बॉलीवूड

स्मिता पाटील यांच्या आठवणींत भावुक झाल्या अभिनेत्री दीप्ती नवल 

Vaidehi Raje  |  Jul 27, 2022
Smita Patil

शबाना आझमी, दीप्ती नवल आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील या तिघींनीही चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींबद्दल बोलताना या तिघींची नावे आपोआपच डोळ्यांपुढे येतात. पण अभिनयासोबतच या तिघी आणखी एका गोष्टीसाठी ओळखल्या जातात आणि ती गोष्ट म्हणजे त्यांची मैत्री होय . या तिन्ही अभिनेत्री एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी होत्या.  केवळ अभिनयातच नाही तर इंडस्ट्रीतही त्यांनी मैत्रीचा आदर्श ठेवला आहे. अभिनेत्री स्मिता पाटील या अकाली हे जग सोडून गेल्या. पण, चाहत्यांसह आजही दीप्ती नवल आणि शबाना आझमी या त्यांच्या मैत्रिणींच्या मनात त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. अधूनमधून दीप्ती नवल यांना आजही त्यांच्या जिवलग मैत्रिणीची आठवण येते. अलीकडेच दीप्ती नवल यांनी स्मिता पाटील यांच्याबरोबरच त्यांचा  एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हे मैत्रिणींचे त्रिकूट दिसत आहे.

स्मिता पाटील यांची आठवण आल्याने दीप्ती नवल भावुक 

अभिनेत्री-दिग्दर्शिका दीप्ती नवल यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक जुना फोटो शेअर केला आहे. यात दीप्ती नवल, शबाना आझमी आणि स्मिता पाटील या तिघी आहेत. या फोटोत तिघांचाही लूक छान दिसत आहे. शबाना आझमी आणि दीप्ती नवल यांनी स्कर्ट टॉप घातले आहे, तर स्मिता पाटील जीन्स आणि शर्टमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत दीप्ती नवल यांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. त्यांनी हा खास फोटो शेअर करताना त्यासोबत एक अप्रतिम कॅप्शन लिहिलं आहे, ज्यावरून त्या स्मिता पाटील यांना खूप मिस करत असल्याचे दिसून येते. दीप्ती नवल यांनी लिहिले की, ‘आयुष्याच्या या टप्प्यावर स्मिताला खूप मिस करतेय!’

चाहत्यांनीही दिल्या प्रतिक्रिया 

या फोटोला सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. गुल पनागने या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. एका यूजरने या फोटोवर ‘ब्यूटी विथ ब्रेन’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या युजरने ‘मला हा फोटो खूप आवडतो’ अशी कमेंट केली. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्हा तिघींची जोडी माझी ऑल टाइम फेव्हरेट आहे.’ 

चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता पाटील 

Smita Patil

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1956  रोजी झाला. स्मिता पाटील यांचा चित्रपट प्रवास उण्यापुऱ्या 10 वर्षांचा असला त्यांचे तरी कामच असे आहे की आजही त्या चर्चेत आहेत. त्या प्रत्येक भूमिका पूर्ण जीव ओतून साकारायच्या. प्रत्येक भूमिका त्या समरसून जगल्या. जन्माच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य पाहून आई विद्या ताई पाटील यांनी त्यांचे नाव स्मिता ठेवले होते. हेच गोड हास्य नंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात आकर्षक पैलू ठरले. 

स्मिता पाटील यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासात असे चित्रपट केले जे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले. भूमिका, मंथन, मिर्च मसाला, अर्थ, मंडी आणि निशांत या कलात्मक चित्रपटांमध्ये अभिनयाने ठसा उमटवतानाच त्यांनी नमक हलाल आणि शक्ती यांसारखे व्यावसायिक चित्रपटही केले. स्मिता पाटील यांचा प्रवास भूमिका या चित्रपटापासून सुरू झाला तो चक्र, निशांत, आक्रोश, मिर्च मसाला यांसारख्या चित्रपटांपर्यंत चालू राहिला. 1981 मध्ये चक्र या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिर्च मसाला हा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला, परंतु या चित्रपटात साकारलेली सोन बाईची व्यक्तिरेखा त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानली जाते. या चित्रपटाने दिग्दर्शक केतन मेहता यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.

मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला. स्मिता पाटील यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड