महाराष्ट्रात तांदुळ हे मुख्य अन्न म्हणून ओळखले जाते. विशेषतः कोकणात तांदळाचा भात दररोज खाल्ला जातो. मात्र तुम्हाला या तांदळाचे सौंदर्य फायदे माहीत आहेत का? फार प्राचीन काळापासून तांदळाचा वापर आरोग्य आणि सौंदर्य समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. तांदुळ धुण्यासाठी वापरले गेलेले पाणी फेकून देण्यापेक्षा ते तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरू शकता. या पाण्याने केस आणि त्वचा धुतल्यास तुमच्या अनेक आरोग्य समस्या कमी होतात. तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, खनिजे, एमिनो अॅसिड आणि कार्बनिक अॅसिड असतात. ज्यामुळे हे पाणी तुमच्या त्वचा पेशींसाठी अतिशय पुरक आणि पोषक असते. त्वचेप्रमाणेच तुमच्या केसांच्या सौंदर्यासाठीदेखील ते फार महत्त्वाचे ठरते. आजही काही महिला या पाण्याचा त्यांच्या सौंदर्योपचारांसाठी वापर करतात. यासाठीच जाणून घ्या तांदळ्याच्या पाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे
तांदळाचे पाणी कसे तयार करावे –
एका भांड्यात अर्धा कप तांदूळ घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्या. कारण आजकाल धान्य टिकवण्यासाठी त्यावर अनेक कीटकनाशकांचा वापर केला जातो. ज्यासाठी तांदूळ तीन ते चार वेळा वाहत्या पाण्यावर धुवून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर धुतलेले तांदूळ आणि दोन कप पाणी घ्या आणि थोडावेळ तांदूळ भिजत ठेवा. पाण्याचा रंग पांढरट झाल्यावर तांदळातून पाणी गाळून घ्या आणि तुमच्या सौंदर्योपचारांसाठी वापरा. पाणी काढल्यावर तांदूळ तुम्ही पुन्हा अन्न शिजवण्यासाठी वापरू शकता. यासोबतच तुम्ही तांदूळ शिजताना त्यातील जास्तीचे पाणी बाजूला काढूनही त्याचा वापर तुमच्या तुमच्या ब्युटी केअरसाठी करू शकता.
Shutterstock
सौंदर्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कसा कराल वापर –
आजकाल अनेकींना त्वचा आणि केसांच्या समस्या जाणवत असतात. ज्या दूर करण्यासाठी तुम्ही अनेक महागडे उपचार करत असता. मात्र तांदळाचे पाणी वापरून जर तुम्ही तुमची स्कीन केअर अथवा हेअर केअर घेतली तर तुम्हाला चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील.
त्वचेचा पोत सुधारतो –
आजकाल धुळ, माती, प्रदूषण, सुर्यप्रकाशात सतत फिरण्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग काळवंडतो. मात्र जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा पोत नैसर्गिक पद्धतीने सुधारा असे वाटत असेल तर हा उपाय जरूर करा. यासाठी एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्या आणि त्यात कोरफडाचे जेल मिसळा. या पाण्याने तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. दहा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. आठवड्यातून हा उपाय कमीतकमी दोन ते चार वेळा करा.
चेहऱ्यावरील एक्ने होतील कमी –
तेलकट त्वचा आणि बदलेली जीवनशैली यामुळे बऱ्याच मुलींना चेहऱ्यावर एक्नेची समस्या जाणवते. तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण वेळीच काळजी घेतली नाही तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. मात्र तांदळाच्या पाण्याचा वापर करून तुम्ही या समस्येला दूर नक्कीच ठेवू शकता. यासाठी तांदळाचे पाणी कापसाच्या मदतीने तुमच्या एक्नेवर लावा. दोन ते तीन तासांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल.
Shutterstock
सनबर्नच्या खुणा कमी होतील –
उन्हाळ्याप्रमाणेच जास्त प्रवासाची आवड असलेल्या लोकांना कोणत्याही ऋतूत सनबर्नची समस्या जाणवू शकते. सतत सुर्यप्रकाशाच्या सानिध्यात आल्यामुळे तुमच्या त्वचेवर सनबर्नच्या खुणा दिसू लागतात. सुर्यप्रकाशामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा नॉर्मल करण्यासाठी हा उपाय तुमच्या फायद्याचा ठरेल. यासाठी तुमच्या सनबर्न झालेल्या त्वचेवर तांदळाचं पाणी लावा आणि वीस ते तीस मिनीटांनी त्वचा थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमच्या त्वचेचा काळसरपणा कमी होईलच शिवाय त्वचेला थंडावाही मिळेल.
त्वचेवर टोनरसारखा करा वापर –
तांदळाच्या पाण्यात अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळतो. जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि मुलायम व्हावी असं वाटत असेल तर रोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा. ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम होईल.
घनदाट आणि लांब केसांसाठी –
तांदळाच्या पाण्यामुळे तुमच्या त्वचेला जसा फायदा होतो तसाच तुमच्या केसांवरही चांगला परिणाम होऊ शकतो. कारण या पाण्यात इनोसिटोल असतं जे एक कार्बोहायड्रेट आहे. यामुळे तुमचे केस घनदाट आणि लांबसडक होतात. तांदळाच्या पाण्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळतं ज्यामुळे ते मजबूत होतात. यासाठीच केस धुतल्यावर तांदळाच्या पाण्याचा वापर एखाद्या कंडीश्नरप्रमाणे करा.
केसांमधील कोंडा कमी होतो –
थंडीच्या दिवसात आपल्या केसांचा स्काल्प म्हणजेच त्वचा कोरडी होते. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या वाढू लागते. जर तुम्हाला सतत कोंड्याचा त्रास होत असेल तर तांदळाचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तांदळाच्या पाण्यात एका लिंबाचा रस मिसळा. हे पाणी शॅंपू करण्यापूर्वी एक तास आधी तुमच्या केसांच्या मुळांना हे पाणी लावून ठेवा. एक तासानंतर शॅंपू करा ज्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल.