ना चाहू सोना- चांदी … ना चाहू हिरा मोती… ये मेरे किस काम के …गाण्यात असे कितीही म्हटलेले असले तरी देखील या सगळ्या गोष्टींचे आपल्या आयुष्यात काही ना काही महत्व आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपण धनवान होतो. पण या व्यतिरिक्त आरोग्यासाठीही त्याचे अनेक फायदे आहेत. आता चांदीची घ्या ना.. चांदीपासून अनेक प्रकारची भांडी बनवली जातात. लहान मुलांना अगदी आवर्जून चांदीची भांडी दिली जातात. या भांड्यामध्ये जेवू घातल्यामुळे अनेक फायदे मिळण्यास मदत होते. असे अनेक शास्त्रातही लिहून ठेवले आहे. चांदीच्या ग्लासातून मुलांना पाणी, जेवण दिल्यामुळे अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. लहान मुलंच नाही तर मोठी माणसंसुद्धा चांदीच्या ताटात आहार करु शकतात. जाणून घेऊया चांदीच्या ताटात जेवण्याचे फायदे
रौप्यं भवति चक्षुष्यं पित्तहृत् कफवातकृत् ।…. निघण्टु रत्नाकर
सोन्यानंतर येणाऱ्या चांदीच्या ताटाबद्दल असे लिहून ठेवलेले आहे. चांदीमध्ये असलेले घटक शरीरातील अनेक व्याधींना दूर करण्याचे काम करत असतात. त्यामुळेच अनेक डाएटिशिएन किंवा डॉक्टरदेखील लहान बाळांना चांदीच्या भांड्यात जेवण भरवण्याचा आग्रह अगदी हमखास करतात.
चांदीच्या ताटात जेवण्याचे फायदे
चांदीच्या ताटात जेवल्यामुळे नेमके कोणते फायदे होतात ते आता आपण जाणून घेऊया.
- चांदीच्या ताटात आजारांविरोधात लढण्याची क्षमता असते. साथीच्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवण्याचे काम चांदी करु शकते. तुमचा रोजचा आहार चांदीच्या ताटातून गेला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळण्यास मदत मिळेल.
- अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये चांदीचा समावेश केला जातो. लहान मुलांच्या मेंदूचा विकास चांगला होण्यासाठी मदत मिळते. बाळाच्या वाढीचे टप्पे आणि त्यांच्या मेंदूचा विकास चांगला व्हावा यासाठी नक्कीच चांदीच्या ताटात, ग्लासात सेवन करायला हवे.
- चांदीच्या ग्लासात पाणी पिण्याचेही अनेक आरोग्यवर्धक असे फायदे आहेत. चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्यामुळे अशुद्ध पाण्यातील बॅक्टेरिया निघून जातात. चांदीच्या ग्लासातील खनिजे अशुद्ध घटकाला दूर ठेवण्याचे काम करतात.
- शरीराची चयापचय क्रिया सुरळीत ठेवायची असेल तरी देखील चांदी ही आपल्यासाठी फायद्याची ठरते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. लहान मुलांना अनेक आजार बळावण्याची शक्यता असते अशावेळी त्यांना आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते.
- चांदीच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे थंडी आणि खोकला असा त्रास होत नाही. चांदी थंड असल्यामुळे ऋतुमानानुसार होणारा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात चांदीच्या भांड्यात पाणी पिणे अधिक लाभदायक ठरते. कारण शरीराला अंतर्गत थंडावा मिळण्यास मदत मिळते.
- चांदीच्या भांड्यामध्ये मुलांना औषधे दिली तरी देखील चालू शकतात. औषधांचे घटक अधिक चांगल्या पद्धतीने मिळण्यास मदत मिळते.
- कांती सुधारण्यासाठीही चांदीचे भांडे फायद्याचे असते.चांदीच्या भांड्यातून तुम्ही बाळाला दूध दिले तर त्याला त्याचे अधिक लाभ मिळतात.
आता लहान मुलांना आवर्जून चांदीच्या भांड्यात जेवू घाला.