एखाद्या नात्याचं ओझं वाटू लागलं ना तर त्या नात्यामध्ये गुंतून राहण्यात काहीच अर्थ नाही. पण तरीही हे नातं कधी ना कधीतरी नीट होईल या आशेवर काही जोडपी आपलं नातं ओढूनताणून पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहतात. पण खरं सांगायचं तर काही नात्यांमध्ये दुरावा आल्यानंतर ते नातं चुकीचं ठरतं. चुकीच्या या नात्यातून बाहेर पडणं तुम्हाला सहज शक्य तर नक्कीच नाही. पण मग या नात्यातून बाहेर नक्की कसं यायचं हा प्रश्न नक्कीच कधी ना कधीतरी तुम्हाला आला असणार. कारण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुमचं नातं एका विशिष्ट वळणावर आलं आहे आणि नात्यातील समोरच्या माणसापासून दूर व्हायची वेळ आली आहे हे तुम्ही मानसिक तयारी नक्कीच करा. जेव्हा एखादं नातं अनेक वर्ष तुम्ही टिकवून ठेवता तेव्हा त्या नात्यातून बाहेर येणं नक्कीच शक्य नसतं. त्यातही मनात उठणारं काहूर, येणारं नैराश्य तुम्हाला यातून बाहेर पडू देत नाही. मग अशावेळी नक्की कोणत्या गोष्टी केल्या तर तुम्ही यातून मोकळे व्हाल याच्या काही गुजगोष्टी आम्ही तुमच्यासह शेअर करत आहोत. तुम्हीही अशा चुकीच्या नात्यात गुंतून पडला असाल तर नक्की हे करून पाहा.
ब्रेकअप (Breakup) नक्की का होतं, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं
यातून बाहेर यायचंच आहे, करा मानसिक तयारी
Shutterstock
या नात्यातून बाहेर पडल्यानंतर पुढे आपलं काय? आपण व्यवस्थित राहू शकणार नाही असे एक ना अनेक प्रश्न मनात असतात. नैराश्याच्या गर्तेत बऱ्याचदा जायला होतं. पण यातून बाहेर यायचंच आहे आणि यातून बाहेर पडलं तरच आपलं चांगलं होईल ही जेव्हा तुम्ही स्वतःची मानसिक तयारी कराल तेव्हाच तुम्ही यातून बाहेर येऊ शकाल. तुमचे मित्रमैत्रिणी, कुटुंब यांनी कितीही प्रयत्न केले तरीही तुम्हाला जोपर्यंत मनापासून यातून बाहेर यावंसं वाटत नाही तोपर्यंत हे चुकीचं नातं तुम्ही स्वतःवर लादत राहणार. आपल्या जोडीदारासह घालवलेले क्षण हे कायम आपल्यासह असणारच आहेत. पण जर जोडीदाराला तुम्ही ओझं वाटत असाल तर तुम्ही स्वतः योग्यवेळी हे पाऊल उचलून त्याच्या आयुष्यातून निघून जाणं योग्य.
योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर
मित्रमैत्रिणींसह घालवा अधिक वेळ
Shutterstock
जितके एकटे राहाल तितका त्रास अधिक वाढेल. त्रास वाढला की, चिडचिड आणि त्रागा वाढेल. जेव्हा या चुकीच्या नात्यातून बाहेर यायचा निर्णय तुम्ही मनाशी ठरवता तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वेळ हा तुमच्या मित्रमैत्रिणींसह घालवा. कुटुंबासह पिकनिकला जा. तुम्हाला ज्या गोष्टी जास्त आनंद देतात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा या नात्याला तुमच्या मनापासून 100% दिले आहेत हे तुम्हाला माहीत असतं तेव्हा यातून बाहेर पडताना स्वतःला त्रास करून घेऊ नका. समोरची व्यक्ती नक्की काय गमावत आहे हे त्या व्यक्तीला कळायला वेळ लागेल. पण स्वतःला कमकुवत करू नका आणि जास्तीत जास्त आनंदी राहून गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर मित्रमैत्रिणींसह सहल आयोजित करा आणि मस्तपैकी फिरा.
तुमचा जोडीदार असेल रागीट तर कसे टिकवाल तुमचे नाते
कामाकडे द्या अधिक लक्ष
सतत जोडीदाराविषयी विचार करणं बंद करण्यासाठी अधिकाधिक कामाकडे लक्ष द्या. काम संपल्यावर आपल्या आवडत्या छंदाकडे विशेष लक्ष द्या. जर नात्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीकडे दुर्लक्ष केले असेल तर पुन्हा तुमच्या आवडीची कामे सुरू करा. पण सतत जोडीदाराचा विचार करून डोळ्यात पाणी आणणं बंद करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला गुंतवून घ्या. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं, त्याला आपली किंमत नाही हे एकदा कळल्यावर आपली किंमत आपण स्वतःच कमी करून घ्यायला पुन्हा पुन्हा अशा व्यक्तीची आठवण न काढणंच योग्य आहे ही गाठ मनाशी पक्की बांधून घ्या.
प्रेम आणि काळजीसाठी निवडा नवा पर्याय
प्रेम एकदाच होते असे नक्कीच नाही. अर्थात लगेच दुसरा जोडीदार शोधू नका. पण प्रेमामध्ये काहीच अर्थ नाही अथवा सगळं जग वाईटच आहे असा दृष्टीकोन अजिबात ठेऊ नका. एखादा मित्र अथवा मुलाला एखादी मैत्रीण आवडली आणि त्याच्या तिच्याबरोबर जर वेळ घालवावा वाटला तरी नक्की जा. स्वतःच्या मनाला मारून घरात बसू नका. तुम्हालाही जगण्याचा आणि प्रेम मिळविण्याचा, आनंदी राहण्याचा अधिकार आहे. कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून तुम्ही वाईट असं अजिबात होत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तींना ओझं वाटत नाही आणि ज्या व्यक्ती तुमच्यावर भरभरून प्रेम करतात अथवा ज्यांना तुम्ही त्यांच्याबरोबर असावं असं वाटतं, त्यांच्याबरोबर वेळ घालवा आणि आनंदी राहा.
चुकीच्या नात्यातून योग्य वेळी बाहेर पडणं हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि गुंतून न राहता वेळेवर यातून बाहेर या. हे जग खूप सुंदर आहे आणि तुम्ही सतत रडत राहण्यासाठी जन्माला आला नाहीत याची खूणगाठ बांधा आणि मस्त जगा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक