आजकाल जीवनशैलीतील झालेले बदल आणि चुकीची आहार पद्धती यांचा आरोग्यावर चुकीचा परिणाम होताना दिसून येत आहे. जीवनशैलीतील या बदलांमुळे काही आजार आजकाल अगदी सामान्य झाले आहे. त्यामुळे रक्तदाब, मधुमेह असे आजार तर जीवनशैली विकारात गणले जातात. वास्तविक रक्तातील साखर वाढल्यामुळे मधुमेहाची समस्या निर्माण होते. जगभरात सध्या मधुमेहींची संख्या वाढत आहे. कारण जगभरात दहा पैकी तीन लोकांना मधुमेह असण्याची शक्यता असू शकते. जीवनशैली विकार असला तरी मधुमेहावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर त्याचे अनेक घातक परिणाम होऊ शकतात. रक्तातील साखर अती प्रमाणात वाढल्यामुळे मधुमेहींना ह्रदय अथवा मेंदूचा झटका येण्याची शक्यता वाढते. यासाठीच मधुमेंहींनी आहाराबाबत सावध असणं फार गरजेचं आहे. जर मधुमेहींच्या आहारात निरनिराळ्या प्रकारच्या डाळी असतील तर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेऊ या. ज्यामुळे मधुमेह नसणाऱ्या लोकांनाही आहारात डाळ असण्याचे महत्व नक्कीच पटू शकेल.
मधुमेहींनी का खावी डाळ
डाळीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. शिवाय यामध्ये फॅटचे प्रमाणही कमी असते. मधुमेहींनी आहारातून निरनिराळ्या प्रकारच्या डाळी घेतल्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेशा फायबर्सचा पूरवठा होतो. ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरात पुरेसे फायबर्स असल्यामुळे पचन समस्या कमी होतात. डाळींमध्ये असलेल्या प्रोटीन्स मुळे त्यांच्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषकमुल्यं मिळतात. यासाठी मधुमेहीच नाही तर प्रत्येकाच्या आहारात डाळ ही हवीच.
निरोगी राहण्यासाठीआहारात या डाळींचा समावेश अवश्य करा –
चणाडाळ –
चणाडाळीमध्ये मुबलक प्रोटीन आणि फॉलिक अॅसिड असते. ज्यामुळे शरीरात नवीन लाल रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते. शिवाय या डाळीमधील ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाणही कमी असते.
मूगडाळ –
मूगडाळ आरोग्यासाठी अतिशय उत्तम डाळ आहे. कारण या डाळीमुळे पित्ताचा त्रास मुळीच होत नाही. पचनासाठी अतिशय हलकी असलेली मूगडाळ गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी फार चांगली असते.
उडीददाळ –
उडीदडाळ जरी पचायला जड असली तरी त्यामधून तुम्हाला चांगले प्रोटीन्स मिळतात. उडीदडाळीमुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण होते. मात्र ही डाळ प्रमाणातच खावी.
राजमा –
अनेकांना राजमा चावल हा खाद्यपदार्थ फार आवडत असतो. राजमा डोळे आणि त्वचेसाठी अतिशय पोषक असतो. एवढंच नाही तर यात फायबर्सदेखील भरपूर असतात. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
काबुली चणे –
काबुली चण्यांना छोले या नावानेदेखील ओळखलं जातं. या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स, फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि आवश्यक मिनरल्स असतात. तुम्ही जरी मधुमेही असला तरी तुम्ही छोले नक्कीच खाऊ शकता. छोले हा पंजाबी पदार्थ अनेकांच्या आवडीचा असतो. तो जितका चविष्ठ आहे तितकाच पोषकदेखील आहे.
म्हणूनच मधुमेहींनीच नाही तर सर्वांनीच आपल्या दैनंदिन आहारात निरनिराळ्या डाळींचा समावेश जरूर करायला हवा. मधुमेहींनी डाळी खाल्या तर त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि त्यांना दिवसभर उत्साही वाटेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
जेस्टेशनल डायबिटीस (Gestational Diabetes) असल्यास अशी घ्या काळजी
यासाठी आहारात असाव्यात या सुपरसीड्स