आरोग्य

अनियमित पाळीमागे चॉकलेट सिस्ट हे देखील असू शकते एक कारण 

Vaidehi Raje  |  Jul 26, 2022
Symptoms of Chocolate Cyst

महिलांसाठी, मासिक पाळी नियमित असणे ही निरोगी राहण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल अनेक कारणांमुळे महिलांच्या जीवनातील ही सायकल विस्कळीत होत चालली आहे. सिस्ट्सची समस्या केवळ वृद्ध महिलांमध्येच नाही तर तरुण मुलींमध्येही बघायला मिळते आहे.चॉकलेट सिस्ट देखील याच समस्येचा एक भाग आहे. पण स्त्रिया अजूनही मासिक पाळीशी संबंधित त्रास अंगावर काढतात, त्याविषयी बोलण्याचा त्यांना संकोच वाटतो. मासिक पाळीशी निगडित बहुतांश समस्या या वेळेत उपचार केल्याने पूर्ण बऱ्या होऊ शकतात. चॉकलेट सिस्टवर देखील जर वेळेत उपचार केले तर ही समस्या वाढणे थांबेल.  जाणून घ्या चॉकलेट सिस्ट म्हणजे काय व त्याची कोणती लक्षणे आहेत. 

पाळीत असामान्य रक्तस्त्राव व वेदना होणे 

Symptoms Of Chocolate Cyst

कधीकधी पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होणे ओटीपोटात दुखणे किंवा सूज येणे असे त्रास होऊ शकतात. प्रत्येक वेळी ते सिस्टमुळेच होते असे नाही. परंतु सिस्टमुळे ही अनियमितता असू शकते. चॉकलेट सिस्टला वैद्यकीयदृष्ट्या ‘अंडाशयांचा एंडोमेट्रिओसिस’ किंवा ‘ओव्हेरियन एंडोमेट्रिओमा’ असे म्हणतात. हे सिस्ट अंडाशयाच्या आत वाढतात. ते द्रवाने भरलेले असतात आणि दिसायला ते  वितळलेल्या चॉकलेटसारखे तपकिरी असतात म्हणूनच त्यांना चॉकलेट सिस्ट असे नाव देण्यात आले आहे. त्यांचा रंग खरं तर मासिक पाळीच्या अवशिष्ट रक्तामुळे आणि शरीरातील ऊतींमुळे असतो. चॉकलेट सिस्ट हे एका ओव्हरीत देखील तयार होऊ शकतात आणि काहीवेळा दोन्ही ओव्हरीज मध्ये असू शकतात. ते संख्येने एक किंवा अधिक असू शकतात. 

चॉकलेट सिस्टची लक्षणे 

महिलांमध्ये सिस्टचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे एंडोमेट्रिओसिसची समस्या असलेल्या सुमारे ४० टक्के महिलांना चॉकलेट सिस्ट होण्याची शक्यता असते. म्हणून याची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेता येतील. मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होणे, मासिक पाळी सुरु नसतानाही कंबर किंवा ओटीपोटात दुखणे,अनियमित मासिक पाळी, काही वेळेला प्रजनन क्षमता कमी होते, शारीरिक संबंधांदरम्यान अत्यंत वेदना ही चॉकलेट सिस्टची लक्षणे आहेत. 

Symptoms Of Chocolate Cyst

अनेकांचा असा गैरसमज असतो की  सिस्टचा आकार लहान असेल तर फार त्रास होत नाही. पण खरे तर सिस्टच्या आकारापेक्षा तो सिस्ट कुठे आहे यावर वेदना व त्रास होणे अवलंबून असते. ज्या महिलांच्या चाचणीमध्ये सिस्ट लहान आकाराचे आढळते, त्या बऱ्याच वेळा उपचार घेत नाहीत त्यामुळे पुढे जाऊन गंभीर परिस्थिती उद्भवते. जरी हा त्रास कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना होऊ शकतो, परंतु त्यांची बहुतेक प्रकरणे गर्भधारणेच्या वयातील स्त्रियांमध्ये दिसून येतात. त्यावर उपचार न केल्यास, गर्भधारणेमध्ये देखील अडचणी येऊ शकतात. काही कारणाने सिस्ट आतच फुटल्यास अचानक पोटदुखी होऊ शकते. या आपत्कालीन स्थितीमध्ये त्वरित उपचार मिळणे आवश्यक आहे.

चॉकलेट सिस्टवरील उपचार आणि काळजी 

एकदा चॉकलेट सिस्ट काढून टाकल्यानंतर, तो पुन्हा तयार होण्याचा धोका असतो. म्हणून, त्यावर योग्य उपचार घेणे आणि त्यानंतर खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्त्रीचे वय, लक्षणे, सिस्ट कुठे निर्माण झाला आहे, किती सिस्ट आहेत, स्त्रीला नंतर मुले हवी आहेत का, इत्यादी अनेक गोष्टींवर सिस्टचे उपचार अवलंबून असतात. जर सिस्ट आकाराने लहान असेल आणि कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नसतील, तर डॉक्टर काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगू शकतात. या काळात तुम्हाला तुमची दिनचर्या, आहार आणि व्यायामात बदल करण्याचा सल्लाही दिला जाऊ शकतो. 

चॉकलेट सिस्टवर उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कुठलीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Photo Credit – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य