भविष्य

2019 वार्षिक भविष्य वृश्चिक (Scorpio) राशी : सर्व ग्रहांच्या तोंडी फक्त एकच शब्द… तथास्तु|

Jyotish Bhaskar  |  Jan 7, 2019
2019 वार्षिक भविष्य वृश्चिक (Scorpio) राशी : सर्व ग्रहांच्या तोंडी फक्त एकच शब्द… तथास्तु|

 

2019 हे नववर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भरभरुन असं देणारं आहे. कारण वर्षाची सुरुवातच होतेय ती उत्तम अशा राजयोगाने! गुरु आणि शुक्र या ग्रहांच्या स्थितीचा हा परिणाम आहे. फक्त हे दोनच ग्रह नाही तर संपूर्ण ग्रह यावर्षी आपल्यासाठी अनुकूल आहेत. सर्वच ग्रह तुम्हाला तथास्तु म्हणणार आहेत. त्यामुळे फक्त तुमच्यावरच आहे की, तुम्ही यावर्षी काय काय मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हे नववर्ष कसं असणार आहे.

सर्वात आधी आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या स्वभावाच्या गुण-दोष, वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये.

कोणी जर बोलण्यातून, वागण्यातून काही वेळेला विंचवासारखा अचानक डंख मारत असेल तर समजून घ्यायचे ही व्यक्ती नक्कीच वृश्चिक राशीची असायला हवी. कारण प्रतिक विंचू असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या बोलण्यात, वागण्यात दाहकता ही नैसर्गिकच असते. या राशीच्या लोकांच्या बोलण्यात जास्त करुन टोमणे अधिक असतात. मात्र याचबरोबरच नवचैतन्य आणि प्रसन्नता हे गुणही या राशीमध्ये दिसून येतात. ही जलतत्वाची स्त्री राशी आहे. उत्तम ग्रहण शक्ती, मुद्देसूद बोलणं, नियमांना धरुन वागणं या राशीच्या लोकांना उत्तम साधतं. यांचा स्वभावही थोडा वेगळाच असतो. कारण स्वभावात एकीकडे प्रेम तर दुसरीकडे कठोरता साधण्याची कला या राशीच्या लोकांकडे असते. जी जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. याच बळावर हे लोक मोठमोठ्या कामांमध्ये कमालीचे यश मिळवू शकतात. कामात सदैव गुंतलेलं राहणं या लोकांना पसंत असतं. वृश्चिक राशीचे लोक भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कार्यात मग्न राहू शकतात. तेवढी ताकत, धडाडी आणि इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते. या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे मंगळाप्रमाणे जिद्द आणि शिस्त हे गुण त्यांच्यामध्ये ठासून ठरलेले असतात. हे आहेत या  राशीचे गुण-दोष आणि स्वभाव वैशिष्ट्यं! आता ग्रहमानाच्या बाबतीत पाहूया. प्रत्येक जातकाच्या जन्माच्या वेळी त्याच्या संपूर्ण आयुष्याचा एक दिशादर्शक ईश्वराने ठरवलेला असतो. म्हणजे प्रत्येक राशीचा एक राशीस्वामी ग्रह असतो. जातकाच्या आयुष्यावर त्या ग्रहाचा फार मोठा परिणाम असतो. तसा वृश्चिक राशीचा स्वामीवर सांगितल्याप्रमाणे मंगळ हा आहे.

वार्षिक भविष्य वृषभ (Taurus) राशी : गतवर्षाचा आनंद नववर्षात अधिक द्विगुणीत होईल

वृश्चिक राशीचं ग्रहमान

मंगळ ग्रहाने आपल्या राशीसाठी इतर ग्रहांचं एक मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. प्रत्येक ग्रहाला आपापली भूमिका वाटून देण्यात आलेली आहे. हे ग्रह सतत भ्रमण करीत असतात. त्यामुळे ते आपापली भूमिका अत्यंत चोख पद्धतीने बजावत असतात. मंगळाने प्रत्येकाला आपापली भूमिका वाटून जरी दिली असली तरी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची खाती स्वत:सह गुरु, चंद्र व रविजवळ ठेवलेली आहेत. त्याखालोखालची खाती शनि आणि शुक्र या ग्रहांजवळही आहेत. बुधाचा बालिशपणा मंगळाला मानवत नाही. त्यामुळे मंगळाने बुधाला डावललं आहे. असो, तुमच्या आयुष्याची दिशा मंगळ, गुरु, चंद्र व रवि या ग्रहांच्या भ्रमणावर ठरत असते.

वार्षिक भविष्य मेष (Aries) राशी : थोडी सावधानता बाळगल्यास वर्ष तुमचंच आहे

वृश्चिक राशीवर होणार गुरूची कृपा

2019 या नववर्षात गुरु महाराजांची कृपा वृश्चिक राशीवर भरभरुन राहणार आहे. कारण दि. 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत गुरु महाराज वृश्चिक राशीमध्ये असणार आहेत. शिक्षण, संतती, पैसा, भाग्य अशा विविध गोष्टींसाठी गुरुचे हे गोचर आपल्यासाठी लाभदायक असणार आहे. साडेसातीमध्ये शनि महाराजांनी तुमची चांगलीच परीक्षा पाहिलेली आहे. त्यामुळे 2019 मध्ये जाता जाता म्हणजे नववर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला शुभ, लाभदायक अशी फळं ते देण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच

2019 हे राजयोगाचं वर्ष

2019 हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचं वर्ष ठरणार आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांचा शंखयोग होतोय. सोबतच गुरु आणि मंगळ यांचा परिवर्तन योग व नवपंचम योगही येतोय. ही ग्रहस्थिती म्हणजे एक उत्तम राजयोग मानली जाते. या राजयोगाने आपली नववर्षाची सुरुवात होत असल्याने यावर्षी अनेक संधी आपले दार स्वत:हून ठोठावणार आहेत. दि. 6 फेब्रुवारी ते 21 मार्च 2019 या कालखंडात तुमच्या राशीचा स्वामी मंगळ स्वराशीत परंतु अष्टमात असल्याने शुभ योग निर्माण होत आहे. या कालखंडात धनलाभ, वारसा हक्काने पैसा, इन्शुरन्स यासारखे चांगले परिणाम आपणास दिसू शकतात. दि. 15 एप्रिल 2019 ला शुक्र तुमच्या राशीच्या पंचमात मिनेत उच्चीचा होणार आहे. सोबतच सूर्यही षष्टात उच्चीचा होईल. त्यामुळे संतती इच्छुक व्यक्तींची इच्छा पूर्ण होणार आहे. वैवाहिक आयुष्यही सुखद राहिलं. या कालखंडात विवाहाच्या इच्छाही पूर्ण होतील.थोडक्यात 2019 या येणा-या नववर्षात आपल्यासाठी सर्व ग्रह अनुकूल ठरणार आहेत. असिम कृपा ते दाखवून ते आपल्याला तथास्तु म्हणणार आहेत. आता त्यांच्याकडे काय मागावं? किंवा त्यांच्याकडून काय प्राप्त करुन घ्यावं? हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून राहणार आहे. एक मात्र नक्की की, प्रयत्न केल्याशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही.

आरोग्याची काळजी घ्या

सर्व ग्रह अनुकूल राहणार असले तरी दि. 22 जून ते 7 ऑगस्ट 2019 या कालखंडात आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषत: आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा कालखंड प्रतिकूल असा आहे. याशिवाय पैसे फसणं, आर्थिक नुकसान, चुकीचे निर्णय, धोका, नोकरवर्गाकडून त्रास यासारख्या समस्या संभवू शकतात. म्हणून आपण सावध राहिलेलंच बरं! हा एवढा कालखंड सोडलं तर संपूर्ण वर्ष आपलेच आहे. त्याचा योग्य उपयोग करुन घ्या.

मिळालेल्या संधीचं सोनं करतो, तोच ख-या अर्थाने जीवन जगण्याचा आनंद उपभोगत असतो. वर्षभरातील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा!

शुभं भवतू|

लेखिकेचा संपर्क : श्री ज्योतिष संशोधन केंद्र

Read More From भविष्य