Acne

सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

Trupti Paradkar  |  Apr 26, 2019
सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

बेसन अथवा डाळीचे पीठ प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात असतं. कारण भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थांमध्ये डाळीचे पीठ वापरलं जातं. भजी, वड्या, लाडू, पुरणपोळीपासून ते अगदी बटाटवड्यापर्यंत अनेक पदार्थांमध्ये बेसन वापरावं लागतं. मात्र त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठीदेखील बेसन  अगदी फायदेशीर ठरतं. वास्तविक सौंदर्यासाठी बेसनाचा वापर फार पूर्वीपासूनच केला जात आहे. बेसनामुळे त्वचा मऊ आणि उजळ होते. लहान बाळालादेखील साबण न लावता बेसन लावल्यास त्याच्या अंगावरील केस कमी होतात. यासाठीच बेसनाचे हे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

बेसन आरोग्यासाठी फायदेशीर (Gram Flour Good For Health)

बेसन म्हणजेच चण्याच्या डाळीचे पीठात प्रोटीन्स आणि कार्बोहाडड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतात. शिवाय यामध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असते. चण्याच्या डाळीतील सर्व गुणधर्म बेसनामध्येदेखील असतात. बेसन तयार करण्यासाठी चण्याची डाळ दळली जाते. त्यामुळे त्यात पुरेशा प्रमाणात फायबर उपलब्ध असतात. ज्यामुळे तुमची पचनसंस्था कार्यरत राहते. एक  संशोधनानुसार बेसनामध्ये लिनोलिक आणि ऑलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे बेसणाचा आहारात वापर केल्यामुळे तुमचे योग्य पोषण होते. शिवाय चण्याच्या पीठात रिबोफ्लेविन, नियासिन, फॉलेट आणि बीटा-कॅरोटीनदेखील पुरेशा प्रमाणात असतात. मात्र शिजवल्यामुळे कधी कधी यातील पोषकतत्वे कमी होतात. यासाठी हे पीठ तव्यावर भाजून मग त्यापासुन पदार्थ शिजवले जातात.

बेसन त्वचेसाठी लाभदायक (Gram Flour Good For Skin)

आजीच्या बटव्यातील अनेक सौंदर्य उपायांमध्ये बेसनाचा वापर हा पहिल्या क्रमांकावर असतो. अनेक वर्षांपासून बेसन सौंदर्य खुलविण्यासाठी वापरले जात आहे. लहान बाळापासून ते अगदी नववधू पर्यंत सर्वांना अंघोळीआधी बेसनाचा लेप लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण बेसनामुळे त्वचेवरील अनावश्यक केस कमी होतात, त्वचा उजळते, त्वचेवरील काळे डाग, मुरमं कमी होतात. शिवाय बेसनाचा वापर तुम्ही चेहरा आणि शरीरातील इतर भागांच्या त्वचेवर करू शकतो. त्यामुळे बेसनचा वापर तुम्ही एखाद्या उटण्याप्रमाणे वापर करू शकता.

एक्ने कमी करण्यासाठी

बेसन लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरी मुरमांची समस्या कमी होऊ शकते. बेसनातील फायबरच्या घटकांमुळे तुमच्या त्वचेतील रक्ताभिरसण सुधारते. ज्यामुळे तुमचे हॉर्मोन्स संतुलित राहतात. जेव्हा तुमचे हॉर्मोन्स असंतुलित होतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक्ने अथवा मुरमं येतात. जर तुमचे  हॉर्मोन्स संतुलित असतील तर मुरमं येण्याची समस्या कमी होऊ शकतात. म्हणूनच बेसन चेहऱ्यावर लावल्यामुळे पिंपल्स नक्कीच कमी होऊ शकतात. यासाठी दोन चमचे बेसन आणि पाव चमचा हळद घ्या. त्यात एक चमचा लिंबू रस आणि मध मिसळा. चेहरा स्वच्छ करा आणि कोरडा करून त्यावर हा फेसपॅक लावा. दहा ते पंधरा मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

टॅन कमी करण्यासाठी

जर उन्हामुळे तुमची त्वचा टॅन झाली असेल तर सन टॅन काढण्यासाठी बेसन अतिशय उपयुक्त ठरेल. यासाठी पाच चमचे बेसन घ्या त्यात दिड चमचा लिंबाचा रस मिसळा. थोडेसे दही आणि चिमुटभर मीठ टाकून एक पॅक तयार करा. टॅन झालेल्या त्वचेवर हा पॅक लावा. पॅक सुकल्यावर थंड पाण्याने तो काढून टाका. जर तुम्हाला लवकर परिणाम हवा असेल तर तुम्ही दररोज हा पॅक लावू शकता.

डेड स्किन कमी करण्यासाठी

बेसन हे एक उत्तम स्क्रब आहे. बेसनमध्ये असलेल्या फायबरच्या घटकांमुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. ज्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात. त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्वचा फ्रेश दिसू लागते. यासाठी चार चमचे बेसन घ्या त्यामध्ये एक चमचा ओट्स पावडर आणि दोन चमचे कॉर्न फ्लॉअर मिसळा. कच्चे दूध टाकून एक फेस पॅक तयार करा. त्वचेवर हा पॅक लावून पंधरा ते वीस मिनीटांनी धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवरील धुळ,प्रदूषण आणि डेड स्किन निघून जाईल.

तेलकट त्वचेसाठी

जर तुमची त्वचा तेलकट असेल बेसन लावल्यामुळे तुमच्या त्वचेतील तेलकटपणा कमी होईल. यासाठी बेसन, दही अथवा दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. वीस मिनीटांनी चेहरा धुवून टाका. असे नियमित केल्यामुळे हळूहळू तुमच्या त्वचेतील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी

काहीजणींच्या चेहऱ्यावर  केस असतात. हे अनावश्यक केस वॅक्स अथवा रिमूव्हरने काढल्यास ते अधिक राठ होतात. यासाठी दररोज बेसनाचा वापर करा ज्यामुळे काही दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरील केस कमी होतील. हा पॅक तयार करण्यासाठी बेसन  आणि मेथी पावडर समप्रमाणात घ्या. गुलाबपाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर अथवा प्रभावित भागावर लावा. फेसपॅक सुकल्यावर ती काढून टाकण्यासाठी चेहऱ्यावर पाणी लावून मसाज करून तो काढून टाका. पॅक काढून टाकाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. असे नियमित करा ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस कमी होतील.

त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी

जर तुम्हाला एखाद्या समारंभाला जाताना इंस्टंट ग्लो हवा असेल तुम्ही बेसन वापरू शकता. कारण बेसनामुळे तुमची त्वचा लगेच नितळ आणि फ्रेश दिसू लागते. यासाठी चार चमचे बेसनामध्ये  एक चमचा संत्र्याचा रस आणि अर्धा चमचा मलई मिक्स करून एक फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहरा, मान आणि पाठीला लावा. वीस मिनीटांनी चेहरा आणि इतर भाग थंड पाण्याने धुवून टाका. चेहरा धुतल्यावर तुम्हाला एक वेगळाच ताजेपणा जाणवेल. जर शक्य असेल तर हा प्रयोग आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा करा.

चेहऱ्यावरील व्रण कमी करण्यासाठी

चेहऱ्यावर काळे डाग अथवा पिंपल्सच्या खुणा असतील तर बेसन लावून तुम्ही त्या कमी करू शकता. यासाठी तीन चमचे बेसनामध्ये एक चमचा कडुलिंबाची पावडर, दोन चमचे दूध आणि चिमुटभर हळद मिसळा. हा फेस पॅक चेहरा अथवा प्रभावित भागावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा धुवून टाका. हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण कमी होतील.

कोरड्या त्वचेसाठी

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एक चमचा बेसन, लिंबाच्या रसाचे काही थेंब, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा चमचा मध मिक्स करून एक फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकल्यावर चेहरा धुवून टाका. ज्यामुळे तुमचा चेहरा मऊ  आणि चमकदार दिसू लागेल.

तेलकट त्वचेसाठी

जर तुमची त्वचा फार तेलकट असेल तर दोन चमचे बेसनामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग मिसळा. हा फेसमास्क चेहऱ्यावर लावून चेहरा वीस मिनीटांनी थंड पाण्याने धुवा. या फेसमास्कमुळे तुमच्या चेहऱ्यातील अतिरिक्त तेल कमी होईल आणि चेहरा फ्रेश दिसू लागेल.

बेसनापासून तयार करा हे घरगुती फेसपॅक

बेसन आणि अंडे

जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर हा फेसपॅक तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरेल. यासाठी दोन अंडी फेटून घ्या त्यात एक चमचा बेसन मिसळा. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनीटांनी चेहरा धुवून टाका. अंड्यामुळे तुमच्या चेहऱ्यातील अतिरिक्त तेल कमी होईल. शिवाय त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल. आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा हा प्रयोग करा.

बेसन आणि गुलाबपाणी

जर तुमची त्वचा तेलकट असेल बेसन आणि गुलाबपाणी एकत्र करून एक फेसपॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावून पंधरा मिनीटांनी चेहरा धुवून टाका.

बेसन, दूध, मध आणि हळद

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एक चमचा बेसनमध्ये एक चमचा दूध, एक चमचा मध आणि चिमुटभर हळद टाकून एक फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून पंधरा मिनीटांनी चेहरा धुवून टाका.

बेसन आणि काकडीचा किस

जर तुम्हाला ओपन पोअर्सचा त्रास होत असेल तर एक चमचा बेसनामध्ये एक चमचा काकडीचा किस घालून एक पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे ओपन पोअर्सचा त्रास नक्कीच कमी होऊ शकेल.

केसांसाठी कसा कराल बेसनाचा वापर (Gram Flour Good For Hair)

त्वचेप्रमाणेच केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. कारण बेसनामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण होते. बेसनामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटिन्स असतात. जी तुमच्या केसांच्या वाढीसाठी लाभदायक ठरतात.

केस धुण्यासाठी

केस धुण्यासाठी शॅंपूऐवजी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. बेसन हा एक असा नैसर्गिक घटक आहे ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होऊ शकतात. यासाठी एका भांड्यामध्ये बेसन घ्या त्यात दूध अथवा पाणी मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून दहा मिनीटांनी केस स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही केसांना बेसन लावून स्वच्छ करू शकता.

केस लांब करण्यासाठी

केस लांब करण्यासाठी बेसनामध्ये बदाम तेल,दही, ऑलिव्ह ऑईल मिसळून एक हेअर मास्क तयार करा. जर तुमचे केस फारच कोरडे आणि रुक्ष असतील तर या हेअर मास्कमध्ये व्हिटॅमिन ई च्या दोन कॅप्सुल्स टाका. हा हेअर मास्क केसांवर लावून सुकल्यावर थंड पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा हा पॅक केसांना लावा ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतील.

कोंडा कमी करण्यासाठी

जर तुमच्या केसांमध्ये सतत कोंडा होत असेल तर सहा चमचे बेसन घ्या त्यात पाणी मिसळून एक हेअरमास्क तयार करा. केसांमध्ये हा हेअरमास्क लावून बोटांच्या मदतीने हलक्या हाताने केसांच्या मुळांना मालिश करा. दहा मिनीटांनी केस थंड पाण्याने धुवून टाका.

कोरड्या केसांना चमकदार करण्यासाठी

जर तुमचे केस फारच कोरडे आणि रुक्ष असतील तर हा हेअरमास्क तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरेल. यासाठी दोन चमचे बेसनामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा नारळाचे तेल मिसळा. हेअर मास्क तयार करा आणि तुमच्या ओल्या केसांवर लावा. पाच ते दहा मिनीटांनी कोमट पाण्याने केस धुवून टाका.

 

आरोग्यासाठी बेसन आहे उपयुक्त (Health Benefits Of Gram Flour)

बेसनाचे पदार्थ जितके स्वादिष्ट लागतात तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीरदेखील असतात. कारण बेसनामध्ये अनेक पोषणमुल्ये दडलेली आहेत.

कोलेस्ट्रॉल कमी होते (Reduces Cholesterol)

टोरंटो युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार दिवसभरात एकदा डाळीच्या पीठापासून तयार केलेले पदार्थ खाल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. कारण बेसनामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. एका ऑस्ट्रेलियातील संशोधनानुसार गव्हाच्या पीठापेक्षा चण्याच्या डाळीचे पीठ आरोग्यासाठी अधिक चांगले आहे कारण त्यामुळे तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. शिवाय बेसनामुळे तुमच्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

मधूमेह नियंत्रित राहतो (Controls diabetes)

अनेक संशोधनानुसार मधूमेहींसाठी बेसन फारच फायदेशीर आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते बेसन एक डायबिटीक फुड आहे. बेसनमधील फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे तुम्हाला लवकर टाईप 2 मधूमेह होण्याचा धोका कमी होतो.

ह्रदयाचे रक्षण होते (Protects Heart)

बेसनामध्ये  व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे बेसनाचे सेवन केल्यास ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. एका केळ्यात जितके पोटॅशियम असते तितकेच तीन चमचे बेसनात असते. पोटॅशियम रक्तदाब सुधारतो ज्यामुळे तुमचे ह्रदय मजबूत राहते.

वजन कमी होते (Helpful in weight loss)

बेसनामुळे तुम्हाला लवकर भुक लागत नाही. ज्यामुळे तुमचे वजन कमी होते. कारण बेसनात पुरेश्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमचे पोट सतत भरल्यासारखे राहते. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील फायबर इनटेक वाढवायचे असतील तर बेसनाचा वापर आहारात करा.

अशक्तपणा कमी होतो (Treats Anemia)

महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण अधिक असतं. ज्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते त्यांना अशक्तपणा अथवा अॅनिमियाचा त्रास होतो. त्यामुळे अशक्तपणा कमी करण्यासाठी आहारात पुरेसे बेसन घेण्यास सुरूवात करा. जे लोक मांसाहार करत नाही त्यांनी शरीरात लोहाची मात्रा वाढविण्यासाठी बेसनाचे प्रमाण वाढवावे. लोहामुळे तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित राहते.

हाडे मजबूत होतात (Strengthens Bones)

बेसनामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.

 

बेसनाबाबत तुमच्या मनातील प्रश्न FAQs

बेसन घरी कसे तयार करावे?

घरी  बेसन तयार करणे फारच सोपे आहे. यासाठी एक वाटी चण्याची डाळ मिस्करमध्ये लावून त्याचे पीठ तयार करा. गरजेचे असल्यास तुम्ही हे पीठ थोडं सरसरीत दळू शकता. शिवाय स्वयंपाकासाठी वापरायचे असल्यास दळण्यापूर्वी चणा डाळ तव्यावर थोडी भाजून घ्या. ज्यामुळे बेसनाला एक प्रकारचा खमंगपणा येईल. दळलेले चण्याच्या डाळीचे पीठ एका हवाबंद डब्यात भुरून करून ठेवा.

बेसन अतीप्रमाणात सेवन केल्यास नुकसान होऊ शकते का?

कोणत्याही पदार्थांचे अतीसेवन करणे नेहमीच नुकसानकारक असते. त्याचप्रमाणे बेसनाचे अतीप्रमाणात सेवन केल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. अपचनाचा त्रास होऊ नये यासाठी बेसनाचा कोणताही पदार्थ करताना ते व्यवस्थित शिजले आहे का याची काळजी घ्या.

त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती (Multani Mitti Benefits In Marathi)

चंदनाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे अवश्य जाणून घ्या

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From Acne