मनोरंजन

कॅन्सरशी लढा दिलेले टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटीज

Sneha Ranjankar  |  Dec 19, 2018
कॅन्सरशी लढा दिलेले टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटीज

आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की, आपलं आयुष्यही बॉलीवूड सेलिब्रिटीजसारखं असायला हवं. त्यांच्यासारखे कपडे, मेकअप आणि त्यांचं लाईफस्टाईल चांगलं अनुभवता आलं असतं. पण काही बाबतीत देव भेदभाव करत नाही. काही गोष्टींमध्ये श्रीमंत-गरीब असा भेदभाव नसतो. असंच काहीसं आहे कॅन्सर रोगाबाबत. खरंतर कॅन्सर नेमका कसा होतो, याचा नेमका अजून शोध लागायचा आहे. त्याचबरोबर तो कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकतो याबाबतही संशोधन सुरू आहे. कॅन्सरशी संघर्ष करायचा ही सोपी बाब नव्हे. मात्र या लढाईला काहीजणं जिद्दीनं सामोरं जातात आणि जिंकतात. मात्र काही लोकं कॅन्सरपुढे हात टेकतात.

आम्ही तुम्हाला कॅन्सरशी संघर्ष केलेल्या 10 सेलिब्रेटीजबाबत सांगणार आहोत, ज्यांनी मोठ्या हिंमतीने कॅन्सरशी लढा दिला. त्यातल्या काही जणांच्या पदरी यश आलं तर काही जण दुर्देवी ठरले.  

1. सोनाली बेंद्रे

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला अशी बातमी आली आणि फक्त बॉलीवूडच नाही तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र सोनालीने मोठ्या धैर्यानं कॅन्सरशी लढा देत न्यूयॉर्कमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि मायदेशी परतली. या संकटकाळात तिचा नवरा गोल्डी बहल आणि कुटुंबिय खंबीरपणे तिच्यामागे उभे होते. कॅन्सरबद्दल सांगताना सोनालीने सांगितलेली माहिती अशी की, तिला अंगदुखीचा खूप त्रास होत होता. म्हणून तिने काही टेस्ट केल्या, तेव्हा तिला हाय ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सर झाल्याचं कळलं. या कॅन्सरमुळे शरीरातील कुठल्याही भागाच्या पेशींची अबनॉर्मल वाढ होऊ लागते. त्या पेशी वाढत वाढत शरीराच्या इतर भागांमध्ये घुसखोरी करतात. या पेशी दुसऱ्या भागात गेल्यास त्याच रुपांतर ट्युमरमध्ये होतं. म्हणून त्याला मेटास्टॅटिक ट्यूमर किंवा कॅन्सर म्हणतात.  मेटास्टॅटिक कॅन्सर ही गंभीर असतो. कारण यामध्ये कॅन्सर शरीराच्या अन्य भागात पसरतो. सोनालीला गर्भाशयाचा मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता.

कॅन्सरवर मात करत सोनाली परतली मायदेशी

2. इरफान खान

बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता इरफान खानने 2018 वर्षाच्या मार्च महिन्यात जाहीर केलं की, त्याला कोणता तरी असाध्य रोग झालायं. जो फारच कमी जणांना होतो. त्यानंतर त्यांने रोगाविषयी माहिती दिली. त्याला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर झाल्याचं त्यानं स्पष्ट केलं. यात ट्यूमर हा शब्द असल्याने अनेक लोकांना वाटलं की, त्याला ब्रेन ट्यूमर झालायं. मात्र इरफानने ट्विटरवर स्पष्टपणे सांगितलं की, याचा आणि मेंदूचा तसा काही संबंध नाही. खरंतर न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरमध्ये न्यूरो एंडोक्राइन सेल्सची अबनॉर्मल वाढ होऊ लागते. जशी कॅन्सरमध्ये होते तशीच. न्यूरो एंडोक्राइन सेल्स हार्मोन्सचं उत्पादन करते. हा ट्यूमर फक्त मेंदूतच नाही तर फुफ्फुसांमध्ये, आतड्यांमध्ये किंवा स्वादूपिंडासारख्या कुठल्याही भागात होऊ शकतो.  समस्त बॉलीवुड इंडस्ट्री आणि इरफानचे फॅन्स तो बरा व्हावा, यासाठी आता प्रार्थना करता आहेत.

3. मनीषा कोईराला

मनीषाला तिच्या वयाच्या 42 व्या वर्षी कळलं की, तिला अंडाशयाचा कर्करोग म्हणजेच ओव्हरी कॅन्सर झाला होता. मनिषाचं लग्न 19 जून 2010 ला नेपाळी बिझनेसमॅन सम्राट दहालशी झालं होतं. मात्र ते फार दिवस टिकलं नाही आणि 2012 ला तिला कॅन्सर झालायं, हे उघड झालं. हे कळल्यानंतर कालांतराने तिचा घटस्फोटही झाला. त्यावेळी ती काठमांडूत रहात होती. पण लवकरच तिने स्वतःला या धक्क्यांमधून सावरलं आणि कॅन्सरशी लढा देण्याचं ठरवलं. तिने मुंबई आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. खूप काळ लढा दिल्यानंतर अखेर ती जिंकली आणि 2014 मध्ये तिची कॅन्सरपासून कायमची सुटका झाली. पण त्यानंतर ही तिने काम सुरू ठेवले आणि ‘संजू’ या सिनेमातून परत एकदा जोमानं बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं.  

4. लिझा रे

टोरांटोमध्ये लहानाची मोठी झालेली एक कॅनेडियन अभिनेत्री आणि फॅशन इंडस्ट्रीतली मॉडेल म्हणजे लिझा रे. तिने वयाच्या 16 व्या वर्षीच मॉडलिंगमध्ये करिअर सुरु केलं होतं. लिझाचा जन्म कॅनडातील ओन्टारियोमधल्या टोरोंटोमध्ये झाला. तिचे बाबा भारतीय वंशाचे असून ते बंगाली आहेत तर आई पोलिश वंशाची आहे. तिने भारतात येऊन बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. तिने बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी जमही बसवला. मात्र 23 जून 2009 ला तिला मल्टीपल मायेलोमा म्हणजेच बोन मॅरो कॅन्सर झाल्याचे उघडकीस आले. हा एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग आहे. जबरदस्त इच्छाशक्ती, मेडीटेशन आणि वेळेत उपचार घेतल्यामुळे तिने एका वर्षात या भयंकर रोगावर विजय मिळवला. आता सरोगसीच्या माध्यमातून ती मातृत्वचा ही आनंद घेतेयं.

5. अनुराग बासू

बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग बासूला 2004 सालामध्येच समजलं होतं की, त्याला  ब्लड कॅन्सर (promyelocytic Leukemia) झाला आहे. डॉक्टरांनी तर त्याला दोन महिन्यांचं आयुष्य बाकी आहे, असं सांगितलं होतं. मात्र हार मानेल तो अनुराग कसला? त्याने तीन वर्षे अविरतपणे कॅन्सरशी झुंज दिली. त्यानंतर तो आत्मविश्वासाच्या जोरावर संपूर्णपणे बरा झाला आणि बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं. अनुराग म्हणतो की, त्याला कॅन्सरशी लढावं नाही लागलं तर कॅन्सरला त्याच्याशी लढावं लागलं.  .

6. आदेश श्रीवास्तव

मध्य प्रदेशमधल्या जबलपूरचा रहिवासी असलेला आदेश श्रीवास्तव यांच बॉलीवूडमध्ये प्रसिध्द संगीतकार आणि गायक म्हणून खूप मोठं नाव होतं. खूप वर्ष कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर वयाच्या 51व्या वर्षी त्याला कॅन्सरने हरवलं आणि मुंबईतल्या कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. याआधीही त्याने कॅन्सरशी झुंज दिली होती आणि त्यावर मात केली होती. मात्र दुसऱ्यावेळी बराच काळ लढल्यानंतर कॅन्सरने त्याला हरवलं. त्याने आजतागायत 100 पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिलं आहे. आदेशची बायको विजेता पंडित ही प्रसिध्द संगीतकार जोडी ‘जतिन- ललित’ यांची बहीण आहे.

7. विनोद खन्ना

एकेकाळी बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेता विनोद खन्ना यांना वयाच्या 70 व्या वर्षी कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला होता आणि कळलं तेव्हा तो अॅडव्हान्स स्टेजमध्ये होता. अखेर खूप काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर 27 एप्रिल 2017 मुंबईतल्या एच. एन. रिलायंस हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विनोद खन्ना राजकारणात सक्रिय होते. ते पंजाबचे खासदार होते व त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय मंत्री आणि पर्यटन मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

8. फिरोज खान

बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि फॅशन आयकॉन फिरोज खान यांचा जन्म पठाणांच्या घरात झाला होता आणि त्यांची आई ईराणी वंशाची होती. आयुष्यात शांतता मिळावी म्हणून फिरोज यांनी मायानगरी मुंबईला रामराम ठोकला होता आणि ते बंगळुरू शहराच्या बाहेरच्या भागात स्वतःच्या फार्महाऊसमध्ये वास्तव्य केलं. पण त्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर झाला आणि उपचारांसाठी परत मुंबई गाठावी लागली.  उपचारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी हार मानली तेव्हा शेवटचा काळ तरी हवा तसा घालवता यावा म्हणून ते आपल्या फार्महाऊसवर परतले. शेवटी 27 एप्रिल 2009 रोजी वयाच्या 69 वर्षी, फुफ्फुस कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं.

9. मुमताज

आपल्या जमान्यातीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुमताज. मुमताज सध्या त्यांच्या लहान मुलीसोबत म्हणजेच तानिया आणि जावई नातवंडांसोबत रोममध्ये राहतात. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अशी अफवा उडाली, तेव्हा त्यांच्या मुलीनं त्या सुखरुप असल्याचा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आणि मुमताज यांच्या फॅन्सचा जीव भांड्यात पडला. या व्हिडीओमध्ये मुमताज म्हणाल्या की, “मला अफवेबद्दल जेव्हा कळलं तेव्हा अजब वाटलं खरं पण आनंदही झाला…कारण इतक्या वर्षांनंतरही लोक माझ्यावर प्रेम करतात हे मला समजलं. तुम्ही काळजी करु नका. मी खूप आनंदी आहे. माझ्या घरातले माझी चांगली काळजी घेतात. त्यामुळे मी खूष आहे आणि जसं पेपरमध्ये छापून आलं तशी एकटी तर अजिबातच नाही.” तुम्हाला माहीत आहे का, मुमताज यांनाही ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. पण त्यांनी तब्बल 11 वर्षे कॅन्सरशी झुंज दिली आणि आता त्या पूर्णपणे बऱ्या होऊन निरोगी आयुष्य जगत आहेत.   

10. नर्गिस

प्रसिध्द अभिनेता संजय दत्त याची आई आणि भारतीय सिनेमामधली एक प्रसिध्द अभिनेत्री नर्गिसने हिंदी चित्रपट अभिनेता सुनील दत्तशी लग्न केलं.  नर्गिस या राज्यसभेसाठी नामांकन मिळालेल्या आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच बॉलीवूड अभिनेत्री होत्या. नर्गिस दत्त यांना पॅन्क्रेटायटीस कॅन्सर झाला होता. त्याच्या उपचारांसाठी त्यांना न्यूयॉर्कला जावं लागलं होतं. काही प्रमाणात बऱ्या झाल्यावर त्या भारतात परतल्या. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती अजूनच खालावली आणि मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलं. मात्र त्यानंतर त्या कोमात गेल्या. 3 मे, 1981 ला कॅन्सरने त्यांच्यावर मात केली आणि हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read More From मनोरंजन