मनोरंजन

‘आनंदी गोपाळ’चा टिझर प्रदर्शित…गोपाळराव साकारणार अभिनेता ललित प्रभाकर

Trupti Paradkar  |  Jan 10, 2019
‘आनंदी गोपाळ’चा टिझर प्रदर्शित…गोपाळराव साकारणार अभिनेता ललित प्रभाकर

मराठी चित्रपटात सध्या एकापाठोपाठ एक बायोपिक येत आहेत. पु.ल.देशपांडेंच्या ‘भाई व्यक्ती की वल्ली’ नंतर आता आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदीगोपाळ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ‘आनंदीबाई जोशी’ यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. ‘आनंदीगोपाळ’या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट 15 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या आनंदीगोपाळचे दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत. या चित्रपटात गोपाळरावांची प्रमुख भूमिका अभिनेता ललित प्रभाकर करत आहे. टिझरमध्ये गोपाळरावांचे स्रीशिक्षणाबाबतचे परखड मत दाखवण्यात आले आहे. अभिनेता ललित प्रभाकर पहिल्यांदाच अशा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.  गोपाळरावांची भूमिका साकारण्याचं आव्हान ललितने लीलया पेललं आहे असंच या टिझरवरुन दिसत आहे. मात्र या टिझरमध्ये आनंदीबाईंची भूमिका नेमकं कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सहाजिकच आनंदीबाईंच्या भूमिकेसाठी नेमकी कोणत्या अभिनेत्रीची निवड झाली आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोपाळराव आनंदीबाईंचा खरा आधार

असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण आनंदीबाईच्या यशामागे खरा आधार ठरले ते त्यांचे पती गोपाळराव जोशी. आज आनंदीबाई जोशी हे नाव जगभरात आदराने घेतलं जातं. वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे अगदी लहान वयात आनंदीबाईंचा विवाह गोपाळरावांशी झाला. आनंदीबाईंशी लग्न करताना “मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन” अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या वडिलांना घातली होती. गोपाळराव त्या काळातदेखील अतिशय पुढारलेल्या विचारांचे होते. समाजाचा विरोध आणि प्रतिकूल परिस्थितींवर मात करत त्यांनी आनंदीबाईंना डॉक्टर केलं. आनंदी बाई आणि गोपाळरावांचा हा खडतर जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

प्रमोशनामधून मराठी अभिनेत्रींची आनंदीबाईंना मानवंदना

प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी आनंदीबाई प्रेरणास्थान आहेत. आनंदीबाईंनी स्वकर्तृत्वाने स्वतःचं एक वेगळं स्थान प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनात निर्माण केलं आहे. याच गोष्टीचा वापर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण्यात आला आहे. काही दिवसांपासून अनेक मराठी अभिनेत्रींचे नथ घातलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी अभिमान, 132 वर्षांपूर्वीचा इतिहास अशा हॅशटॅग पोस्टसाठी वापरण्यात आले होते. नथ घालून मराठी अभिनेत्रींनी आनंदीबाईंना दिलेली ही खऱ्या अर्थाने मानवंदना  आहे. आनंदीगोपाळ चित्रपटाचं स्वागत मराठी अभिनेत्रींनी अशा अगदी वेगळ्या स्वरुपात केलं होतं. अमृता खानविलकर,प्रिया बापट,सोनाली कुलकर्णी, प्रियांका बर्वे, दिप्ती देवी, आनंदी जोशी, स्पृहावरद, तेजश्री प्रधान, मृण्मयी देशपांडे, मनवा नाईक, स्नेहलता वसईकर या मराठी अभिनेत्रींनी हे व्हिडिओ शेअर केले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून या चित्रपटातून आनंदीबाई जोशी यांच्या कर्तृत्वाला पुन्हा उजाळा दिला जाणार आहे.

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन