खाद्यपदार्थांना मसाल्यांमुळे एक छान चव येते. तुमचा मसाला जितका ताजा आणि चविष्ट असेल तितका पदार्थ रूचकर होतो. मसाल्यांमुळे येणारा सुगंध तुमची भुक वाढवतो. भारतीय खाद्य संस्कृतीत निरनिराळ्या पदार्थासाठी निरनिराळा मसाला वापरण्याची पद्धत आहे. काही मसाले नेहमी वापरले जातात तर काही मसाले खास पदार्थांसाठी वापरले जातात. म्हणूनच वर्षभरासाठी अथवा महिनाभरासाठी निरनिराळे मसाले तयार करून ते साठवून ठेवावे लागतात. पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात मसाले ओलाव्यामुळे खराब होऊ शकतात. यासाठी ते व्यवस्थित साठवून ठेवणं गरजेचं असतं. गोडा मसाला, काळा मसाला, गरम मसाला, कांदालसूण मसाला, मालवणी मसाला, सीकेपी मसाला, लाल मसाला असे मसाल्याचे निरनिराळे प्रकार असल्यामुळे ते साठवण्याची पद्धतही निरनिराळी असते.
मसाले टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
मसाला कोणत्या प्रकारचा आहे. यावर तो किती दिवस टिकणार आणि तो कसा टिकवायचा हे ठरत असते.
चिनी माती, काचेच्या अथवा स्टीलच्या डब्यात ठेवा
मसाले वर्षभर टिकवण्यासाठी ते काच, चिनी मातीची बरणी अथवा स्टिलच्या डब्यात साठवून ठेवावे. कारण काच अथवा चिनी मातीच्या बरणीत बुरशी लागण्याची शक्यता कमी असते. नेहमीचा मसाला एखाद्या छोट्या बरणीत काढावा आणि वर्षभराचा मसाला एखाद्या मोठ्या डब्यात आणि सतत हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. डबा अथवा बरणीचे झाकण घट्ट असेल याची काळजी घ्यावी. कारण मसाल्याला हवा लागली तर तो लवकर खराब होऊ शकतो.
उन्हात ठेवू नका
मसाले तुम्ही कुठे साठवून ठेवता हे खूप महत्त्वाचे आहे. कारण मसाले ठेवलेल्या ठिकाणी जर ऊन येत असेल तर ते उन्हामुळे खराब होऊ शकतात. मसाले खराब होऊ नयेत यासाठी मसाला तयार करण्यापूर्वीच मिरची ऊन्हात सुकवली जाते. मात्र एकदा मसाला तयार झाला की तो तुम्ही थेट ऊन्हात ठेवू शकत नाही. असं केलं तर मसाल्याचा रंग, स्वाद निघून जाण्याची शक्यता असते.
कोणते मसाले फ्रीजमध्ये ठेवावे
ओल्या स्वरूपातील म्हणजे कांदा लसणाची पेस्ट, वाटपाचा मसाला तुम्ही साठण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. मात्र कोरड्या स्वरूपातील वर्षभर टिकवण्यासारखे मसाले कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. अनेकांना मसाल्याची पाकिटे फ्रीजमध्ये कोंबून ठेवण्याची सवय असते. मात्र असं केल्यामुळे तो मसाला लवकर खराब होतो आणि त्याची चव देखील कमी होते.
हिंगाचा खडा मसाल्यात ठेवा
वर्षभराचा लाल मसाला तुम्ही साठवून ठेवणार असाल तर मसाल्यामध्ये मोठे हिंगाचे खडे ठेवावे. ज्यामुळे मसाला लवकर खराब होत नाही. शिवाय लाल मसाला टिकण्यासाठी तुम्ही त्यात मीठाचे खडेही टाकू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक