गरोदरपणा (Pregnancy) म्हटलं की सगळीकडे खरं तर आनंदीआनंद दिसून येतो. प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील ही महत्वाची आणि अगदी आनंदाची बाब आहे. एखादी महिला पहिल्यांदाच गरोदर असेल तर घरातील मोठ्या व्यक्तींंकडून सल्ले मिळतातच. पण अशावेळी आपणही स्वतः काही माहिती वाचणे आवश्यक असते. आपल्याला बरेच प्रश्न असतात आणि ते प्रश्न प्रत्येकवेळी घरातील व्यक्तींकडून सोडवून मिळतात असं नाही. मग अशावेळी आपल्याला पुस्तकांमधून माहिती मिळत असते. बाजारात गरोदरपणात वाचायची पुस्तके (best books to read during pregnancy in marathi) अनेक आहेत. पण नक्की कोणत्या पुस्तकांमधून आपल्याला चांगली आणि योग्य माहिती मिळेल असाही प्रश्न असतो. तर या लेखातून आम्ही तुम्हाला गरोदपणात वाचायची पुस्तके नेमकी कोणती आणि त्यामधून तुम्हाला काय काय माहिती मिळेल हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. काही पुस्तके अगदी पारंपरिक आहेत. तर काही पुस्तके ही डॉक्टर्सने स्वतःच्या अनुभवातून लिहिलेली आहेत. त्यामुळे गरोदर असताना आम्ही सांगितलेल्या पुस्तकांपैकी पुस्तके तुम्ही नक्की वाचा.
प्रत्येक महिलेचा बाळंतपणाचा अनुभव हा नक्कीच वेगळा असतो आणि खासही. त्यामुळे गरोदरपणात वाचायची पुस्तके कोणती हे तुम्ही या लेखातून नक्की जाणून घ्या. या पुस्तकांमधून तुमचा नऊ महिन्यांचा प्रवास कसा असेल. तुमचे अनुभव नक्की तुम्हाला कशा प्रकारे जाणवतील हे सर्व जाणून घेता येते. तुम्हीही तुमचा हा काळ अप्रतिम घालवा आणि अधिक आनंदी राहा.
आयुर्वेदीय गर्भ संस्कार (Ayurvediy Garbha Sanskar – Dr. Balaji Tambe)
बाळ जन्माला येणार म्हटल्यानंतर सगळीकडे सर्वात पहिला शब्द ऐकायला यायला लागतो तो म्हणजे गर्भ संस्कार (Garbha Sanskar). आईच्या पोटात असल्यापासून त्याला चांगलं चांगलं शिकवणं. त्याला आपण आहोत या गोष्टीची जाणीव करून देणं म्हणजे संस्कार. बाळ हवे आहे असे ठरवल्यापासून, प्रसूती होईपर्यंत आणि बाळ अगदी दोन वर्षांचे होईपर्यंत आईने बाळाची काळजी कशी घ्यायची, गरोदरपणात कशी काळजी घ्यायची, कसे संस्कार करायचे या सगळ्याची माहिती डॉ. बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात देण्यात आली आहे. हे पुस्तक खूप जुनं असून याच्या अनेक प्रती आजपर्यंत विकल्या गेल्या आहेत. इतकंच नाही तर आता या पुस्तकाची ऑनलाईन कॉपीही मिळते.
पारंपरिक भारतीय संस्कार आणि थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, निरोगी बालकासाठी पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, काय खावे, योगासने, कोणते संगीत ऐकावे, आहारयोजना, दैनंदिन आचरण, बाळाचे संगोपन कसे करावे, बाळ अधिक तेजस्वी आणि बुद्धीमान होण्यासाठी नक्की काय काय करायला हवे याची इत्यंभूत माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. या पुस्तकातील भाषाही अत्यंत साधी आणि सोपी असल्याने अगदी पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या महिलांनाही समजणे सोपे होते. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून हे पुस्तक उपलब्ध आहे. तसंच तुम्हाला किंडल (Kidle) वरही हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना अगदी बाजारातून घेऊन येणे शक्य नाही त्यांना ऑनलाईनही हे पुस्तक वाचता येते.
आयुर्वेद हा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय असल्यामुळे त्यात असणार्या आठपैकी एका विभागात अपत्यप्राप्ती व स्त्रीआरोग्य यावर लिहिलेले आहे. त्याच्याच जोडीला रसायन व वाजीकरण हे विभागही तयार केले, रसायन व वाजीकरण जर बरोबर नसेल तर स्त्रीआरोग्य, पुरुष आरोग्य व पर्यायाने अपत्य संस्कारित होणार नाही. आयुर्वेदात या अंगाने अनेक गोष्टी सांगितल्या. त्यासंदर्भातील माहिती स्पष्ट करून सांगण्यात आली आहे.
