बॉलीवूड

वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक

Dipali Naphade  |  Jan 8, 2019
वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक

बॉलीवूडमध्ये आतापर्यंत महेंद्र सिंह धोनी, मिल्खा सिंह, पानसिंग तोमर, सुभाषचंद्र बोस, सरबजीत, भगतसिंग, मांझी यासारख्या बऱ्याच पुरुषांच्या बायोपिक आल्या आहेत. मात्र जेव्हा महिला बायोपिक चित्रपटांची चर्चा होते तेव्हा नीरजा, मेरी कॉम आणि सिल्क स्मिता यासारख्या फारच कमी नावांची चर्चा होते. कारण आतापर्यंत बॉलीवूडमध्ये महिलांवर बायोपिक बनवण्याचा विचार फारच कमी लोकांनी केला आहे. हेच कारण आहे की, यावर्षी 2019 मध्ये एक नाही दोन नाही तर मोठ्या पडद्यावर अनेक महिला बायोपिक येत आहेत. आपण जाणून घेऊया की, यावर्षी कोणते बायोपिक येणार आहेत आणि त्या चित्रपटांमध्ये कोणत्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

राणी लक्ष्मीबाई- कंगना रणौत


यावर्षाची सुरुवात होणार आहे ती म्हणजे कंगना राणौतच्या चित्रपट “मणिकर्णिका”ने. या चित्रपटामध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका मोठ्या पडद्यावर जिवंत करत आहे. तिच्याबरोबरच पहिल्यांदाच अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील या चित्रपटात झलकारीबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.  राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणं हे कंगानासाठी अतिशय आव्हानात्मक होतं. त्यासाठी दिवस – रात्र कंगनाने मेहनत केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर बऱ्याच लोकांनी ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे.

अॅसिड सर्व्हयवर लक्ष्मी अग्रवाल- दीपिका पादुकोण  


लक्ष्मी अग्रवाल केवळ पंधरा वर्षांची असताना दिल्लीच्या एका बस स्टॉपवर 32 वर्षांच्या एका पुरुषाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. त्यानंतर लक्ष्मीने अॅसिडवर बंदी आणण्यासाठी खूपच मोठा लढा दिला आणि 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनैतिकरित्या अॅसिड विकण्यावर बंदी आणली. मोठ्या पडद्यावर लक्ष्मीच्या या लढ्याची कथा अभिनेत्री दीपिका पादुकोण आणणार आहे. एका मुलाखतीमध्ये ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला आतूनही एक दहशत बसली होती आणि त्रास झाला होता असं दीपिकाने सांगितलं आहे. ही केवळ एक हिंसाच नाही तर पीडित मुलीची ताकद, साहस, आशावाद आणि लढा जिंकल्याची एक कथा असल्याचंही दीपिकाचं म्हणणं आहे. लक्ष्मीच्या या कथेमुळे दीपिका प्रभावित झाली आणि म्हणूनच तिने लक्ष्मीची कथा आणि भूमिका प्रेक्षकांसमोर आणण्याचं ठरवलं.

गुंजन सक्सेना- जाह्नवी कपूर


गुंजन सक्सेना भारताची पहिली लढाऊ विमानचालक होती, जिची पोस्टिंग 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान झाली होती. गुंजन सक्सेना यांना शौर्य वीरने सन्मानित करण्यात आलं होतं. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन बनवत असून गुंजनची व्यक्तीरेखा श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी जान्हवी कपूर कोणतीही कमतरता ठेऊ इच्छित नाही. त्यासाठी तिने गुंजन सक्सेनाची भेटदेखील घेतली आहे.

शकीला- रिचा चढ्ढा


मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये जबरदस्त बोल्ड भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून शकीला प्रसिद्ध आहे. बी ग्रेड चित्रपटांमध्ये शकीलाचं खूप मोठं नाव आहे. आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीला शकीलाने काही टॉपलेस सीन केले होते, ज्यामुळे बरीच कॉन्ट्रॉवर्सी निर्माण झाली होती. तिच्या बी ग्रेड चित्रपटांची इतके चाहते होते की, तिचा चित्रपट प्रत्येक भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात येत होता. इतर भाषांमध्ये नेपाळी आणि चायनीज भाषेचाही समावेश होता. शकीलाची ही बोल्ड इमेज मोठ्या पडद्यावर अभिनेत्री रिचा चढ्ढा साकारणार आहे. नुकताच रिचा चढ्ढाने तिच्या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. या पोस्टरमध्ये रिचा अतिशय हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

सायना नेहवाल- श्रद्धा कपूर


सायना नेहवाल ही भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहे. सायनाने नेहमीच आपल्या खेळाने देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळेच सायनाला आतापर्यंत पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मागच्या वर्षीच सायनाने तिचा बॉयफ्रेंड पारूपल्ली कश्यप याच्याशी विवाह केला. सायना नेहवालचाही बायोपिक येत असून ही भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारत आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासाठी श्रद्धानेदेखील प्रचंड मेहनत घेतली आहे. सायनाकडून बॅडमिंटनचे धडे श्रद्धाने घेतले आहेत. या बायोपिकसाठी सायनाने श्रद्धाची बरीच मदत केली आहे.

डेबोरा हेरॉल्ड- जॅकलीन फर्नांडीस


डेबोरा हेरॉल्ड ही एक भारतीय सायकलस्वार आहे. यावर्षी येणाऱ्या या भारतीय बायोपिकमध्ये जॅकलिन फर्नांडिसची महत्त्वाची भूमिका आहे. डेबोराची भूमिका जॅकलिन साकारत आहे. डेबोरा ही तेवीस वर्षीय सायकलिस्ट आहे आणि निकोबार द्वीप समूहाची रहिवासी आहे. युसीआय, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल प्रतिस्पर्धेत भाग घेणारी डेबोरा ही पहिली भारतीय सायकलिस्ट आहे.

फोटो सौजन्य – Instagram

Read More From बॉलीवूड