Diet

मधुमेहींनी या कारणांसाठी नियमितपणे खावे डाळिंब

Vaidehi Raje  |  Jul 27, 2022
Benefits Of Pomegranate For Diabetes

भारतात मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आहारविहाराची काळजी न घेणे, भेसळयुक्त अन्न , व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता , तणावयुक्त आयुष्य यामुळे मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णांना त्यांच्या आहाराची जास्त काळजी घ्यावी लागते. मधुमेही व्यक्तीचा आहार मर्यादित असतो. गोड पदार्थ तसेच जास्त प्रमाणात कर्बोदके असलेल्या अन्नाचे सेवन केल्याने मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होतो कारण वाढलेल्या रक्तशर्करेमुळे आपल्या महत्वाच्या अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहाराबाबत बेफिकीर राहिल्यास त्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. इतर लोकांसाठी आरोग्यदायी असलेली विविध प्रकारची फळे आणि त्यांचे रस हे  मधुमेही रुग्णांसाठी कितपत योग्य आहेत याबाबत अनेक मते आहेत. आज आपण जाणून घेऊया की डाळिंबाचा रस मधुमेहींसाठी चांगला आहे की नाही. 

मधुमेह म्हणजे काय? 

मधुमेह हा एक असा विकार आहे ज्यामध्ये स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील कार्य विस्कळीत होते. त्यामुळे रक्ताभिसरणातील ग्लुकोज किंवा साखरेची पातळी अनियंत्रित होते. त्यामुळे व्यक्तीमध्ये ऊर्जा चयापचय आणि किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे त्या व्यक्तीला हृदयाच्या समस्यांसारख्या इतर अनेक आरोग्य समस्या होण्याची शक्यता देखील वाढते. काही घरगुती उपाय करून मधुमेह नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

मधुमेहींनी डाळिंब खाणे योग्य आहे का? 

Benefits Of Pomegranate For Diabetes

चिकू, आंबा अशी साखर जास्त असलेली फळे मधुमेहींना चालत नाहीत. पण अशी अनेक फळे आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास मधुमेहींना कोणत्याही समस्या होत नाहीत. यापैकी एक फळ डाळिंब आहे. मधुमेहींनी नियमितपणे डाळिंबाचे सेवन केले किंवा त्याचा रस प्यायल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. एखाद्या व्यक्तीला टाइप 2 मधुमेह असल्यास, त्याला शरीरावर सूज येण्याची समस्या देखील होते. पण डाळिंबात असलेले फ्लेव्होनॉइड व अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यास मदत करतात. मधुमेहींची रक्तशर्करा जास्त असल्याने त्यांना स्नायू दुखणे आणि थकवा येणे हा त्रास होतो. ही वेदनादायक लक्षणे कमी करण्यासाठी देखील डाळिंबाचे सेवन उपयुक्त आहे.

हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते 

ज्या लोकांना मधुमेह असतो, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्याने  हृदय निरोगी राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की डाळिंबाचा रस प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये खराब एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. आणि रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे उद्भवणाऱ्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत टाळते.

डाळिंबामध्ये कार्ब्सचे प्रमाण कमी आहे

Benefits Of Pomegranate For Diabetes

मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कर्बोदकांनी युक्त अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते लवकर पचतात आणि  त्यांचे साखरेत रूपांतर होते. त्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. पण डाळिंबात कर्बोदकांचे प्रमाण खूपच कमी असते. डाळिंबाचे ग्लायसेमिक लोड मूल्य 18 आहे. ग्लायसेमिक लोड (GL) ग्लायसेमिक इंडेक्स (GI) प्रमाणेच आहे. डाळिंब हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ मानले जाते. डाळिंबाचा जीआय 55 पेक्षा कमी आहे आणि त्यामुळे ते हळूहळू पचते. त्यात साखर असली तरी त्यात फिनोलिक संयुगे मुबलक प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर डाळिंब खाल्ल्याने किंवा त्याचा ताजा रस प्यायल्याने भूकही नियंत्रणात राहते. 

म्हणूनच मधुमेह नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दिवसातून एकदा किंवा दुपारी एक ग्लास डाळिंबाचा रस घेऊ शकता. पण रस घेण्यापेक्षा डाळिंबाचे दाणे खाणे जास्त फायदेशीर आहे. मर्यादित प्रमाणात डाळिंबाचे सेवन केल्यास मधुमेहींना त्याचा निश्चितच फायदा होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet