आई होणं ही प्रत्येकासाठी खास गोष्ट असते. मग ती स्री सामान्य असो वा एखादी सेलिब्रेटी… स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेणं या काळात गरजेचं असतं. गर्भधारणा झाल्यावर जास्त हालचाल अथवा व्यायाम करू नये असं सांगितलं जातं. मात्र अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी नऊ महिने व्यायाम करून स्वतःची आणि बाळाची काळजी घेतली. वास्तविक सुलभ प्रसूतीसाठी गरोदर महिलेला काही प्रमाणात शारीरिक हालचालीची गरज असते. मात्र आजकालची जीवनशैली बैठी असल्यामुळे या काळात पुरेसा व्यायाम करणं गरजेचं झालं आहे. यासाठी या अभिनेत्रींकडून घ्या गरोदरपणी फिट राहण्याची प्रेरणा
अनुष्का शर्मा
अनुष्का आता एका गोंडस मुलीची आई आहे. मात्र ती जेव्हा गरोदर होती तेव्हा ती नियमित व्यायाम करत असे. एकदा तर तिचा एक फोटो खूपच व्हायरल झाला होता. कारण ती बेबी बंपसह चक्क शीर्षासन केलं होतं. व्यायाम करताना फोटो शेअर करत अनुष्काने पोस्ट लिहिली होती की योगा हा माझ्या जीवनाता खास भाग आहे. म्हणूनच ती गरोदरपणीही योगासने करत होती. अर्थातच हे सर्व ती तिच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत होती.
करिना कपूर खान
करिना कपूर फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. तिचे व्यायाम करताचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. करिना आता दोन मुलांची आई आहे. मात्र तिने दोन्ही गरोदरपणात स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम केला होता. व्यायामामुळेच तिच्या दोन्ही प्रसुती सुलभ झाल्या. शिवाय गरोदरपणानंतर तिला पुन्हा सुडौल होता आलं.
कल्कि कोचलिन
कल्कि कोचलिनचे गरोदरपणातील फोटो सर्वात जास्त व्हायरल झाले होते. कारण ती संपूर्ण गरोदरपणात योगासने करत होती. गरोदरपणात कठीण आसने करू नयेत असं सांगितलं जातं. मात्र तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योगासने करू शकता. कल्कि तर गरोदरपणात मलासन आणि उत्कट कोनासन अशी आसनेही करत होती.
काजल अग्रवाल
साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे. गरोदरपणात फिट राहण्यासाठी काजल नियमित व्यायाम करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती बेबी बंपसह व्यायाम करताना दिसली होती. हा अनेक गरोदर महिलांना व्यायामासाठी प्रोत्साहन देणारा होता.
नेहा धुपिया
नेहा धुपिया आता दोन मुलांची आई झाली आहे. तिची मोठी मुलगी मेहरनंतर तिला आता मुलगा झाला आहे. मात्र दोन्ही गरोदरपणात शेवटच्या महिन्यापर्यंत नेहा काम करत होती. शिवाय व्यायामामुळे तिचं शरीर फिट देखील होतं. ज्यामुळे दोन्ही गरोदरपणानंतर लगेच ती पुन्हा तिच्या कामासाठी बाहेरदेखील पडू शकली.
किश्वर मर्चेंट
किश्वर मर्चेंट सध्या तिच्या तान्हुल्या लेकासह जीवनाचा आनंद घेत आहे. वयाच्या चाळिसाव्या वर्षी किश्वर आई झाली. मात्र तिचा गरोदरपणाचा प्रवास सुखकर होण्यासाठी ती नियमित व्यायाम करत असे.किश्वरनेही गरोदरपणात योगासने केल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले होते.
देबिना बॅनर्जी
देबिना बॅनर्जी आणि गुरमित चौधरी लवकरच आईबाबा होणार आहेत. मात्र पतीची मदत घेत तीदेखील सध्या व्यायामाचे नवनवीन प्रकार गरोदर असताना ट्राय करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने हॅंडस्टॅंड करताना फोटो शेअर केला होता. तिच्या मते जर तुम्ही गरोदरपणाच्या आधीदेखील व्यायाम करत असाल तर गरोदर असताना कोणतंही आसन तुम्ही नक्कीच करू शकता.
सूचना – गरोदरपणात नेहमी तज्ञ्जांच्या देखरेखी खाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. शिवाय जर तुम्ही आधी कधीच व्यायाम केलेला नसेल तर थेट गरोदरपणात व्यायाम करणं धोकादायक ठरू शकतं.