‘चहा’ अनेकांसाठी अमृतासमान आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते आणि दिवसाचा शेवटही चहानेच होतो. चहा हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. भारतातील प्रत्येक गल्ली आणि नाक्यावर आपल्याला चहाच्या टपऱ्या पाहायला मिळतात. भारतामध्येच नाही तर जगभरात चहाचे चाहते आहेत. चहाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि प्रकार पाहायला मिळतात. पण आपल्या आहारात चहाचा समावेश का असतो हे तुम्हाला माहीत आहे का? चहा फक्त झोप उडवण्याचे पेय नाही. तर त्याचे अनेक फायदेही आहेत. म्हणूनच त्याचा समावेश आहारात केला जातो. चहा पिण्याचे आश्यर्यचकित करणारे असे फायदे आहेत. हे फायदे जाणून घेत आहारात कशा पद्धतीने चहाचा समावेश करायला हवा ते आपण आता पाहुया. करुया सुरुवात
साधारण चहा म्हटला की, आपल्या डोळ्यासमोर एखाद दोन प्रकार डोळ्यासमोर येतात. पण चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या वेगवेगळ्या चहाचे वेगवेगळे फायदे आणि बनवण्याच्या पद्धतीही आहेत. जाणून घेऊया हे प्रकार
हल्ली सगळ्यात जास्त ज्या चहाचा बोलबाला आहे ती म्हणजे ‘ग्रीन टी’. ही एक विशिष्ट वनस्पती असून Camellia sinensis नावाच्या झाडाची ही पानं असतात. ग्रीन टी ही मूळ चीनची असून या ठिकाणी ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ग्रीन टी मध्येही अनेक प्रकार मिळतात. या झाडांची छोटी छोटी झुडुपं असतात. चीननंतर आता संपूर्ण आशिया खंडात हा चहा पिकवला जातो. या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट घटक असून त्याच्या सेवनामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
Camellia sinensis टीपासूनच बनवला जाणारा हा आणखी एक प्रकार म्हणजे ‘ब्लॅक टी’ अनेकांना कोरा चहा म्हणजेच ब्लॅक टीच वाटते. ब्लॅक टी ही ग्रीन टीच्या तुलनेत फार स्ट्राँग असते. त्यामुळे हा चहा प्यायल्यानंतर लवकर तरतरीत झाल्यासारखे वाटते. ब्लॅक टीमध्येही अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे तुमच्या शरीराला अँटी-ऑक्सिडंट पुरवून तुमचे वजन नियंत्रणात ठेवायला मदत करते. या शिवाय शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यात ब्लॅक टी खूप फायदेशीर आहे.
चायनीज ट्रेडिशनल टी म्हणून उलूंग टी ओळखली जाते. ही एक ऑक्सिडाईज करणारी टी असून त्याचे अनेक फायदे आहेत. उलूंग टी पाने लांब आणि गोलाकार असतात. या विशिष्ट पानांमुळे त्याला ब्लॅक ड्रॅगन टी असे देखील म्हणतात. आशिया खंडातील तैवान, जपान, चीन, कोरिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी या चहाची शेती केली जाते. या ठिकाणी हा हा मोठ्याप्रमाणावर प्यायला जातो.
चीनमध्ये मिळणारा आणखी एक चहाचा प्रकार फारच प्रचलित आहे. हा चहा ताज्या पानांपासून बनवला जात नाही. तर हा चहा तयार होण्याची एक वेगळी पद्धत आहे. या चहाची पाने काढून ती वाळवली जातात. त्यानंतर ती रोल करुन ठेवली जातात. त्याचा एक गोळा करुनच तो ठेवला जातो. यापासूनच पुढे माचा टी बनवली जाते. या चहाचा स्वाद थोडासा वेगळा असतो. भारतात या चहाचे फार कोणी चाहते नसल्यामुळे हा चहा फार मिळत नाही.
चहाचे वेगवेगळे प्रकार पाहिल्यानंतर चहा पिण्याचे फायदे काय ते आता जाणून घेऊया. हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच चहा प्यायला सुरुवात कराल.
कॅन्सरसाठी घातक असलेल्या घटकांना दूर ठेवण्याचे काम चहा करते. चहामधील घटकामध्ये फारच कमी प्रमाणात कॅफेन असते. जे तुमच्या ह्रदयासंदर्भातील आजार कमी करण्यास मदत करते. दिवसातून एकदा चहा प्यायलात तरी देखील त्याचा फायदा आपल्याला होतो. अनेक अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की, कॉफीमुळे कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले घटक कमी होतात.
अल्झायमर आणि पार्किसन्स यासारखे मेंदूशी संदर्भात आजार दूर करण्याचे काम करते. मेंदूला आराम देत त्यावर आलेला ताण कमी करण्याचे काम चहा करते. चहाच्या सेवनानंतर तुम्हाला तरतरीत झाल्यासारखे वाटते याचे कारण तुमचा थंडावलेला आणि शांत झालेला मेंदू कार्यरत होतो. चहामध्ये असणारे इतर काही घटकही बुद्धीला चालना देण्याचे काम करतात.
चहामुळे दात दुखी कशी काय कमी होऊ शकेल असे तुम्हाला वाटत असेल तर भारतात वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो. चहामध्ये लवंग, दालचिनी असे घटक घातले जातात. जे नैसर्गिकपद्धतीने दात स्वच्छ करण्याचे काम करतात. दातांमध्ये असलेली किड मारण्याचे काम करतात. यामुळे दातदुखी कमी होण्यास मदत मिळते.
चहामधील ग्रीन टी हा प्रकार अँटी एजिंगचे फायदे पुरवतो. विशिष्ट चहाच्या पानांपासून हा चहा केला जातो. या चहाच्या सेवनामुळे बॉडी योग्य पद्धतीने डिटॉक्स व्हायला मदत मिळते. या शिवाय त्वचेवरील ताण कमी करुन त्वचेवरील वार्धक्याच्या खुणा कमी करण्याचे काम करते. दिवसातून दोन वेळा तुम्ही ग्रीन टीचे सेवन केले तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.
अनेकांना चहाची तल्लफ असते. चहा प्यायल्यानंतर अनेकंना शांत वाटते. यामागचे कारण चहाची तल्लफ नाही. तर चहामधील घटक शरीरावरील ताण दूर करतात. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते. ग्रीन टीमध्ये असलेले एल थिमाईन आणि अमिनो अॅसिड मनावरील आणि शरीरावरील ताण कमी करुन तुम्हाला रिलॅक्स करते.
तुम्हाला चहा आवडत असेल किंवा नव्याने चहा करत असाल तर तुम्ही चहाच्या रेसिपी नक्कीच करु शकता.
आल्याचा चहा हा अनेकांच्या आवडीचा असतो. हा चहा बनवणे फारच सोपे असते. आल्याचे फायदे अनेक आहेत. चहामध्ये घातल्यानंतर आल्याच्या ठसक्यासोबतच त्याचे अनेक फायदेही मिळतात.
साहित्य : ½ इंच आल्याचा तुकडा, 2 चमचे चहा पावडर, एक कप दूध (किंवा अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध), 2 चमचे साखर
कृती : चहाचे भांडे घेऊन त्यामध्ये दूध किंवा पाणी घ्यावे. दूधाला थोडी उकळी आली की, त्यामध्ये आलं किसून घाला.
चहा पावडर घालून त्याला चांगला रंग आला की, मग तुम्ही त्यामध्ये साखर घाला. चांगली उकळी काढून घ्या.तुमचा मस्त आल्याचा चहा तयार!
मसाला चहा हा देखील अनेकांना आवडतो. मस्त चहामसाला घालून हा चहा केला जातो. मसल्याच्या चहाचा मसाला हा बाजारात मिळतो. हा चवा चवीला थोडासा कडक आणि तिखट असतो.
साहित्य : रेडिमेड चहा मसाला एक लहान चमचा किंवा चवीनुसार, एक कप दूध, 2 चमचे साखर, 2 छोटे चमचे चहा पावडर
कृती : एका भांड्यात चहासाठी पाणी किंवा पूर्ण एक कप दूध घेऊन त्यामध्ये रेडिमेड चहाचा मसाला घालून चहा चांगला उकळून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये चहा पावडर आणि साखर घालून चहाला चांगली उकळी येऊ द्या.
सगळ्यात सोपी आणि हल्का फुल्का चहा म्हणजे ग्रीन टी. हल्ली बाजारात ग्रीन टीच्या रेडिमेड डिप बॅग्ज मिळतात. ज्या तुम्हाला फक्त गरम पाण्यात डीप करायच्या असतात.
या प्रकारामध्ये हल्ली तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर मिळतात. लिंबू, आलं, हळद असे वेगवेगळे घटक असलेला चहा हल्ली बाजारात सहज मिळतात.
मसाला चहाप्रमाणे वेलचीचा वापर करुनही चहा बनवला जातो. हा चहाही तसा थोडा स्ट्राँग आणि रिफ्रेशिंग असतो. अनेकांना वेलचीचा स्वाद यामध्ये आवडत नाही. पण तरीही तुम्हाला हा चहा ट्राय करायला काहीच हरकत नाही.
साहित्य : एक वेलची, एक कप दूध किंवा पाणी, 2 चमचे साखर, 2 चमचे चहा पावडर
कृती : चहाच्या भांड्यात दूध गरम करुन त्यामध्ये चहा पावडर, साखर घालून चांगले उकळवून घ्या.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेलचीचे दाणे कुटून घाला. गरम गरम चहा सर्व्ह करा.
आपल्या इथे प्युअर ब्लॅक मिळणे फारच कठीण असते. पण जर तुम्हाला ती मिळाली की, तुम्ही थेट पाण्यात एक चमचा ब्लॅक टी घेऊन ती छान उकळून घ्या. गाळून चहामध्ये लिंबू पिळून अशा चहाचा आस्वाद घ्या.
चहा रोज पिण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे पोटाला हवे असलेले काही घटक मिळतात. चहाचे फायदे पाहता दिवसातून एकदा तरी चहा प्यायलाच हवा. पण चहा पिणे काही जणांसाठी व्यसन होऊन जाते. चहाचे सतत सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसे घातक आहे. त्यामुळे चहाचे सेवन दररोज करताना तुम्ही किती वेळा आणि किती चहा पिता हे ही जाणून घ्या नाहीतर त्याचे दुष्परिणाम होतात.
आलं- वेलची- दूध आणि वेगवेगळे चहा मसाले करुन चहा बनवण्याची ही पद्धत भारतात जास्त प्रचलित आहे. अनेक ठिकाणी आजही चहा हा कोरा प्यायला जातो. पण कोऱ्या चहाच्या तुलनेत दुधासोबत घेतलेला चहा अधिक चविष्ट लागतो. शिवाय त्यामुळे दूधही पोटात जाते. त्यामुळे चहात दूध घालून प्यायल्याने फार काही नुकसान होत नाही. पण त्याचे प्रमाण योग्य असायला हवे हे आपण विसरता कामा नये.
उपाशी पोटी चहा हे अॅसिडीटी वाढवण्याचे काम करते. प्रत्येकाच्या शरीर प्रवृत्तीनुसार हा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो उपाशी पोटी चहा पिऊ नये. सकाळी चहा प्यायचा असेल तर तुम्ही दुसरे काहीतरी खा. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. टॅग करा तुमच्या चहाप्रेमी मित्राला आणि मस्त चहाचा आस्वाद घ्या.