बीआर चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’ आणि ‘शक्तिमान’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून जगभरात प्रसिद्ध झालेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या सामाजिक कार्यात व्यस्त आहेत. मध्यंतरी त्यांनी एक वक्तव्य केले होते ज्यामुळे ते चर्चेत आले होते. इतर धर्माचे लोक जसे एकत्रितपणे प्रार्थना करायला जातात त्याचप्रमाणे संपूर्ण हिंदू समाजाने दर मंगळवारी जवळच्या मंदिरात जाऊन एकत्रितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे असे मत त्यांनी व्यक्त केले होते. सरकारने सर्वांना मोफत शिकवावे आणि सर्वांसाठी मोफत उपचाराची व्यवस्था करावी असेही मत त्यांनी व्यक्त केले होते. या दरम्यान आता मुकेश खन्ना यांचे ‘शक्तिमान’ हे पात्र मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे.
शक्तिमानचे हक्क मिळाले सोनी पिक्चर्सला
नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्यांसाठी शक्तिमान हा आवडता सुपरहिरो होता. जागतिक स्तरावरच्या स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन या सुपरहिरोंच्या मांदियाळीत भारतीय सुपरहिरो शक्तिमान जाऊन बसला आणि लहान मुलांनी शक्तिमानला अक्षरश: डोक्यावर घेतले. लहान मुलांनी शक्तिमानवर भरभरून प्रेम केले. शक्तिमान बघण्यासाठी तेव्हा मुलं रविवारची आतुरतेने वाट बघत असत. आता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या ‘शक्तिमान’ या लोकप्रिय मालिकेचे हक्क सोनी पिक्चर्सला दिले आहेत. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना सांगतात, “हा प्रोजेक्ट माझ्याकडे बऱ्याच वर्षांनी आला आहे. लोक मला शक्तिमानचा दुसरा भाग बनवायला सांगायचे. पण मला शक्तिमानला पुन्हा टीव्हीवर आणायचे नव्हते. मी सोनीच्या लोकांशी हातमिळवणी केली आहे आणि त्यांनीही ते जाहीर केले आहे आणि मीही केले आहे. लोक विचारतात की आता काय होत आहे? आता लोकांना काय सांगू कारण हा किमान तीनशे कोटींचा मोठा चित्रपट असणार आहे. सर्व करार होईपर्यंत मला याबद्दल जास्त सांगता येणार नाही.”
शक्तिमान पूर्णपणे भारतीयच असेल
मुकेश खन्ना म्हणतात की, “हा चित्रपट स्पायडर मॅनचे निर्माते बनवत आहेत. पण, शक्तिमान हा पूर्णपणे देशी असेल. चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे. माझी त्यांना एकच अट होती की ते कथा बदलणार नाहीत. लोक विचारतात कोण होणार शक्तिमान? हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर मी देणार नाही, परंतु हे देखील निश्चित आहे की मुकेश खन्नाशिवाय ते शक्तिमान बनवणार नाहीत. कारण दुसरा कोणी शक्तिमान झाला, तर कदाचित मुले त्याला स्वीकारणार नाहीत.” हॉलिवूडचा कोणी दिग्दर्शक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार का, असे विचारले असता मुकेश खन्ना म्हणाले की, चित्रपटाची कथा जर भारताची असेल तर दिग्दर्शकही तसाच असेल कारण बाहेरच्या दिग्दर्शकाला भारताची कथा समजू शकणार नाही.”
सोनी पिक्चर्स इंडियाने शेअर केला टिझर
सोनी पिक्चर्स फिल्म इंडियाने या चित्रपटाशी संबंधित एक टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये सुपरहिरो शक्तिमानचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. शक्तिमानच्या गळ्यात लटकलेल्या आयकार्डमधून सध्या फोटो गायब आहे, जिथे मुकेश खन्ना यांचा फोटो असायचा. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘भारतात आणि जगभरातील आमच्या अनेक सुपरहिरो चित्रपटांच्या यशानंतर आता आमच्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे.’ आता या चित्रपटात ‘शक्तिमान’च्या भूमिकेत स्वतः मुकेश खन्ना असतील की आणखी कोणी याची सर्वांना उत्सुकता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje