हाला जाणवतो थकवा


मासिक पाळी ही दर महिन्याला महिलांना अनुभवावी लागणारी एक शारीरिक अवस्था आहे. मात्र प्रत्येक स्त्रीसाठी मासिक पाळीमध्ये जाणवणाऱ्या समस्या निरनिराळ्या असतात. काहींना मासिक पाळी सुरू असताना जास्त त्रास होतो तर काहींना मासिक पाळी येण्याच्या आधीआठवडाभर शारीरिक थकवा जाणवतो. ज्यांना  आठवडाभर आधीपासून मासिक पाळीचा त्रास जाणवू लागतो त्यांना याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज असते. कधी कधी यामुळे ताप येतो, पोटात दुखतं, मळमळ होऊ लागतं तर कधी कधी एखादीचे यामुळे स्तनदेखील फार संवेदनशील होतात. यामुळे मासिक पाळीचे चार-पाच दिवस तर त्रास होतोच शिवाय त्याआधी कमीतकमी आठवडाभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी तुम्हाला असा त्रास का होतो यामागे अनेक कारणे असू शकतात. यासाठी याची ही प्रमुख कारणे आणि लक्षणे नक्की वाचा. 

Shutterstock

तुमचे ओटीपोट फुगते आणि दुखू लागते

मासिक पाळीच्या आठवडाभर आधी तुम्हाला पोट जड आणि फुगल्यासारखे वाटू लागते. याचा अर्थ एका रात्रीत तुमचे वजन नक्कीच वाढलेले नाही. तुमचे पोट मोठे दिसते कारण तुमच्या पोटात पाण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. मासिक पाळी आधी तुमच्या शरीरातील Progesterone या हार्मोनची पातळी कमी होते. ज्यामुळे तुमच्या स्तनांमध्ये आणि पोटामध्ये अतिरिक्त पाणी पातळी साठू लागते. ज्यामुळे तुम्हाला युरिनला साफ होत नाही. पाणी पिऊनदेखील तुम्हाला सतत डिहायड्रेशनचा त्रास होतो. यासाठी जास्तीत जास्त फळं, फळांचा रस, सूप असे द्रवयुक्त पदार्थ खा. आहारात साखरेचे आणि तिखटाचे प्रमाण  कमी करा. ज्यामुळे तुमचे पोट दुखणार नाही. 

Shutterstock

वारंवार पोट बिघडते -

पाळी येण्याच्या आठवडाभर आधी तुमच्या पोटाच्या समस्या अचानक वाढतात. तुम्हाला एक तर डायरियाचा त्रास होतो किंवा बद्धकोष्ठता जाणवते. याचा तुमच्या आहाराशी संबंध नसून तुमची मासिक पाळी येण्यासोबत आहे. पोटदुखी आणि पोटाच्या समस्यांसाठी तुमच्या शरीरातील Prostaglandins हे हॉर्मोन कारणीभूत आहे. कधी कधी Oestrogen आणि Progesterone या दोन्ही हार्मोन्सच्या बदलांमुळेदेखील तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पाळीच्या आठवडाभरआधी तुम्हाला वारंवार पोट बिघडण्याचा त्रास जाणवू शकतो. 

गोड खाण्याची इच्छा होते -

मासिक पाळी जवळ आली की तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होते. कारण तुमच्या शरीरातील Cortisol हार्मोन्सच्या बदलामुळे तुम्हाला हे शुगर कार्विंग जाणवत असतं. ज्यामुळे तुम्ही भरपूर गोड खाता  आणि तुमचं आरोग्य आणखीनच बिघडतं.  

सतत झोप येते -

मासिक पाळीच्या आधीच्या आठवड्यात तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त झोप येते. रात्रीच नाही तर दिवसादेखील तुम्हाला फक्त झोपून राहावसं वाटतं. कारण या काळात शरीरातील Oestrogen या हॉर्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं आणि निरुत्साही वाटत असतं. म्हणूनच या काळात झोप येणं स्वाभाविक आहे. असं वाटत असेल तर पुरेशी झोप घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. 

Shutterstock

चेहऱ्यावर पिंपल्स येतात -

ज्या मुलींची त्वचा तेलकट असते त्यांना चेहऱ्यावर अॅक्ने अथवा पिंपल्स येण्याची समस्या वारंवार जाणवते. मात्र मासिक पाळीच्या आठवडाभर आधी अशा महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतातच. याचे मुख्य कारण  या काळात शरीरातील Testosterone हार्मोन्सची पातळी जास्त प्रमाणात वाढलेली असते तर Estradiol या सेक्स हॉर्मोन्सची पातळी कमी झालेली असते. ज्यामुळे Sebaceous या ग्रंथीतून अतिरिक्त तेलाची निर्मिती होते. तेलकट त्वचेवर धुळ, प्रदूषणाचा संपर्क झाल्यास बक्टेरिया मिसळल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. 

मायग्रेन असल्यास या काळात फार डोके दुखू लागते -

मायग्रेनची डोकेदुखी जीव नकोसा करते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर मासिक पाळीच्या आठवडाभर आधी तुम्हाला ही डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर जाणवते. मासिक पाळी सुरू होण्याआधी शरीरातील हॉर्मोन्समध्ये झालेल्या बदलांचा हा एक परिणाम असू शकतो. म्हणूनच या काळात तुमच्या मायग्रेनवरील औषधांना जवळच ठेवा. कारण तुम्हाला या आठवड्यात त्याची नक्कीच गरज भासू शकते.