गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीसाठी खास अनुभव असतो. गरोदरपणाचे नऊ महिने सुखरूप जाण्यासाठी आणि प्रसूती सुलभ होण्यासाठी शारीरिक हालचाल गरजेची आहे. मात्र काही महिला गोड बातमी समजताच चालण्याचेही कष्ट घेत नाहीत. लक्षात ठेवा गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील सुखद काळ आहे. त्यामुळे या काळात आजारी असल्याप्रमाणे बसून राहू नका. कारण या काळात गरोदर स्त्रीच्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. यासाठीच गरोदरपणी महिलांना चालण्याचा सल्ला दिला जातो. चालणं हा एक प्रकारचा व्यायाम असून याचा गरोदर महिलांना चांगला फायदा होतो. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणी चालण्याचे फायदे
गरोदरपणात का चालावे
गरोदरपणात महिलांच्या शरीरात नऊ महिने अनेक बदल होत असतात. या बदलांना सामोरं जाण्यासाठी तुमचं शरीर सक्षम असायला हवं. शरीराला सक्रिय करण्याचा सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे व्यायाम करणं. मात्र या काळात तुम्ही कठीण आणि अॅडवान्स व्यायामाचे प्रकार करू शकत नाही. मात्र चालणं हा व्यायाम आपण अगदी लहानपणापासून करत आलेलो आहोत. त्यामुळे चालण्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. यासाठीच गरोदरपणात रोज थोडं चालणं हा एक चांगला व्यायाम आहे. चालणं हा एक कार्डिओ व्यायामप्रकार असल्यामुळे यामुळे तुमचे शरीर फिट राहते.
pexels
गरोदरपणात कधीपासून चालण्यास सुरूवात करावी –
चालणे हा प्रकार आपण आपल्या लहानपणापासून नैसर्गिक पद्धतीने करत आहोत. त्यामुळे गरोदरपणात अगदी पहिल्या दिवसापासून चालण्यास काहीच हरकत नाही. अर्थात पहिल्या तिमाहीत तुम्ही तुमच्या दैनंदिन उपक्रमानुसार चालू शकता. मात्र दुमाही आणि तिमाहीत तुमच्या पोटाचा घेर वाढू लागतो. त्यामुळे या काळात तुम्हाला पोटाचा भार सहन करत आणि सावधपणे चालावं लागतं. मात्र या काळात चालण्याचे तुमच्या शरीरावर चांगलेचच परिणाम होतात. मात्र या काळात मशीनवर वॉकिंग एक्सरसाईझ करू नका. चालणे म्हणजे पायाने हळूवारपणे चालणे असा त्याचा अर्थ आहे. पहिल्या तिमाहीत तुम्ही चाळीस मिनिटे चालू शकता. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत मात्र अर्धा तास चालण्याचा सराव करा. शिवाय चालताना पायात आरामदायक शूज घाला. ज्यामुळे तुमचा पाय घसरणार नाही. भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही. घरात अथवा घराजवळील बागेत तुम्ही चालण्याचा सराव करू शकता. मात्र चालण्यासाठी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका.
गरोदरपणात चालण्याचे फायदे –
चालण्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होतात. पोटाच्या वाढत्या आकारामुळे तुमची पाठ, कंबर आणि पाय दुखत असतील तर नियमित चालण्यामुळे तुम्हाला यातून आराम मिळतो. गरोदरपणात वजन नियंत्रित राहण्यासाठी चालणे हा एक सोपा मार्ग आहे. गरोदरपणात मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी चालण्याचा चांगला फायदा होऊ शकतो. रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी गरोदर महिलांनी नियमित चालायला हवे. चालण्यामुळे कंबर आणि पायाचे स्नायू मजबूत होतात आणि प्रसूती दरम्यान होणाऱ्या वेदना सहन करणे सोपे जाते. शिवाय स्नायू लवचिक आणि बळकट असल्यामुळे प्रसूती सुलभ आणि नैसर्गिक होते. प्रत्येक स्त्रीचे गर्भारपण वेगवेगळे असते त्यामुळे याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा –
गरोदरपणात पोहण्याचे फायदे, जाणून घ्या
गरोदरपणातही करा ही सोपी योगासने
जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi)