DIY लाईफ हॅक्स

यंदा गणपतीला करा अशी सुंदर आणि सोपी सजावट

Aaditi Datar  |  Sep 8, 2021
ganpati-decoration-ideas-in-marathi

गणेशोत्सव आता अगदी काही तासांवर आला आहे. मग तुमची बाप्पाच्या सजावटीची तयारी झाली की नाही. जर तुमची तयारी झाली नसेल आणि काही आयडियाज सजावटीसाठी हव्या असतील तर हा लेख नक्की वाचा. हरतालिका शुभेच्छा देऊन गणपतीच्या शुभेच्छा यायला सुरूवात होण्याआधी गणपतीची सजावट पूर्ण होईल. खरंच मजा असते गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री जागून बाप्पाच्या सजावटीसाठी लगबग करण्यात. मग चला पटापट आयडिया वाचून सजावटीला सुरूवात करा.

देवघरातील बाप्पासाठी सजावट

काहींकडे दीड दिवसाचे बाप्पा येतात आणि देवघरात त्यांना विराजमान केले जाते. अशावेळी वेगळी सजावट करणे शक्य नसते. पण देवघराला नक्कीच सजवू शकता. जसं देवघर स्वच्छ करून घेणं तर आलंच. त्यासोबतच फुलांच्या तोरणांनी किंवा बाजारात मिळणाऱ्या खास रंगबेरंगी सुंदर कापडांचा वापर करून तुम्ही छान सजावट करू शकता. अगदीच शक्य नसल्यास साधं तोरण लावलं तरी देवघराची शोभा नक्कीच वाढेल.

बाप्पासाठी झाडांची सजावट

ऐनवेळी सजावट काय करायची हा प्रश्न असल्यास तुमच्या मदतीला घरातील छोट्या छोट्या कुंड्या उपयोगी पडतील. तुम्ही नेहमीची रोपं सुंदर अशा कुंड्यांमध्ये ठेवून किंवा शोभेची झाडं असल्यास त्यांनी ईको-फ्रेंडली अशी बाप्पाची सजावट करू शकता. घरात जर फुलझाडं किंवा रोपं नसतील तर तुम्हाला एखाद्या नर्सरीतून ती सहज आणून सजावट करता येईल. ही रोपं सजावटी करता उपयोगी पडतील आणि नंतर त्यांची छान लागवडही करता येईल. याशिवाय तुम्ही मोठी मोठी बांबूची रोपंही बाप्पाच्या सजावटीकरता वापरू शकता. शक्यतो अशा सजावटीसाठी इनडोअर प्लांट्सचा वापर करा. ज्यामुळे रात्री समस्या जाणवणार नाही. अगदी हेही शक्य नसल्यास आपली नेहमीच्या वापरातील केळीची पान वापरूनही तुम्ही छान सत्यनारायणाच्या पूजेसारखं बाप्पाची सजावट करून पाहा.

फुलांची सजावट

आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट नक्कीच छान दिसते. पण ही सजावट पाच दिवसांच्या किंवा दहा दिवसांच्या बाप्पाला करणे शक्य नसते. तसंच गणपतीच्या काळात ताजी फुलं मिळणं कठीण असतं आणि फुलांचे भावही चढे असतात. त्यामुळे फुलांची सजावट करण्याआधी या गोष्टींचा विचार नक्कीच करा.

सजावटीसाठी खणाचा वापर

सध्या बाजारात आणि ऑनलाईन बाप्पाच्या सजावटीसाठी खणाच्या कापडांचे अनेक पर्याय दिसून येत आहेत. हा पर्याय ईकोफ्रेंडली आणि बजेट फ्रेंडली असा दोन्ही आहे. जर तुम्हाला खास बाप्पासाठी खणाचा बॅकड्रॉप घेणं शक्य झालं नसल्यास टेन्शन नाही. तुम्ही तुमच्याकडील खणाची ओढणी किंवा खणाच्या साडीचा यासाठी वापर करू शकता. याचा वापर तुम्हाला या वर्षीच नाहीतर पुढच्या वर्षीही करता येईल.

वर्तमानपत्र किंवा रंगीबेरंगी कागदाची फुलं

तुमच्याकडे जर क्रिएटीव्हीटी आणि संयम असेल तर तुम्ही जुन्या वर्तमानपत्रापासूनही गणपतीसाठी डेकोरेशन करू शकता. पेपरच्या विविध डिझाईन्सपासून तुम्ही बाप्पासाठी छान सजावट करू शकता. जसं सिंहासन, कमळाचा आकार. अशी सजावट करताना तुम्हाला शालेय दिवसांची आठवण नक्कीच होईल.

ओढणी किंवा स्कार्फची सजावट

आपल्याकडे घरात बऱ्याच ओढण्या असतात. आजकाल भरजरी ओढण्या बऱ्याच जणींकडे असतात. या ओढण्यांचा वापर करूनही तुम्ही छानशी सजावट यंदा गणपतीसाठी करून पाहा.

रंगीबेरंगी रांगोळीची सजावट

गणपतीच्या स्वागतासाठी तुम्ही छान रांगोळीने सजावट करू शकता. मग ती साधी रांगोळी असो फुलांची असो वा तांदूळाच्या पीठीने काढलेली दाक्षिणात्य पद्धतीची रांगोळी असो. देवघरात सजावट करणं शक्य नसल्यास रांगोळीचा पर्याय उत्तम आहे.

मग आम्हाला आशा आहे की, वरील पर्याय बाप्पाच्या आगमनाआधी तुम्हाला सहज करता येतील. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. POPxoMarathi कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा.

Read More From DIY लाईफ हॅक्स