बॉलीवूड

प्रभासने अमिताभ बच्चन यांचा केला पाहुणचार, बिग बींचे जिंकले मन

Vaidehi Raje  |  Feb 22, 2022
prabhas 

वैजयंती मुव्हीजचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’चे शूटिंग सध्या हैद्राबाद येथे सुरू झाले आहे. या ऍक्शन चित्रपटात ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ‘बाहुबली’ प्रभास प्रथमच एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सध्या शूटिंगनिमित्त बिग बी प्रभासच्या शहरात आहेत. अतिथी देवो भव ही तर आपली संस्कृतीच आहे. त्यात जर बिग बी अतिथी म्हणून आले असतील तर त्यांचा पाहुणचार करण्याची संधी कोण सोडेल? त्यामुळे सध्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा प्रभासकडून पाहुणचार सुरु आहे. त्याने बिग बींसाठी खास त्याच्या घरचे जेवण आणले होते. त्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊन बिग बी खुश झाले आणि त्यांनी प्रभासचे कौतुक केले आहे. 

बिग बींनी ट्विटरवर केले कौतुक 

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते नेहेमीच त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांशी ट्विटरवरून शेअर करत असतात. तसेच बऱ्याचदा ते ट्विटरवर त्यांच्या सहकलाकारांचे कौतुक देखील करतात. नुकतेच बिग बींनी साऊथचा सुपरस्टार प्रभासचे ट्विटरवर कौतुक केले. त्यांनी ट्विट केले की, ‘बाहुबली’ प्रभास, तुझे औदार्य मोजण्यापलीकडचे आहे..तू खास माझ्यासाठी घरचे अत्यंत स्वादिष्ट जेवण आणतोस. अख्खे सैन्य जेवू शकेल इतके भरपूर जेवण तू माझ्यासाठी आणतोस. विशेषत: त्या खास कुकीज…अत्यंत चविष्ट आहेत. आणि तू हे माझे इतके कौतुक करतोस ते मात्र पचण्यासारखे नाही बरं का!” बिग बींनी प्रभासचे कौतुक करत आणखी एक ट्विट केले होते की, “पहिला दिवस .. पहिला शॉट .. ‘बाहुबली’ प्रभाससोबतचा पहिला चित्रपट.. आणि त्याची आभा, त्याची प्रतिभा आणि त्याच्या अत्यंत नम्रतेच्या सहवासात असणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. हे सगळे आत्मसात करतोय, शिकतोय.”

या कौतुकाला प्रभासनेही अगदी नम्र उत्तर दिले  

बिग बींबरोबर काम करण्याची संधी मिळणे हा माझे एक स्वप्न साकार करणारा क्षण आहे असे म्हणत प्रभासने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याने अमिताभ बच्चन यांचा 1975 सालचा  प्रसिद्ध चित्रपट ‘दीवार’मधील जुना फोटो पोस्ट केला. त्याने फोटोला कॅप्शन देत लिहिले, ‘हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. महान अमिताभ बच्चन सरांसोबत आज प्रोजेक्टचा पहिला शॉट पूर्ण केला.’ या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वीही प्रभास आणि अमिताभ बच्चन यांनी एकमेकांबरोबर पहिल्यांदाच चित्रपट करण्याचा आनंद व्यक्त केला होता. 

वैजयंती मूव्हीजचा हा प्रोजेक्ट के चित्रपट 2023 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. बिग बी आणि बाहुबली यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी जुळली आहे हे तर चित्रपट बघितल्यावरच आपल्याला कळेल.  पण या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच रंगली आहे हे तर त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स वरून आपल्याला दिसतेच आहे. थोडक्यात, बाहुबलीने बिग बींचे मन जिंकले आहे. 

प्रोजेक्ट के चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते नाग अश्विन करत आहेत. नाग अश्विन यांचे त्यांचा तामिळ चित्रपट ‘महानती’ साठी प्रचंड कौतुक झाले होते. आता प्रोजेक्ट के साठी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीच्या प्रॉडक्शन टीमने एक संपूर्ण नवीन जग तयार केले आहे. चित्रपटाचा भव्य सेट तयार झाला असून दोन्ही दिग्गजांनी शूटिंगला सुरुवात केली आहे. आणि प्रभासच्या पाहुणचाराने अमिताभ बच्चन फारच खुश झाले आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड