बॉलीवूड

कॉफी विथ करणचा सातवा सिझन येणार आता ओटीटी वर

Vaidehi RajeVaidehi Raje  |  May 4, 2022
coffee with karan

तुम्हाला बॉलिवूड गॉसिपमध्ये खूप रस असेल आणि त्यासाठी जर तुम्ही ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या सीझनची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. नुकतेच जाहीर झाले आहे की आता या वादग्रस्त शोचा नवीन सीझन टीव्हीवर येत नाहीये तर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ‘कॉफी विथ करण’ हा बॉलीवूड गॉसिप आवडणाऱ्यांचा आवडता रिऍलिटी शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. मात्र, सहा यशस्वी सीझननंतर आता हा शो टीव्हीवर येणार नाही. बुधवारी, चित्रपट निर्माता आणि शोचा होस्ट, करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्ट मध्ये  करणने खुलासा केला की ‘कॉफी विथ करण’ सातव्या सीझनसह परत येणार पण एका ट्विस्टसह! काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणचा सातवा सिझन येणार आणि त्याची तयारी देखील सुरु झाल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगली होती. करणने या सीझनमध्ये कुणाकुणाला बोलवायचे याची यादी देखील तयार केल्याचे बोलले जात होते. अनेकांनी अंदाज देखील लावले होते की या सीझनमध्ये कोणाकोणाला बघायला मिळेल. अशातच करणने ही माहिती शेअर केल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

सोशल मीडियावर करण जोहरने जाहीर केले

त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक नोट शेअर करताना करण जोहरने लिहिले की, “‘ कॉफी विथ करण आता टीव्हीवर येणार नाही. कारण प्रत्येक चांगल्या स्टोरीला एका ट्विस्टची गरज असते. मला हे जाहीर करताना खूप आनंद होतो आहे की कॉफी विथ करणचा सातवा सीझन आता डिस्ने हॉटस्टारवर दिसेल. भारतातील मोठे मुव्ही स्टार्स या शो मध्ये येतील आणि कॉफी पिता पिता गप्पा मारतील. यात गेम्स सुद्धा असतील. बरेच खेळ असतील, बर्‍याच अफवांना विराम मिळेल आणि वर्षानुवर्षे केलेल्या प्रेमाबद्दल, झालेल्या नुकसानाबद्दल चर्चा केली जाईल. कॉफ़ी विथ करण लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.”

18 वर्षांपूर्वी सुरु झाला होता हा कार्यक्रम 

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने 18 वर्षांपूर्वी आपला हा चॅट शो कॉफी विथ करण सुरू केला होता. इंडस्ट्रीत सुरु असलेली चर्चा ऐकून चाहत्यांना पुन्हा एकदा या शोचा पुढचा सीझन येणार अशी आशा होती. कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली होती पण शेवटी करणनेच त्याचा शो बंद करण्याची घोषणा केली. करणने 19 नोव्हेंबर 2004 रोजी स्टार वर्ल्डवर शो सुरू केला होता. तेव्हापासून त्याचे 6 सिझन आले आहेत. आजही या शो चे जुने सीझन्स टीव्हीवर दाखवले जातात आणि लोक ते आवडीने बघतात. म्हणूनच चाहत्यांना याचा पुढचा सिझन केव्हा येणार याबाबत उत्सुकता होती. इंडस्ट्रीतील बहुतांश लोकप्रिय व्यक्तींनी या शो मध्ये कुठल्या ना कुठल्या सीझनमध्ये उपस्थिती दर्शवली आहे. आता या नव्या सीझनमध्ये कोण कोण हजेरी लावणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

फॅन्स झाले एक्ससाईट

करण जोहरबे यापूर्वीही त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी हे काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी कॉफी शॉट्स विथ अतरंगी रे या विशेष भागामध्ये धनुष आणि सारा अली खान हे त्यांच्या अतरंगी रे चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले होते. आता सातव्या सीझनबद्दल करणने पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या. फराह खानने टिप्पणी केली – मला वाटलेच होते. तर बी प्राकने कमेंट केली की– आता अधिक प्रतीक्षा करू शकत नाही. याआधी करणने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, मी जड अंतःकरणाने सांगत आहे की कॉफी विथ करण आता परत येणार नाही. यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. पण आता लक्षात आले आहे ती एक गंमत होती आणि करण सातवा सीझन घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड