भविष्य

#Lucky2020: कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी असणार अप्रतिम वर्ष

Dipali NaphadeDipali Naphade  |  Dec 21, 2019
#Lucky2020: कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी असणार अप्रतिम वर्ष

प्रत्येक नवं वर्ष सुरू झालं की हे वर्ष नक्की कसं जाईल याचा अंदाज आपल्याला प्रत्येकाला हवा असतो. आपण कितीही आपला भविष्य आणि या गोष्टींवर विश्वास नाही असं म्हटलं तरीही मनातून प्रत्येकाला आपल्या राशीविषयी आणि आपल्या भविष्याविषयी जाणून घ्यायची नक्कीच इच्छा असते. लवकरच 2020 हे नववर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारीही आता सर्वजण करायला लागले आहेत. ज्याच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीची कमतरता असते ती कमतरता यावर्षात तरी भरून निघेल अशीही अपेक्षा प्रत्येकाला असते. आपल्याकडे एकूण बारा राशी आहेत आणि ती प्रत्येक रास आणि त्याचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे. पुढच्या वर्षी कोणत्या राशीच्या नशीबात नक्की काय असणार आहे याचा सारांश आम्ही इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा यातून हेतू नाही. ज्योतिषशास्त्र हादेखील एक प्रकारचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासानुसार यावर्षींच्या ग्रह ताऱ्यांनुसार प्रत्येक राशीच्या व्यक्तीला हे वर्ष कसं जाईल याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. 

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे येणारं 2020 वर्ष कौटुंबिक दृष्टीने उलाढालीचं राहील. सुरूवातीला कुटुंबामध्ये वातावरण चांगलं राहील. पण वर्षाच्या मध्यात जमीनजुमला आणि इतर पैशांच्या व्यवहारांमुळे घरातील काही जणांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला चांगली संधी मिळेल. यावर्षी तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. आरोग्याकडे मात्र नीट लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष थोडं नाजूक राहील. तसंच लग्न करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना लग्नाचे योग आहेत. यावर्षाच्या शेवटी घरात मंगलकार्य घडण्याची शक्यता आहे. संतानांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी वर्षाची सुरुवात कदाचित चांगली नसेल पण या वर्षाचा शेवट मात्र नक्कीच चांगला ठरेल. वर्षाच्या सुरुवातील तुम्हाला काही गोष्टींचा आणि कामाचा तणाव जाणवेल. तुमची कौटुंबिक परिस्थितीही बिघडण्याची शक्यता आहे. मार्चदरम्यान चांगल्या नोकरीची संधी चालून येईल. कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी आव्हानात्मक राहू शकतो. यावर्षी गुंतवणूक करताना विचार करा. कोणतीही नवी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी आधी विचार करा. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि समस्या येणार नाही. सासरी तुमचा मान वाढेल आणि अनेक मोठ्या  कामांमध्ये तुमचा सल्ला घेण्यात येईल.

मिथुन

हे 2020 नववर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आनंद घेऊन येणारं ठरणार आहे. यावर्षी तुमची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहील. तसंच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठीही हे वर्ष भरभराटीचं ठरणार आहे. करिअरमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना थोड्याशा चढउतारांना सामोरं जावं लागेल. पण नोकरीमध्ये काहीही समस्या येणार नाहीत. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अप्रतिम असेल. ऑक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. थोरामोठ्यांंचे आशीर्वाद आणि प्रेम मिळेल. वडिलांकडून पैसा मिळण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वतःकडे लक्ष द्या. 

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना यावर्षी अजिबात वेळ मिळणार नाही. यावर्षी या व्यक्ती कामात व्यस्त राहणार असल्याने स्वतःच्या तब्बेतीकडेही त्यांना लक्ष द्यावे लागेल. आरोग्यासंबंधित समस्या यावर्षी उद्भवण्याची शक्यता आहे. तसंच तुमची प्रकृती पित्तकारक असेल तर विशेष लक्ष द्या. जवळच्या मित्राकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधानता बाळगा. नोकरीमध्येही अनेक चढउतारांना सामोरं जावं लागेल. आईच्या तब्बेतीचीही काळजी घ्यावी लागेल. बऱ्याचदा मनाची द्विधा अवस्था होण्याची शक्यता आहे. मुलांवर बराच खर्च होईल. आपल्या जोडीदारासह चांगला वेळ घालवता येईल. 

सिंह

2020 हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना खूपच चांगले जाणार आहे. वर्षाची सुरुवात चांगली होईल. फेब्रुवारी महिन्यात परदेशात जाण्याचे योग अथवा नोकरीची संधी चालून येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वर्षाच्या मध्यात नवीन घर अथवा ऑफिस खरेदीचा योग आहे. पण ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा थोडासा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक आणि निराशाजनक राहील. मुलांच्या आरोग्याला जपा. कौटुंबिक स्थिती खराब होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यश देणारे आहे. वर्षाच्या शेवटी मात्र आर्थिक परिस्थिती दोलायमान राहील. ऑफिसच्या तणावामुळे तुम्हाला यावर्षी थोडा त्रास होईल. 

कन्या

या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आरोग्यादायी जाणार आहे. यावर्षी तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल. तसंच तुमच्या  जोडीदाराला यावर्षी त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे. कौटुंबिक स्वास्थ्य राहील. तुमची मुलं यावर्षी अभ्यासात चांगले गुण मिळवतील. विद्यार्थ्यांना विविध संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला यावर्षी अनेक लाभ मिळतील. यावर्षी तुमचे मित्रही तुमच्या अनेक कामांमध्ये मदतीला धावून येतील. घरात आनंद कायम राहील. तसंच तुम्ही तणावमुक्त राहाल. 

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींचे स्वास्थ्य यावर्षी चांगले राहणार नाही. पोट आणि मानसिक तणाव या दोन्हीचा तुम्हाला यावर्षी त्रास होईल. भागीदारीमध्ये व्यवसाय करत असल्यास सावध राहा. फसवणुकीची शक्यता आहे. कुटुंबात अनेक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक लोकांचे जीवनही नाजूक राहील. पण वर्षाच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. विवाहेच्छुक तरूणांना वर्षाच्या शेवटपर्यंत विवाहाचे योग  आहेत. मात्र यावर्षी बराच पैसा खर्च होईल याकडे लक्ष द्या. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत व्यक्ती पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक कलह अधिक वाढण्याची शक्यता. 

#Lucky2020: मस्तीखोर असतात या राशीच्या व्यक्ती, नव्या वर्षातही मस्ती कायम

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी वर्षाची सुरूवात उत्तम राहील. पण मधला काळ थोडा कठीण असेल. वर्षाच्या सुरवातीला तुमचा पगार वाढण्याची अथवा परदेशात जाण्याची शक्यता आहे. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. सप्टेंबर महिन्यानंतर परिस्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन शांततेत राहील. जोडीदाराबरोबर वेळ चांगला घालवू शकता. अविवाहित व्यक्तींची यावर्षी लग्न होण्याची शक्यता आहे. जमीन अथवा पैशावरून कौटुंबिक कलह होऊ शकतात. यामुळे घरात तणावाचं वातावरण राहील. तुमची कटू वाणी वादासाठी मोठं कारण ठरेल. शांततेत गोष्टी पार पाडायच्या असतील तर धैर्याने तोंड द्या आणि सहसा कटू बोलू नका.  विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुमच्या मनासारख्या घटना घडतील. 

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना 2020 मध्ये करिअरसाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतं. पण नंतर परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांसह वाद होण्याची शक्यता. पण जोडीदारासह नक्कीच चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक स्थिती आव्हानात्मक असेल. पण तुमच्या हातात पैसा टिकणार नाही. विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येऊ शकते. अधिक मेहनत घ्याावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष धनु राशीच्या व्यक्तींना चांगलं राहील. आजारापासून तुम्ही दोन हात दूरच राहाल.

#POPxoLucky2020: आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास राशींचंं कलेक्शन (Zodiac Collection)

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष करिअरच्यादृष्टीने उत्तम ठरेल. नोकरीची नवी संधी मिळाली असेल त्याचं तुम्ही सोनं कराल. नव्या प्रोजेक्टसाठी परदेशी जाण्याचे योग आहेत. पैशाची कमतरता यावर्षात जाणवणार नाही. कुटुंबामध्ये तुम्हाला अधिक मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हे वर्ष भरभराटीचं आहे. प्रेमामध्ये तुम्ही स्वतःला झोकून द्याल. अविवाहित व्यक्तींची लग्न होतील आणि चांगल्या बातम्याही मिळतील. कौटुंबिक जीवन सुखी आणि आनंदी राहील. वर्षाच्या शेवटी आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक राहील. पण वर्षभर पैसे नीट जमा केले असतील तर चणचण जाणवणार नाही.  

कुंभ

या राशीच्या व्यक्तींना 2020 मध्ये बऱ्याच आव्हांनांचा सामना करावा लागणार आहे. आपल्या आरोग्याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. कमाई आणि खर्च दोन्ही एकसारखाच होईल. यावर्षी तुम्हाला अध्यात्मामध्ये चांगले अनुभव मिळतील. कुटुंबासोबत तुम्ही अनेक धार्मिक स्थळांवर भेट देऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात बरीच मेहनत घ्यावी लागेल. मुलांकडून तुम्हाला निराशाजनक बातम्या मिळतील. अनेक आव्हानं यावर्षी तुमच्या समोर असतील. पण त्यासाठी तुम्हाला आधीपासूनच मनाची तयारी करावी लागेल. 

#Lucky2020 : नवीन वर्षी या राशीच्या लोकांना मिळणार ‘गुडन्यूज’

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना यावर्षी सर्व शुभ बातम्या मिळणार आहेत. तुम्ही जर नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा विचार योग्य आहे. तुम्हाला यामध्ये नक्की यश मिळेल. तुम्ही यावर्षी अनेक नवीन मित्र बनवाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या मित्रांचा तुम्हाला हातभार लागेल. कुटुंबात जमिनीसंदर्भात वाद होण्याची शक्यता आहे. पण सर्व गोष्टी समजूतदारपणाने पार पाडू शकता. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. बिघडणारी कामं होतील. आर्थिक स्थिती यावर्षी चांगली राहील.

Read More From भविष्य