भविष्य

वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम

Jyotish Bhaskar  |  Jan 4, 2019
वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम

राशी चक्रातील पाचवी राशी म्हणजे सिंह (Leo) राशी होय. या राशीच्या लोकांचा राजेशाही थाट असतो. म्हणून या राशीच्या लोकांनी 2019 या नवीन वर्षामध्ये आपल्या मूळ स्वभाव थोडा बाजूला ठेवण्याची गरज आहे. कारण हे नववर्ष आपल्यासाठी कभी खुशी.. कभी गम असं असणार आहे. तसंही संघर्ष आपल्या राशीसाठी अटळच असतो. मात्र यावर्षी जरा कुठे चांगले होत आहे, असं वाटू लागताच नवीन संकट आपल्यासमोर उभं राहणार आहे. चला तर मग 2019 हे नववर्ष सिंह राशीसाठी कसं असेल याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

सिंह राशीचा स्वभावविशेष

सिंह म्हणजे राजा! सिंहाचं प्रतिक असलेल्या या राशीचे लोक अगदी राजासारखेच असतात. त्यामध्ये तोरा, स्वाभिमान, अहंकार, दिमाख हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. त्यांच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून हे गुण परावर्तित होत असतात. ही अग्नितत्वाची रास असून स्थिर स्वभावाची आहे. उत्तम बुद्धिमत्ता आणि परिपूर्ण ज्ञान असूनही या राशीचे लोक कित्येक वेळा टिकेचे धनीही होतात. कारण स्वभाव वैशिष्ट्यांमुळे या राशीच्या लोकांमध्ये परखडपणा आणि फटकळपणा हे गुणही असतात. त्यांना खोटं,असत्य किंवा अन्याय सहन होत नाही. या गोष्टी सहन करत नाहीत. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादविवाद आणि संघर्ष हे कायमस्वरुपी असतातच. आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे हे लोक ब-याचवेळा आळशीही होतात. त्यामुळे जगण्याच्या शर्यतीत जिंकण्याचे सर्व गुण अंगी असतांनाही त्यांना ब-याच ठिकाणी हार पत्करावी लागते.

सुखाने हूरळून जाऊ नका   

सिंह राशीची वरील सर्व स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेता आपण आपला मूळ स्वभाव थोडा बाजूला ठेवला तरच थोडं चांगलं काही पदरात पाडून घेऊ शकता. कायम संघर्ष करीत राहणारी आपली रास असल्याने त्याची आपल्याला सवय आहे. मात्र संघर्ष करीत असताना वारंवार अपयश आल्यास आत्मबल कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसामागून रात्र तसे आनंदानंतर दु:ख ही सत्यता सिंह राशीच्या लोकांनी स्वीकारुन या वर्षात कार्यरत राहणे आपल्यासाठी चांगले होईल. थोडक्यात सुख आलं तर हुरळून न जाता आपल्याला सावध राहावं लागणार आहे. सिंह राशीला राजयोगकारक ग्रह म्हणजे मंगळ होय. लग्नस्वामी ग्रह रवि म्हणजे प्रत्यक्ष राजा होय. राजा आणि सेनापती यांची एकवाक्यता असल्यास संपूर्ण राज्याचा विकास घडत असतो. राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका असते ती मार्गदर्शकाची, सल्लागाराची! सल्लागार म्हणजे राज्याचा गुरु होय.

जे कराल ते पूर्ण ताकदीने करा

मंगळ, गुरु आणि रवि मिळून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरवत असतात. या तिघांचं गोचर तुमचं 2019 या नववर्षातील तुमचा शुभ-अशुभ काळ ठरवतात.चतुर्थात असलेल्या गुरु महाराजांकडून सिंह राशीची लोक फार काही अपेक्षा करु शकत नाहीत. दि. 6 पेब्रुवारी 2019 ला मंगळ आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहे. भाग्यात आलेला भाग्येश आणि त्याची गुरु वर असलेली दृष्टी भाग्याची संपूर्ण साथ दि. 6 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालखंडात तुम्हाला असणार आहे. त्यामुळे या कालखंडात जे करायचे आहे ते पूर्ण ताकदीने करण्यास अजिबात चुकू नये. सोबतच दि. 6 मार्च 2019  रोजी राहू आपल्या उच्च राशीत म्हणजे मिथून राशीत प्रवेश करणार आहे. लाभात आलेला हा राहू तुम्हाला आर्थिक लाभ देणारा असेल. असं असलं तरी दि. 6 मार्च 2019 ला केतू पंचमात येत आहे. तिथे शनि असल्याने शनि व केतू यांचा जडत्व दोष निर्माण होऊ शकतो. म्हणजेच सुखामागुन दु:ख लगेच आपले दार ठोठावणार आहे.

जोडीदारासोबत मतभेद टाळा

पंचमातून तयार होणारा हा जडत्व दोष जोडीदारासोबत मतभेद निर्माण करणारा आहे. त्यामुळे या काळात आपण सामंज्यसपणा दाखवणं गरजेचं आहे. सोबतच शब्दांवरही नियंत्रण ठेवायला हवं. आपल्या बोलण्यातून, कृतीतून नाती दुरावणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. कारण या जडत्व दोषामुळे भाषेत कडवटपणा निर्माण होऊ शकतो. सोबतच अतिरिक्त शॉपिंग आपल्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. एकमेकांबद्दल गैरसमजही वाढीस लागण्याची चिन्हे आहेत. दि. 6 मार्च ते 21 मार्च या कालखंडात तुम्हाला नात्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सुखानंतर जसे दु:ख तसे दु:खानंतर सुखही येणार आहेच. दि. 21 मार्च 2019 रोजी शुक्र कुंभेत प्रवेश करीत आहे. शुक्र व शनि यांच्या परिवर्तन योग निर्माण होईल. या परिवर्तन योगामुळे नात्यातील तेढ कमी होऊन मतभेद संपणार आहेत. त्यामुळे साहजिकच जोडीदाराचेही सहकार्य मिळणार आहे.

भाग्य उजळणारा काळ

सुखाचा हा काळ आणखी काही दिवस पुढे सुरु राहणार आहे. दि. 15 एप्रिल ते 15 मे 2019 या कालखंडात तुमच्या कर्तृत्वाला नवीन दिशा मिळू शकते. कारण तुमचा लग्नस्वामी सूर्य स्वत:च्या उच्च राशीत म्हणजे मेष राशीत प्रवेश करीत आहे. जे आपल्यासाठी लाभदायक असून भाग्य उजळून निघणार आहे. म्हणून या कालखंडाचा योग्य उपयोग करुन घेण्यास चुकू नये. दि. 22 जून 2019 रोजी मंगळ आपल्या निचराशीत म्हणजेच कर्केत प्रवेश करेल. त्यामुळे अनपेक्षितपणे खर्चात वाढ, स्वभावात चिडचिडेपणा, राग, भाऊ, बहिण व आईशी दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधीच्या यशात हुरळून जाऊ नका. सावध राहा. दि. 8 ऑगस्ट 2019 रोजी तुमच्या राशीत प्रवेश करणारा मंगळ तुम्हाला नवीन प्रेरणा देईल आणि दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी तुमच्या राशीत होणारा मंगळ-रवि युती योग पराक्रमाची दिशा प्राप्त करुन देईल. मात्र शनि व केतू जडत्व दोष पैसे अडकणे, नुकसान, फसवणूक यासारख्या समस्या निर्माण करु शकतो. दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी स्वराशीत येणारे गुरु महाराज येथून पुढे तुम्हाला मोठा आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळे येथुन पुढे कभी खुशी.. कभी गम हा खेळ थांबेल, अशी अशा करायला हरकत नाही.

संपूर्ण वर्षभर सिंह राशीच्या लोकांनी धैर्य आणि सहनशिलता बाळगून प्रश्नांचा, समस्यांचा सामना करायचा आहे. आपला मूळ स्वभाव थोडा बाजूला ठेवून नात्यांना जपायचं आहे. सोबतच ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन कार्य करत राहायचं आहे. आपल्याला त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

शुभं भवतू!

लेखिकेचा संपर्क मेल आयडी : jyotishbhaskarjjoshi@gmail.com

हेही वाचा : 

वार्षिक भविष्य 2019 : मेष रास

वार्षिक भविष्य 2019 : वृषभ रास

वार्षिक भविष्य 2019 : मिथुन रास

वार्षिक भविष्य 2019 : कर्क रास

Read More From भविष्य