DIY : खोकल्यासाठी घरीच तयार करा होममेड कफ सिरप

DIY : खोकल्यासाठी घरीच तयार करा होममेड कफ सिरप

वातावरणात झालेले बदल आणि इनफेक्शन यामुळे सर्दी, खोकला अशा समस्या डोकं वर काढतात. सध्या  कोरोनाच्या भितीमुळे साधा  सर्दी, खोकलाही चिंतेची बाब वाटू शकते. यासाठीच सर्दी खोकल्यावर लगेच उपचार करायला हवेत. जर तुम्हाला साधं इनफेक्शन अथवा वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर अगदी घरच्या घरी नैसर्गिक घटकांनी तुम्ही यासाठी उपचार करू शकता. यासाठीच जाणून घ्या होममेड कफ सिरप कसे तयार करावे, ते घरीच तयार करण्यासाठी कोणते साहित्य वापरावे आणि सिरप घेण्याचे योग्य प्रमाण किती असावे.

होममेड कफ सिरपचा उपयोग -

होममेड कप सिरपने तुम्ही घरीच तुमचा  खोकला कमी करू शकता. खोकला पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याचे कारण शोधणे गरजेचं आहे. मात्र होममेड कफ सिरपमध्ये सर्व नैसर्गिक घटक असल्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. या कप सिरपमुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो आणि साधा सर्दी खोकला असेल तर तो लगेच कमी होतो. 

होममेड कफ सिरप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य -

  • आले 
  • लिंबू
  • मध

आलं,मध आणि लिंबामध्ये नैसर्गिक अॅंटि इनफ्लैमटरी, अॅंटि व्हायरल, अॅंटि ऑक्सिडंट आणि विषाणूंचा नाश करणारे घटक असतात ज्यामुळे तुमचे इनफेक्शन पासून संरक्षण होते. 

Shutterstock

होममेड कफ सिरप तयार करण्याची कृती -

आल्याचा मोठा तुकडा घ्या आणि तो स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. लिंबू किसून घ्या. एक कप पाण्यामध्ये पाव कप आल्याचे तुकडे आणि दोन चमचे लिंबाचा कीस टाका. पाच ते दहा मिनीटे ते चांगले उकळून घ्या. एक कप मध थोडे कोमट करून घ्या आणि या पाण्यात मिसळा. त्यानंतर दोन लिंबाचा रस त्यामध्ये मिसळा. मिश्रण थंड होऊ द्या तुमचे होममेड कफ सिरप तयार आहे.

Shutterstock

होममेड कफ सिरप घेण्याचे प्रमाण -

होममेड कफ सिरप घेण्याचे विशेष प्रमाण नाही. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र पाच वर्षांच्या खालील मुलांना तुम्ही एक अथवा अर्धा चमचा होममेड कफ सिरप दिवसातून दोन ते तीन वेळा देऊ शकता. पाच वर्षांच्या वरील मुलांना तुम्ही हे सिरप दिवसातून दोन ते तीन वेळा दोन मोठे चमचे देऊ शकता. आणि बारा वर्षांच्या वरील लोकानी दर चार तासांनी दोन चमचे होममेड कफ सिरप घेण्यास काहीच हरकत नाही. कारण यामुळे हळूहळू तुमचा कफ पातळ होतो आणि  खोकला कमी होतो. 

होममेड कफ सिरप बाबत काही महत्त्वाच्या टिप्स -

  • तुम्ही होममेड कफ सिरप आयत्यावेळी तयार करू शकता अथवा जास्तीचे तयार करून फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता.
  • होममेड कफ सिरप तयार करण्यासाठी सेंद्रिय आणि चांगल्या गुणवत्तेची मध वापरा. ज्यामुळे लहान मुलांसाठी हे होममेड कफ सिरप गुणकारी ठरेल.
  • जर तुमच्याकडे ताजे अथवा फ्रेश आले नसेल तर तुम्ही आल्याऐवजी सुंठ वापरू शकता.
  • मोठयांसाठी होममेड कफ सिरप तयार करत असाल तर तुम्ही यामध्ये कांदा, लसूण आणि काळीमिरीचाही वापर करू शकता.