भावा-बहिणीचं नातं म्हणजे कधी प्रेम तर कधी रूसव्या-फुगव्याचं भांडण असतं. दिवसभर एकमेंकाच्या खोड्या काढण्यात आपण दंग असतो नाही का? एकमेकाला पिडण्याची मजा काही औरच असते. भावा-बहिण्याच्या नात्याची तुलना कशाशी होऊच शकत नाही. तसं तर भाऊ कधी आपल्या भावनाचं प्रदर्शन करत नाहीत पण जेव्हा बहीणीचं लग्न ठरतं तेव्हा भावाचं मन बहिणीसाठी अजूनच प्रेमपूर्ण होतं. बहिणीसाठी भाऊ हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती असतो आणि तिच्या लग्नात भावाने काही गोष्टी आवर्जून कराव्यात अशी तिची इच्छा असते. चला पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या लाडक्या बहिणीसाठी भावाने कराव्या.
शॉपिंग शॉपिंग
आता लग्न म्हटल्यावर अनेक गोष्टी असतात. जसं लग्नाचं पॅकींग, लग्नासाठी उखाणे पाठ करणे, पार्लरला जाणे. आता या कामात तर भाऊरायांची मदत होणं कठीणचं असतं. मग निदान त्याने बहिणीसोबत शॉपिंगला जावं किंवा तिला जे लागेल ते मार्केटमधून आणावं अशी बहिणीची साधी अपेक्षा असते. नाही का…
लग्नाची तयारी आणि भाऊमंडळी
आईबाबा तर मुलीचं लग्न ठरल्यावर तयारीला लागतातच. पण भावानेही गेमिंग सोडून लग्नाच्या तयारीमध्ये बहिणीला आणि घरच्यांना मदत करावी. असं केल्याने वेगळंच वजन पडतं रे भावा आणि या दरम्यान तुझंही लव्ह कनेक्शन जुळलं तर मजाच आहे ना तुझी. मग जरा तू ही तयारीमध्ये मदत कर. जरा त्या मंडपवाल्याला ओरड. फुलवाल्याची शाळा घे की…
बहिणीचे लाड पुरवा
बहिणीचे लाड तर भाऊराया करत असतोच. पण लग्न होऊन ती सासरी जाणार म्हटल्यावर जास्तीचे लाड झालेच पाहिजेत नाही का..मग तिच्या मेहंदीच्या दिवशी तिला जेवण भरवणं असो वा तिचा फोन आल्यावर तो कानाशी धरणं असो. इतना तो करना ही पडता है. असं केलं तरच कानपिळीच्या वेळी मस्तपैकी गिफ्ट लाटता येईल ना होणाऱ्या जीजूकडून.
संगीत परफॉर्मन्स
आता बहिणीचं लग्न आहे आणि भावाचा परफॉर्मन्स नाही असं होऊ शकता का? मग भाई का डान्स तो बनता है. सध्या भाऊबहिणीच्या नात्यावरची इतकी अप्रितम गाणी आली आहेत की, भावा-बहिणीचा संगीत परफॉर्मन्स असलाच पाहिजे. मग ते खारी-बिस्कीट मधलं गाणं असो वा जुनं ते सोनं असलेलं फुलों का तारों का हे गाणं असो. नववधूच्या सर्व भावांनी मिळून एकत्र डान्स केला तर क्या कहने.
सदैव तिच्यासोबत असण्याची हमी
आपल्या भावाने लग्नानंतरही आपल्या पाठीशी सदैव असावे असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. कारण आईबाबानंतर तोच तिचा आधार असतो. ज्यामुळे तिला सुरक्षित वाटेल. ती सासरी गेल्यावरही माहेर तिच्यासाठी सदैव पाठीशी असेल आणि लग्नानंतर काहीही बदलणार नाही. असा तिला विश्वास देणारा व्यक्ती म्हणजे भाऊ.
वाईट लोकांपासून संरक्षण
बहिणीच्या जीवनात नेहमी चांगलेच घडावे असे प्रत्येक भावाला वाटते. त्यामुळे आपल्या भावाने लग्नानंतरही वाईट लोकांपासून आपलं संरक्षण करावं असं प्रत्येक बहिणीला वाटतं. लग्नाच्या वेळी बरेच नातेवाईक आपल्याकडे येत असतात आणि अशावेळी उगाच टोमणे मारणे किंवा गॉसिप करणे असे प्रकार मुद्दामून करत असतात. अशा नातेवाईकांना आपल्या बहिणीपासून लांब ठेवण्याची जवाबदारी अर्थातच भावाची असते. कारण जिथे आईबाबाचं चालत नाही तिथे भावाचीच ढाल असते नाही का?
इमोशनल क्षण
एकदा घरात लग्नसराई सुरू झाली की, कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येईल भरोसा नाही. अशावेळी आपल्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आल्यास भावाने तिला आधार तर दिलाच पाहिजे. पण असंही होतं जेव्हा बहिणीच्या पाठवणीची वेळ येते तेव्हा सर्वात आधी भावाच्याच डोळ्यात पाणी येतं. जो भाऊ नेहमी आपल्याला भावनांना कंट्रोल करणारा असतो. तोच बहिणीच्या पाठवणीच्या वेळी इमोशनल होतोच होतो.
बहिणीसाठी काय पण
बहिणीच्या डोळ्यात पाणी आल्यावर तिला मोकळ होण्यासाठी आधार देणं असो वा तिला हसवण्यासाठी पांचट जोक मारणं असो. बहिणीसाठी भाऊमंडळी काहीही तयारी करायला तयार असतातच. एवढंच काय तर लग्नाच्या दिवशी तिला मेकअपसाठी नेणं असो वा तिचे डिझाईनर कपडे कॅरी करणं असो. सगळं काही बिचाऱ्या भावाच्या खांद्यावरच असतं. मग भावांनो ताईच्या लग्नासाठी तयारी करायची ना.
असं हे भावाबहिणीचं नातं लग्नानंतरही तसंच कायम राहो अशी आईवडिलांची आणि भावंडांचीही इच्छा असते. तुम्हालाही वाटतं का, तुमच्या भावाने तुमच्या लग्नात असंच करावं मग हा आर्टिकल त्याच्यासोबत नक्की शेअर करा. कारण वर वर जरी त्याने तुम्हाला लग्नावरून भरपूर चिडवाचिडवी केली असली तरी मनातल्या मनात तोही खूप इमोशनल नक्कीच झाला असेल.