शेंगदाणे स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ज्यांना बदाम, काजू सारखा सुकामेवा खाणं परवडत नाही त्यांच्यासाठी शेंगदाणे उत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकात शेंगदाण्याचा वापर केला जातो. शेंगदाणे एक सूपरफूड असून त्यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. शेंगदाण्यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, झिंक, मिनरल्स, फायबर्स, आणि इतर पोषक घटक असल्यामुळे शेंगदाणे खाण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. स्वयंपाकासाठी बऱ्याचदा शेंगदाणे भाजून त्याचा कुट वापरला जातो. आहारतज्ञ्जांच्या मते जर शेंगदाणे भिजवून मग ते खाल्ले तर ते आरोग्यासाठी जास्त लाभदायक ठरतात. यासाठी जाणून घ्या भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे
शेंगदाणे खाण्याचे फायदे हे आरोग्यदायी (Shengdane Khanyache Fayde In Marathi)
ह्रदयाच्या आरोग्यासाठी
निरोगी राहण्यासाठी ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहणे खूप गरजेचे आहे. मात्र आजकालच्या धापवळीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेकांना ह्रदयाच्या समस्या जाणवतात. मात्र जर तुम्ही नियमित भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर तुमचे ह्रदय नक्कीच निरोगी राहू शकते. कारण शेंगदाण्यामध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह घटक असतात. ज्याचा तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यासाठी रात्री वाटीभर शेंगदाणे भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर ते नाश्त्यामध्ये खा. ह्रदयाचे आरोग्य जपण्यासाठी दररोज खा शेंगदाणे
शरीरसौष्ठवासाठी –
ज्यांना शरीरसौष्ठव म्हणजेच बॉडीबिल्डिंगमध्ये रस आहे अशा लोकांनी बदामाप्रमाणेच सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास चांगला फायदा होऊ शकतो. याचं प्रमुख कारण म्हणजे शरीराच्या सुडौल आकारासाठी आणि शरीर मजबूत होण्यासाठी लागणारे पोषक घटक शेंगदाण्यामध्ये असतात. शरीराला पुरेसे पोषण मिळाल्यामुळे तुमच्या शरीराला सुरेख आकार आणि मजबूती मिळते. मात्र त्यासाठी शेंगदाणे रात्री भिजत घालून ते सकाळी चावून खाणे गरजेचे आहे.
त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी –
शेंगदाणे फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फार उपयुक्त ठरतात. भिजवलेले शेंगदाणे खाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पार्लरमध्ये फेशिअल केल्याप्रमाणे नैसर्गिक ग्लो येतो. याचं कारण असं की शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या शेंगदाणे खाण्यामुळे कमी होतात. चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसण्यासाठी हा घरगुती उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.
शरीराला पुरेसं झिंक मिळण्यासाठी आहारात वाढवा हे पदार्थ
स्मरणशक्ती वाढण्यासाठी –
लहान मुलांना अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी आणि वृद्धांना दैनंदिन गोष्टी विसरू नये यासाठी स्मरणशक्ती वाढेल असा आहार देणं गरजेचं असतं. बदामाप्रमाणेच शेंगदाण्यामध्येही ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते आणि स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे ज्यांना बदाम खाणं परवडत नाही त्यांच्यासाठी शेंगदाणे वरदान ठरू शकतात. बदामापेक्षा शेंगदाणे स्वस्त असल्यामुळे मुलांना आणि घरातील सर्वांनाच भिजवलेले शेंगदाणे खाण्यास देणे फायद्याचे ठरू शकते.
पचनासाठी उपयुक्त –
आजकाल चुकीच्या आहारामुळे अनेकांना सतत अपचनाचा त्रास होत असतो. जर तुम्हाला खाण्याची वेळ नीट पाळता येत नसेल तर त्याचाही परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. पोट स्वच्छ होते आणि पोटात गॅसेस होणे, बद्धकोष्ठता, मुळव्याध, पोटाचे विकार होण्याचा त्रास कमी होतो.