वास्तविक पाहता, पोटात नऊ महिने गर्भ सांभाळणे हा एक आनंदाचा व उत्सवाचा काळ आहे. गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात काही पथ्ये पाळावी लागतात. काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या संस्काराचाच एक भाग असते. हेच सर्व संस्कार या पुस्तकातून देण्यात आले आहेत.
आजपर्यंत हे पुस्तक लाखो मातांना उपयोगी ठरले आहे. पुढेही नक्कीच याचा लाभ अनेक गर्भवती महिला घेतील यात शंका नाही.
किंमत – रू. 525/-
सुप्रजेसाठी गर्भ संस्कार (Suprajesathi Garbh Sanskar – Dr. Giitanjali Shah)
बाळ होणार इथपासून ते बाळाचा जन्म या सर्व गोष्टींना सर्वात मोठा साक्षीदार असतो तो म्हणजे डॉक्टर. अगदी पहिल्या दिवसापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत आपण सर्वस्वी डॉक्टरांवर अवलंबून असतो. जन्माला येणारे बाळ सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचे ठरतात. मात्र याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. गर्भसंस्कार हा केवळ एखादा धार्मिक विधी नसून विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्रानेदेखील गर्भसंस्काराचे महत्त्व मान्य केले आहे. गर्भधारणा होताना निर्माण होणाऱ्या प्रथम पेशीपासून गर्भावर संस्कार होत असतो. गर्भसंसस्कार हे आईवडिलांच्या विचारातून बाळावर होत असतात. बाळ जन्माला येणाऱ्यापूर्वी मातेच्या मनात बाळाच्या भविष्याविषयी शुभ विचार मनात असतील तर जन्माला येणारे बाळ त्याप्रमाणेच घडते. इतिहासात घडून गेलेली अनेक उदाहरणे याची साक्ष देतात. त्यामुळे येणारी प्रजा ही अत्यंत चांगली असावी असेच सर्वांना वाटते.
असेच संस्कार या पुस्तकातून देण्यात आले आहेत. डॉ. विक्रम शाह आणि डॉ. गीतांजली शाह हे नक्कीच प्रसूतीतज्ज्ञ आहेत. त्यांनी लिहिलेले सुप्रजेसाठी गर्भसंस्कार हे पुस्तक बऱ्याच गर्भवती महिलांसाठी उपयोगी ठरले आहे. सुदृढ दैदिप्यमान संततीसाठी जागरूकतापूर्व गर्भधारणेची तयारी, होलिस्टिक गर्भावस्था, शिशु संगोपन या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये जेव्हा तुम्ही गरोदर राहण्याचा विचार करता तेव्हा तुमच्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरते.
किंमत – रू. 200/-
वंशवेल (Vanshvel – Dr. Malti Karvarkar)
मुलगा असो वा मुलगी असो कोणीही असलं तरीही ती आपल्या वंशाची वेल असते. मुलगा तर फक्त एकच वंश चालवतो. पण मुलगी दोन्ही घरांची शान असते. आपली मुलं जन्मतःच मुकेपणा, बहिरेपणा, मतिमंदत्व यांसारखी काही विकृती घेऊन येऊ नयेत, ती सुदृढ, निरोगी असावीत आणि पुढेही त्यांची चांगली वाढ व्हावी, ती आरोग्यसंपन्न, उत्साही, समंजस, बुद्धिमान निपजावीत असे ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्व भावी मातापित्यांनी गर्भधारणेपासून आपले आहार-नियोजन कसे करावे, मुलांच्या जन्मापासून ती वयात येईपर्यंत त्यांच्या आहाराचे नियोजन कसे करावे यासंबंधी अत्यंत कळकळीने तपशीलवार मार्गदर्शन या पुस्तकात आहारतज्ज्ञ मालती कारवारकर यांनी केले आहे. आपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे पुस्तक!
डॉ. मालती कारवारकर यांच्या अनुभवातून लिहिले गेलेले हे पुस्तक गर्भवती महिलांसाठी नक्कीच उपयोगी ठरते. आपल्या घरात अगदी सुदृढ आणि निरोगी बाळ जन्माला यावं हे सर्वांनाच वाटत असतं आणि त्यासाठी कोणती योग्य काळजी घ्यायला हवी याचा संपूर्ण आराखडा यामध्ये देण्यात आला आहे.
किंमत – रू. 210/-
गृहलक्ष्मी – आई होतांना काय कराल (Grihlaxmi – Aai Hotana Kay Karal)
पहिल्यांदा आई होणं ही एक वेगळीच भावना असते. केवळ होणाऱ्या आईसाठीच नाही तर अगदी घरातील प्रत्येकासाठी. सतत वेगवेगळे मूड होणं. आई म्हणून आपण कसे वागू याचा विचार करणं. यासगळ्या आनंद घेता यायला हवा. जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्हाला अगदी पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण मिळणे गरजेचे असते. प्रसूतीपूर्व आणि पश्चातही पोषणयुक्त आहार आई आणि बाळासाठी कसा असायला हवा. गर्भावस्थेत आपले वजन कसे योग्य राखायला हवे याबाबत माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी हेदेखील कळायला हवे.
सिझर झाले असेल तर तुम्ही खाण्यापिण्याचे व्यवस्थित मोजमापन करायला हवे. कार्ब्स, शाकाहारी जेवण, कॅफीनचे योग्य प्रमाण, पोषणयुक्त जेवण, सुरक्षित पदार्थ या सगळ्याची काळजी घ्यायला हवी. गर्भावस्थेदरम्यानदेखील तुम्ही काय खायला हवे याचे साधारण 175 पदार्थ देण्यात आले आहेत. घरच्या घरी कुटुंबसह तुम्ही तुमची कशी काळजी घ्यायला हवी याची इत्यंभूत माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच हे पुस्तक गर्भावस्थेत वाचायला हवे आणि यातील रेसिपी वापरून पदार्थ बनवून नक्की खा.
किंंमत – रू. 295/-
बुद्धिमान बालकाचा जन्म (Buddhiman Balakacha Janm – Nana Patil)
आपलं बाळ हुशार आणि बुद्धिमान असावं असं कोणाला वाटणार नाही. सगळ्यांनाच आपल्या बाळाने हुशार असावं असं वाटत असतं. त्यासाठी योग्य संस्कार होणंही गरेजेचे आहे. लेखक नाना पाटील यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. शिवाजी महाराजांच्या जन्माआधीच मुघलांनी भारतावर अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली होती. मुघलांच्या अत्याचारामुळे प्रजा त्रस्त झाली होती. जिजाबाईंना प्रजेची ही अवस्था पाहून त्रास होत असे. त्याचवेळी त्यांच्या मनात राष्ट्रसंरक्षणासाठी एखाद्या सत्पुषाचा जन्म आपल्या पोटी व्हावा अशी ईच्छा निर्माण झाली होती. जिजामाता त्यावेळ गरोदर होत्या आणि असं म्हणतात की, जिजामाता यांना शिवाजी महाराज पोटात असताना घोड्यावर बसण्याचे, तलवार बाजीचे, दांडपट्टा चालवण्याचे डोहाळे लागले होते. जिजामाता यांच्या या दिव्य आणि क्रांतीकारक विचारांमधूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली. ज्यामधून गर्भसंस्कारांचे महत्त्व नक्कीच पटू शकते. त्यामुळेच गर्भसंस्काराचे आणि अन्य गोष्टीचे आपल्याकडे महत्व आहे. आता परदेशातही या गोष्टी पाळल्या जात आहेत.
या पुस्तकातून तुम्हाला बाळाबद्दलची योग्य माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू शकता. त्याशिवाय याची किंमतही फारच कमी आणि खिशाला परवडण्यासारखी आहे.
किंमत – रू. 100/-
संपूर्ण गर्भसंस्कार (Sampurna Garbhasankar – Pratibha Hampras)
मराठीमध्ये मुलांवरील गर्भसंस्कारांवर फारच कमी पुस्तकं आहेत ज्यामध्ये योग्य माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी संपूर्ण गर्भसंस्कार हे नक्कीच वाखाखण्याजोगे आणि वाचण्याजोगे पुस्तक आहे. प्रतिभा हॅम्प्रस यानी लिहिलेले हे पुस्तक तुम्हाला गर्भारकाळात नक्की कशी काळजी घेता यावी यासंदर्भात उत्कृष्ट मार्गदर्शन करते. बाळ पोटात असताना नक्की काय काय बदल होतात आणि कशाप्रकारे आपण बाळाशी संवाद साधायला हवा याची माहिती या पुस्तकातून मिळते.
गर्भसंस्कार हा आपल्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान आणि संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण आणि उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्नं असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी व्हावे. आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते. गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथ देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने जर आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक प्रतिभा हॅम्प्रस यांनी देत असल्याचे सांगितले आहे.
किंमत – रू. 125/-
आई होताना – डॉ. सीमा चांदेकर (Aai Hotana – Dr. Seema Chandekar)
गरोदरपणा म्हटला की आधीच थोडी धाकधूक असते. पहिल्यांदाच होणारं बाळ, त्याची काळजी नीट घेता येईल का, बाळाशी कसं वागायचं, पोटात बाळ असताना नक्की काय काय खायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, बाळाशी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे या सगळ्याची माहिती द्यायला अर्थात आपल्या घरात मोठी माणसं असतातच. पण आपल्याला स्वतःलाही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
अपत्याचा जन्म ही मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. या घटनेवर मानवाचे सर्व आयुष्य अवलंबून असते. या घटनेची तयारी खूप आधीपासून केली तरच मानवी जीवन निरामय, यशस्वी, दीर्घायुषी होईल. बालकाच्या जन्माची निसर्गात तयारी कोट्यवधी उत्क्रान्तीत होत आलेली असतेच. शिवाय मातेची आणिपित्याची सुदृढता हा आपल्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग झाला. याची तयारी दोघांच्या जन्मापासूनच घ्यावी लागते. किमान पौगंडावस्थेपासून गृहस्थाश्रमात प्रवेश करते वेळेपर्यंत घेण्याला पर्यायच नसतो. स्त्री-बीज-फलन होऊन, गर्भधारक होऊन, गर्भारपण सुस्थितीत जाऊन सुखरूप बाळंतपण होणे हे तर फारच महत्त्वाचे असते. जन्मल्यापासून आपापली काळजी घेण्याची पात्रता येईपर्यंत मुलाची वाढ आणि विकास यावर बारकाईने लक्ष ठेवणे जरूरीचे आहे. नंतरही संस्कार आणि शिक्षण, शारीरिक सुदृढता आणि मनोबौद्धिक प्रगल्भता इकडे लक्ष द्यावेच लागते. हे सारे करतांना आई-वडील, सर्व कुटुंबीय यांचा नेमका भाग कोणता हे प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे. ‘‘आई होताना’’ या पुस्तकात या आणि यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांचा सखोल परामर्श घेतलेला आहे. प्रत्येक विवाहेच्छू स्त्री पुरुषाने हे पुस्तक वाचले पाहिजे. मूल होण्याचा निर्णय घेताना या पुस्तकाचा अभ्यास केलाच पाहिजे. प्रत्येक घरात हे पुस्तक असलेच पाहिजे.
किंमत – रू. 226/-
गर्भावस्था (Garbhavastha – Vinita Salvi And Meena Prabhu)
आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्मच मानला जातो. प्रत्येक स्त्रीला गर्भधारणा झाल्यापासून असंख्य प्रश्न पडत असतात, ती त्या प्रश्नांची उत्तरं मिळवताना पुरती गोंधळून जाते. या पुस्तकात गरोदरपणासाठी शरीर कसं तयार केलं पाहिजे, गरोदरपणाच्या प्रत्येक महिन्यात काय घडतं आणि कोणती लक्षणं दिसली पाहिजेत, प्रत्येक तिमाहीत केल्या जाणाऱ्या सगळ्या तपासण्या, काय खावं आणि गरोदरपणात व्यायाम कसा करावा, गरोदरपणातील आजारपण, प्रौढ मातांचे पहिल्यांदाच होणारे गर्भारपण आणि अशा उच्च जोखीम असलेली गर्भारपणं कशी हाताळावीत, बाळंतकळा आणि अर्भकाचा जन्म यांसारख्या प्रश्नांची उत्तरं देशातील अत्यंत नामवंत प्रसूतितज्ज्ञ, स्त्रीरोगचिकित्सक असलेल्या आणि उच्च जोखमीच्या प्रसूती लीलया पार पाडणाऱ्या डॉक्टरांनी दिलेली आहेत. विनीता साळवी आणि मीना प्रभू यांच्या अनुभवातून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. यामुळे गर्भावस्थेत असणाऱ्या प्रत्येक महिलेला या पुस्तकातून परिपूर्ण मार्गदर्शन निश्चितच मिळेल.
किंमत – रू. 200/-
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक